प्रपंचातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात त्यापलीकडेही फार मोठं सुख असू शकतं. त्यासाठी प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या आसक्तीपलीकडे जावं लागतं, हे वाक्य गेल्यावेळी आलं. हे सूत्र जे प्रपंचात आहेत आणि प्रपंचात राहूनच परमार्थ साधू इच्छितात, अशा आपल्यासारख्या साधकांसाठी आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांनीही प्रापंचिकाला जवळ केले आणि त्याच्या अंतरंगातली प्रपंचासक्ती काढून त्याला भगवंताच्या प्रेमात बुडवले. खरं पाहता, प्रपंच सोडून निव्वळ परमार्थ करणाऱ्या साधकापेक्षा प्रपंचात राहून परमार्थ साधण्यासाठी प्रयत्न करणे अधिक बिकट असते. अशा प्रापंचिक साधकावरच कसोटीचे प्रसंग वारंवार येतात. प्रपंचाचं खरं अपूर्ण स्वरूप शब्दांनी आपल्यालाही कळतं आणि प्रपंचाची अपूर्णता सांगणारा महाराजांचा बोध अगदी  आपल्या मनापर्यंत भिडतोही. प्रत्यक्षात प्रसंग आला की मात्र त्या बोधाचा क्षणार्धात विसर पडतो आणि आपण त्या प्रपंचाच्या प्रभावाने वाहवत जातो. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात, ‘‘सावधानता बाकी वेळेस असते. प्रसंगाचे वेळी मात्र तिचा विसर पडतो’’ (बोधवचने, क्र. ३३९).   श्रीमहाराज सांगत, मीठ खारटच असणार. ते कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जसा जाणार नाही. त्याचप्रमाणे प्रपंच हा अपूर्णच असणार. कितीही भर घातली तरी प्रपंचातली अपूर्णता संपणार नाही. हे ज्ञान आपल्याला ऐकायला आवडतं आणि मनाला भिडतंही पण आपल्या कर्तेपणानं आपण आपला प्रपंच पूर्णत्वास नेऊ, अशी आपल्या मनाची सुप्त धारणा असते. आपले सर्व प्रयत्नही प्रपंचाच्या त्या पूर्णत्वासाठीच असतात आणि अनेकदा महाराजांनाही आपण त्यासाठीच साकडंही घालतो. प्रपंचातली आसक्ती हीच काळजीचं मूळ असते आणि श्रीमहाराज तर म्हणतात, ‘‘आज काळजीचं कारण नाहीसं झालं तरी काळजी जाणार नाही!’’(बोधवचने, क्र. ९४४). एका कारणामुळे काळजी लागली. ते कारण प्रयत्नांचा बराच आटापिटा करून दूर झालं तरी मनातली काळजी संपत नाही. काळजीचं एक कारण दूर होतं न होतं तोच कालांतरानं काळजीचं दुसरंच कारण उत्पन्नही होतं आणि काळजी अखंड राहते. या प्रापंचिक काळजीनंही आपण श्रीमहाराजांना वारंवार विनवतो आणि त्या क्षणी तेही आपल्याला धीर देतात. त्यांचं खरं लक्ष मात्र आपल्याला प्रपंचासक्तीपलीकडे जाण्यातला आनंद कसा मिळेल, याकडेच असतं. त्यासाठी आपल्याला धीर देताना, प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देताना आणि प्रयत्नांची नेमकी दिशा सुचवितानाही ते प्रपंचाची अपूर्णताच माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सोडत नाहीत. माझ्या मनातली प्रपंचाची आसक्ती काढण्याचाच प्रयत्न करणं सोडत नाहीत. त्यासाठी भगवंताच्या स्मरणावर ते भर देतात. म्हणूनच ते सांगतात की, ‘‘भगवंताच्या स्मरणाने माणूस प्रपंचाच्या बंधनापासून अलिप्त राहील’’ (बोधवचने, क्र. ९३५). प्रपंचाच्या स्मरणात काळजीच अधिक पक्की होते तर भगवंताच्या स्मरणाने माणूस प्रपंचाच्या मानसिक बंधनापासून अलिप्त होऊ लागतो, असंच श्रीमहाराजांना सांगायचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा