अमेरिकी वित्तव्यवस्थेत सगळेच आता या संस्कृती-मूळ शोधनाच्या कार्याला लागलेत. जे अमेरिकेत होतं त्याचं लोण आपल्याकडेही पसरतं. खरा धोका, भीती आहे ती इथे.. नवी मनुस्मृतीच येईल अशानं.. ही ती भीती.
जन्माला येताना रक्तातनं आलेले गुण आपलं काय काय ठरवतात?
आपलं दिसणं, बोलणं वगरे ठीक आहे. पण आपण कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घेणार हेदेखील आपण कुठे, कोणाच्या पोटी जन्मलो यावरच ठरणार? आपल्याला काय आवडणार, काय नावडणार हेदेखील आपला जन्मच ठरवणार? हे जर इतकं असं घोटीव असेल तर मग जन्माला येऊन आपण करायचं काय? आपल्या गुणसूत्रांचे कैदी म्हणूनच राहायचं?
तसं यातल्या काही गोष्टी आपण स्वीकारलेल्या असतातच. म्हणजे पारशी तसे चक्रमच असणार, गुज्जू मंडळींना व्यवसाय शिकवावा लागत नाही, बंगाली भद्रलोक लेखन, वाचन, कलेत उजवेच असणार, पंजाबी सरदार म्हटला की तो मोकळाढाकळाच असायला हवा, सिंधी म्हटले की क्यूं सांई.. असा सानुनासिक प्रश्न प्रश्नार्थक चेहऱ्यासह आपल्या डोळ्यांपुढे येणारच.. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आपले चित्पावन कसे आणि किती हात आखडून वागणार, देशस्थ कसे अघळपघळ असणार, मराठा मोठेपणा कसा मिरवणार, चांद्रसेनीय कायस्थांकडचे भाऊसाहेब, अण्णासाहेब रविवारी सकाळी मुकाट काळ्या पिशवीच्या साधनेला कसे लागणार, वगरे वगरे तपशील आपल्याला माहीतच असतो. बऱ्याचदा तो आपण अनुभवलेलाही असतो.
पण जन्माला येतानाच आपला भाग बनून आलेल्या या आपल्या स्वभाववैशिष्टय़ांमुळे आपल्या व्यवसायातल्या, नोकरी-धंद्यातल्या निर्णयांना मर्यादा येतात का? म्हणजे ‘कर्जपुरवठा किंवा मंजुरी खात्यात चित्पावनाला ठेवायला नको- तो कोणालाच काही देणार नाही..’ किंवा ‘देशस्थालाही ठेवायला नको- ते येईल त्याला, मागेल त्याला कर्ज मंजूर करत बसेल’.. असा विचार आपल्याकडे बँक व्यवस्थापन करतं का? किंवा आघाडीवर जाऊन लढायचं असेल तर तामिळ ब्राह्मण किंवा गुजरात्यांना पाठवायला नको. असा विचार सन्यातले वरिष्ठ अधिकारी करतात का?
याचं उत्तर अर्थातच तूर्त तरी नाही असंच असेल.
तूर्त असं म्हणायचं कारण म्हणजे जगभरात पसरलेल्या अमेरिकी बँकांनी आपापल्या कर्मचाऱ्यांची ‘सांस्कृतिक तपासणी’ करायचा निर्णय घेतलाय. त्यामागचं कारणही तसंच आहे.
झालं असं की गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या वित्त क्षेत्रात मोठमोठे घोटाळे झाले. अगदी तगडय़ा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकादेखील बुडाल्या. लेहमन ब्रदर्स ही खरंतर केवढी बलाढय़ बँक. आपल्या काही बँका एकत्र केल्या तरी त्यांच्यापेक्षा लेहमन भारी ठरली असती. पण २००८ सालच्या जून महिन्यात ती बघता बघता दिसेनाशी झाली. त्यापाठोपाठ छोटय़ामोठय़ा अशा जवळपास साठ बँका, वित्तीय संस्था यांचं बंबाळं वाजलं अमेरिकेत. त्यानंतरही अनेक बँकांत, वित्तसंस्थांत छोटेमोठे घोटाळे घडत गेले. अगदी गेल्या वर्षीपर्यंत. या सगळ्यामुळे एक झालं. अमेरिकेच्या वित्त क्षेत्राची चांगलीच बदनामी झाली.
तेव्हा आता हे फार झालं, असं वाटून न्यूयॉर्कच्या ‘फेड’चे- म्हणजे फेडरल रिझव्र्ह या मध्यवर्ती बँकेच्या सर्वात मोठय़ा प्रादेशिक उपांगाचे अध्यक्ष विल्यम डडली यांनी एक बठक बोलावली. सगळ्या बँक, वित्तसंस्था प्रमुखांची. त्यात त्यांनी या सर्वाना दमात तर घेतलंच. पण वर एक आदेश दिला- आपल्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक इतिहासाचं उत्खनन करण्याचा. त्यांचं म्हणणं असं की कर्मचाऱ्यांची सांस्कृतिक पाश्र्वभूमी बँक व्यवस्थापनाला ठाऊक असायलाच हवी. या बठकीत त्यांनी जे काही भाषण केलं त्यात ४४ वेळा संस्कृती या शब्दाचा उच्चार केला. त्यांचं म्हणणं असं की मुदलात धोका पत्करायची ज्यांना हौस असते अशी माणसं आता फार मोठय़ा संख्येने वित्त क्षेत्रात येऊ लागलीयेत. ‘नाही काही जण कसे फॉम्र्युला वन स्पध्रेकडे आपोआप आकृष्ट होतात, तसं यांचं वित्त क्षेत्राचं आकर्षण असतं,’ असं डडली म्हणाले. तेव्हा ही अशी अतिरिक्त जोखमीची हौस असलेली माणसं कोण, हे बँक व्यवस्थापनानं आधीच ओळखायला हवं. ते कोठून आलेत, त्यांची पाश्र्वभूमी काय. ते तपासून ठेवायला हवं, असे आदेश त्यांनी दिले.
पण हे करायचं कसं? अनेकांना तोच प्रश्न पडला.
एक चाचणी शोधून काढली मग या मंडळींनी. तणाव चाचणी. म्हणजे २००८ साली जे काही संकट आलं बँकिंग क्षेत्रावर तसं संकट पुन्हा आलं तर त्या वेळी कोण कसा वागेल याचा पाहणी अभ्यास सुरू केला. चालू म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस त्याचे निष्कर्ष हाती लागतील. या चाचणीत एक मुद्दा आवर्जून तपासला जातोय. तो म्हणजे अत्यंत विपरीत आíथक परिस्थितीत सरकारच्या मदतीशिवाय कोण किती शांतपणे, सहजपणे काम करू शकतोय? कोणाच्या मनाची शांती ढळतीये? कोण किती किरकिरा झालाय? अशा परिस्थितीत एखाद्याचा किरकिरेपणा वाढलाच तर त्याच्या मनाची शांती पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी कोणाची मदत लागतीये का? की ही व्यक्ती स्वत:च पुन्हा स्वत:वर काबू मिळवू शकतीये, हेदेखील यात तपासलं जाणार आहे. या पाहणीत एका कर्मचाऱ्यानं दुसऱ्याला ईमेल करताना ‘वर्क अराउंड’ हा शब्दप्रयोग केला. आता एरवी या शब्दानं दचकून जावं असं काही नाही. पण ज्या संदर्भात तो वापरला गेला ते पाहिल्यावर पाहणीकर्त्यांचे कान टवकारले. त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ होता जाचक नियमांना वळसा घालून मार्ग काढणं. हे धोकादायक होतं. कारण अशा वळसा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे आíथक घोटाळे घडतात असं बँकांचं निरीक्षण होतं. झालं. मग लगेच किती कर्मचारी ही प्रवृत्ती दाखवतायेत या मुद्दय़ाचाही या पाहणीत समावेश करण्यात आला. जेपी मॉर्गन चेस आणि वेल्स फार्गो अँड कं हे नंतर मग या पाहणीचं ‘शास्त्रीय पद्धतीनं’ विश्लेषण करणारेत.
वरवर पाहता हे जे काही सुरू आहे त्याबद्दल कुतूहलमिश्रित औत्सुक्य असलं तरी एका गटाला वाटतंय या पाहणीतून जे काही निष्पन्न होईल त्याचा बँकांच्या विरोधात छडी म्हणून वापर केला जाईल. संस्कृती म्हणजे काय? आता बँकांकडून काही चुका झाल्याच तर हे लोक त्याचा संबंध थेट संस्कृतीशीच जोडणार की काय, अशी प्रतिक्रिया त्यावर बीबी अँड टी कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी केली किंग यांनी व्यक्त केली आहे. संस्कृती हे आता वॉल स्ट्रीटवरचं मोठं फॅडच बनलंय, असं मत सुसान ऑक्स यांनी व्यक्त केलंय. त्या बेटर बँकिंग प्रोजेक्ट या अभ्यास गटाच्या प्रमुख आहेत. पण म्हणून त्याचं महत्त्व सुसान यांना नाही असं नाही. त्यांचं म्हणणं बँकेत येणाऱ्या ग्राहकांना पसे देताना रोखपाल त्या ग्राहकाशी कसा वागतो, कसा बोलतो इथपासून ते एखादा वित्त सल्लागार आपला व्यवसाय निर्णय कसा घेतो या सगळ्याचा संबंध संस्कृतीशी आहे; पण फक्त तेवढय़ाशीच हा संबंध आहे, हे त्यांना मान्य नाही. सुसान यांच्या संस्थेला अनेक बँकांनी त्यांच्यासाठी सल्लागार म्हणून नेमलंय. असे अनेक सल्लागार, मार्गदर्शक बँकांनी या संस्कृती पाहणीला जुंपलेत. लाखो डॉलर्स या संस्कृती शोधावर खर्च होणारेत. अमेरिकेचे कॉम्प्ट्रोलर ऑफ करन्सी म्हणजे चलन व्यवहाराचे महालेखापाल थॉमस करी यांच्या मते संयत, जबाबदार व्यवस्थापनासाठी ते हाताळणाऱ्या व्यक्तींची संस्कृती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
अमेरिकी वित्तव्यवस्थेत सगळेच आता या संस्कृती-मूळ शोधनाच्या कार्याला लागलेत.
जे अमेरिकेत होतं त्याचं लोण आपल्याकडेही पसरतं.
खरा धोका, भीती आहे ती इथे.
कारण इतकी सांस्कृतिक विविधता असलेला आपला देश. त्या संस्कृतीच्या प्रांतवार पडलेल्या शाखा, त्याच्या भाषिक उपजाती, मग जात, जातींच्या उपजाती, पोटजाती. कसला गुंता आहे हा. त्याची अमेरिकेत सुरू आहे तशी चिरफाड सुरू झाली तर एका नव्याच वादाला तोंड फुटायचं.
म्हणजे एक नवीच मनुस्मृती तयार व्हायची. आणि तीसुद्धा जुन्या मनुस्मृतीच्या पायावरच. कारण तीत जन्माला येणाऱ्याची त्याचा धर्म आणि तो करणार असलेलं कर्म अशीच तर विभागणी केली गेलेली आहे.
आधुनिक जगावर या मनुस्मृतीची मागास छाया नको म्हणून कोण प्रयत्न केले आपल्यातल्या अनेकांनी. ते यशस्वी होतील असं आता कुठं वाटू लागलेलं असताना या नव्या प्रकारानं पुन्हा मनुस्मृतीचंच पुनरुज्जीवन होतंय की काय अशी भीती. कोण कोणाच्या पोटी, कोणत्या प्रांतात जन्माला आला त्याचं महत्त्व किती बाळगायचं?
या गुणसूत्रांच्या गाठी आता अधिकच घट्ट होणार का?
गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा