यंदाचा मान्सून हा उतावीळ मान्सून म्हणावा लागेल. तो वेळेवर आला आणि सगळा देश व्यापून टाकायला जणू आतुर होता.  जोरदार पावसाचे पर्व कधीही अव्याहत चालू शकत नाही आणि उघडीप पडतेच. आता प्रश्न उरला की, लवकर आलेला मान्सून लवकर परतेल का? याचे उत्तर हे आहे की, मान्सूनचा मागील इतिहास पाहिला तर या प्रकारचा कोणताही निष्कर्ष काढता येत नाही..
मनुष्य स्वभावत:च एक भित्रा प्राणी आहे. त्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते. आणि मन खंबीर केले, तरीसुद्धा निदान चिंता तरी वाटतच राहते. हायवेवर समोरून येणाऱ्या ट्रकची भीती, इंजेक्शन खूप टोचेल ही भीती, लिफ्टमध्ये एकटे अडकून पडायची भीती. ही यादी न संपणारी आहे. आता त्यात मान्सूनची भर पडली आहे. मान्सूनची कदाचित भीती वाटत नसेल, पण तो एक चिंतेचा विषय निश्चितपणे झाला आहे.
मे महिन्यापासूनच सगळ्यांचे डोळे मान्सूनकडे लागतात. १ जूनला भारतात काही लाखो लोकांचा वाढदिवस असू शकेल. किंवा ती त्यांच्या पगाराची तारीख असेल. पण ते आता महत्त्वाचे राहिलेले नाही. १ जूनला मान्सून केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे हजर होणार आहे की नाही याची चिंता सर्व भारतीयांना लागून राहते. तेवढेच नाही, तर तो लवकर येईल का, लवकर आला तर किती लवकर येईल, हे प्रश्न उपस्थित होतात. आणि मग आपल्या शहरातले रस्ते पाऊस झेलायला तयार आहेत का, ही चिंता सुरू होते. समजा मान्सून अंदमानच्या समुद्रात अगदी वेळेवर दाखल झाला. मग तो पुढे का सरकत नाही ही चिंता. तो सक्रिय का होत नाही? ‘एल-निनो’चे काय? असे अनेक प्रश्न विचारले जातात.
समजा कोणी भाकीत केले की, मान्सून यायला उशीर होणार आहे. मग धरणांचे साठे कधीपर्यंत पुरतील ही चिंता. दुष्काळी भागांचे आणखी हाल होणार का? या वर्षी तेथे पुन्हा दुष्काळ पडणार का, शहरात टँकर संस्कृती कायम राहणार का, असे दुसऱ्या प्रकारचे प्रश्न विचारणे सुरू होते. मे महिन्यात उकाडा वाढला की, ग्लोबल वॉìमगवाले बोलायला लागतात की, ‘आम्ही तर म्हणतच होतो, तापमान वाढतंय, पण कोणी ऐकायला तयारच नाही. हे असंच चालू राहिलं तर मान्सून गायब होईल बघा.’
पण अचानक वळवाच्या सरी पडतात. वातावरण आल्हाददायक होते. तापमान वाढीविषयी चर्चा बंद होते. पण ती दुसरे वळण घेते. मराठवाडय़ातच सारखी वीज का पडते? लोकांना आधी सूचित का केले जात नाही? आपले तंत्रज्ञान इतके मागासलेले का आहे? मग कुठे गारपीट होते. ती का झाली? आता आंबे महागणार का? सामान्य लोकांना आता आंबा कसा परवडणार? गारपिटीवर संशोधन का होत नाही? दुसऱ्या देशात गारा पडत नाहीत, आपल्याकडेच का? चिंता सुरूच राहते..
उतावीळ मान्सून
यंदाचा मान्सून अगदी वेळेवर तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाला. त्याच्या आगमनाबद्दल १५ दिवस आधी वर्तवलेला अंदाज पूर्णपणे खरा ठरला. एवढेच नाही, तर पुढे वाटचाल करण्यात त्याने कोणतीही दिरंगाई केली नाही. कोकणपट्टी, मुंबई महानगर, महाराष्ट्राचे दुष्काळी जिल्हे, राज्यातील धरणे, तलाव, सगळीकडे आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मान्सूनला धन्यवाद दिले पाहिजेत.
पण यंदाच्या मान्सूनचे आणखी एक वैशिष्टय़ हे की, त्याने संपूर्ण भारतावर अतिवेगाने कब्जा केला. सामान्यपणे, मान्सून दिल्लीला जूनच्या अखेरीस पोचतो. तेथून पुढे तो हळूहळू सरकतो आणि जुलच्या मध्यावर तो पश्चिम राजस्थानपर्यंत जातो. म्हणजेच मान्सूनला सबंध देश व्यापण्यासाठी १५ जुलची तारीख उजाडते. या वर्षी मान्सूनला एवढी घाई का झाली असावी, तो जेवढय़ा लवकर आला तेवढय़ाच लवकर तो माघार घेईल का, असा एक नवीन प्रश्न आता लोकांच्या मनात उद्भवला आहे.
दुसरा एक प्रश्न हा आहे की, जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे पुढे पावसाचे प्रमाण कमी होत जाईल का, की त्याचा जोर असाच टिकून राहील.. दोन्ही प्रश्नांची उत्तरे शोधणे फारसे अवघड नाही. सर्वात प्रथम हे ध्यानात घेतले पाहिजे की, गेल्या शंभर वर्षांच्या मान्सूनच्या आगमनाचा आणि प्रगतीचा आपण आढावा घेतला तर त्यातून हाच एक निष्कर्ष निघतो की, प्रत्येक वर्षीचा मान्सून हा कुठल्या न कुठल्या बाबतीत इतर सर्व मान्सूनपेक्षा निराळा होता. काही वर्षी, मान्सून घाईने व उत्साहाने देशात हजर झालेला आहे. काही वर्षी दुष्काळ पडला आहे, तर काही वर्षी अतिवृष्टी झालेली आहे आणि काही वर्षी त्याने परतण्याचे जणू नावच घेतलेले नाही.
यंदाचा मान्सून हा उतावीळ मान्सून म्हणावा लागेल. तो वेळेवर आला आणि सगळा भारत देश व्यापून टाकायला तो जणू आतुर होता. आता कल्पना करा की, महाराष्ट्रावर मान्सून १५ जूनऐवजी १५ जुलला दाखल झाला. काय होईल? निश्चितपणे दुष्काळ पडेल. पण याउलट, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशावर मान्सून १५ जुलऐवजी १५ जूनला पोहोचला तर काय होईल? फारसे काही नाही. याचे कारण असे की, राजस्थानचे सरासरी पर्जन्यमान २५०-३०० मिलिमीटर पेक्षाही कमी आहे. हा आकडा कधी कधी तर दोन-तीन जोरदार सरींमध्येच भरून निघतो. राजस्थान हे वाळवंट असले तरी तेथे जोरदार सरींनंतर पूरपरिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा राजस्थान-पाकिस्तान सीमेवर मान्सूनचे आगमन किती लवकर झाले किंवा किती उशिरा झाले हा मोठय़ा चिंतेचा विषय होत नाही.
आता उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या जबरदस्त पावसाचे बघा. तेथे मान्सून आला आणि नद्यांना महापूर आला, इमारती कोसळल्या, माणसे वाहून गेली, अनेक लोकांचा जीव गेला. हे सगळे मान्सूनच्या उतावीळपणामुळे घडले का? खरे तर, नाही. उत्तराखंड, हिमाचल, सिक्किम यांसारख्या डोंगराळ प्रदेशांचे हवामान निराळेच असते. तेथे मान्सून यायच्या आधीसुद्धा वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असतात आणि पाऊस पडत असतो. या डोंगराळ राज्यांत ढगफुटी आणि भूस्खलन मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर अशा दोन्ही ऋतूंतही होत असतात. तेव्हा महाराष्ट्रात मान्सून आल्यानंतर सगळे वातावरण जसे एकदम बदलून जाते तसा बदल भारताच्या उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशात मान्सूनच्या आगमनानंतर होत नाही. तेव्हा या वर्षी जसे घडले ते काही तरी भयंकर आहे, असे मानू नये. मान्सूनच्या विविधतेचे ते एक निराळे रूप आपण पाहिले एवढेच!
रेंगाळणारा मान्सून
महाराष्ट्रापुरते पाहिले तर आपल्याला १० जून ते १० ऑक्टोबपर्यंत म्हणजे चार महिने मान्सूनचा पाऊस मिळतो. पण या तारखा बांधलेल्या नाहीत. पूर्ण देशाकरिता जेव्हा आकडेवारी गोळा केली जाते आणि तिचे शास्त्रीय विश्लेषण केले जाते, तेव्हा १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडलेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस असा गणला जातो. या पद्धतीमुळे सांख्यिकी विश्लेषणामध्ये महाराष्ट्राच्या काही मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची गणना होते आणि उलट १ ऑक्टोबरनंतर पडलेला पाऊस विचारात घेतला जात नाही. आता हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, मान्सूनचा पाऊस हा कधीही आणि कुठेही चार महिने समप्रमाणात पडत नाही. पाऊस कधी कधी दमदार असतो, कधी संततधार. पण त्याला अधूनमधून विश्रांती घ्यावीच लागते. पिकांनाही त्यांच्या योग्य वाढीसाठी अशी उघडीप लागते. तेव्हा सध्या पावसाचा जो जोर आहे तो चारही महिने चालू राहण्याचे एक लक्षण आहे असे नाही. जोरदार पावसाचे पर्व कधीही अव्याहत चालू शकत नाही आणि उघडीप पडतेच. यात मान्सून बदलला असल्याचे कोणतेही संकेत नाहीत.
आता प्रश्न उरला की, लवकर आलेला मान्सून लवकर परतेल का? याचे उत्तर हे आहे की, मान्सूनचा मागील इतिहास पाहिला तर या प्रकारचा कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. मान्सूनच्या आगमनाच्या आणि माघारीच्या तारखांमध्ये सांख्यिकी सहसंबंध प्रस्थापित झालेले नाहीत. ही शक्यतापण नाकारता येणार नाही की, उतावीळ मान्सून कदाचित लवकर परतण्याचा विचार करणार नाही. आणि रेंगाळणारा मान्सून हासुद्धा चिंतेचा विषय नाही. कारण त्यामुळे धरणे भरलेली राहतात, जमिनीत पावसाचे पाणी अधिक जिरते, रब्बी उत्पादन भरपूर होते.
* लेखक भारतीय हवामान खात्याचे माजी महासंचालक आणि पुणे विद्यापीठातील इस्रो अध्यासनाचे माजी प्राध्यापक आहेत.     
त्यांचा ई-मेल: kelkar_rr@yahoo.com
उद्याच्या अंकात राजीव साने यांचे  ‘गल्लत, गफलत, गहजब’ हे सदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा