प्रकाशाच्या अंतराळात जाऊन आल्यावर आपल्याला अंधाराचंही महत्त्व कळतं, त्याबद्दलच्या या अनुभवाधारित नोंदी..
प्रकाशाला तरंगलांबी असते आणि त्यामुळे रंग दिसतात, हे मराठी शाळांमध्ये विज्ञान शिकलेल्यांना माहीत असेल. माहीत नसेल, तर मराठी विश्वकोश जरूर पाहा. निरनिराळय़ा तरंगलांब्यांचा म्हणजेच प्रकाशाचे रंग, हे विश्वकोशातून समजेल. विजेच्या दिव्यातून कृत्रिम प्रकाश पाडताना तो रंगीत करण्यासाठी अवघ्या पन्नासेक वर्षांपूर्वी दिव्याची काचच रंगीत केली जात असे. म्हणजेच, कृत्रिम रंगानं दिव्याच्या (कृत्रिम) प्रकाशाला अडवून, तो प्रकाश रंगीत केला जात असे. तसं आता होत नाही. एलईडी किंवा ‘लाइट एमिटिंग डायोड’ हे तंत्रज्ञान तर आपण दिवाळीत माळांसाठी वापरतो आणि पुढल्या दिवाळीपर्यंत माळ खराब झाली असल्यास फेकूनही देतो. पण १९६९ मध्ये रंगीत प्रकाश निर्माण करण्यासाठी जेम्स टरेल नामक अमेरिकी प्रकाश-चित्रकाराला थेट ‘नासा’ची मदत महत्त्वाची वाटली होती. नासानंही ‘आर्ट अँड टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट’ अशा नावाच्या, कला-तंत्रज्ञान सहयोग प्रकल्पाखाली ती मदत दिली होती. हा इतिहास सांगणारी जेम्स टरेलवरची दोन भलीमोठी कॉफीटेबल पुस्तकं आहेतच, पण गुगलमार्फतही हाच इतिहास समजू शकतो. तेव्हा आपण जरा पुढे जाऊ आणि जेम्स टरेलच्या ‘टिपिकल’ प्रकाशरचनांचा अनुभव मराठी माणसाला कसा येऊ शकतो हे पाहू, कारण ते गुगलवरून सापडेलच असं नाही.
सात-आठ पायऱ्या चढून गेल्यावर, साधारण अध्र्याव्व्या किंवा पाउणाव्व्या मजल्याइतक्या उंचीची एक खोली. तिच्यावर बहुतेक रंगीत काच बसवलीय. तो दर्शनी भाग समोरून फार वेळ कुणाला पाहूच देत नाहियेत व्हेनिसच्या ५४व्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनातले रखवालदार! हे रखवालदार म्हणतात, लायनीत उभं राहा. ही रांग खोलीच्या एका बाजूला, तिथून पायऱ्या दिसणं शक्य नाही. रांगेतून अखेर आपल्याला पायऱ्या चढण्याची संधी येते आणि अखेरच्या पायरीवर जाताच समजतं, एक बाजू संपूर्ण उघडी आहे या खोलीची. काचबीच काहीही नाही. रंगीत प्रकाशानं खोलीचा उंबरा अजिबात ओलांडलेला नाही. आता आपल्याला सर्वात मागची भिंतही दिसू लागली आहे. तिथं निराळय़ाच रंगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश काहीसा फिकट छटेचा असल्यामुळे असेल पण, रंगखोलीच्या मध्यभागी जाईस्तो मितीचं – डायमेन्शनचं आपल्याला एरवी असलेलं भानच बदलतंय. ती खोली चांगलीच लांबलचक आहे, पण अशा लांब दालनांच्या मागच्या भिंतीकडे पाहताना खोलीच्या अन्य भिंती निमुळत्या होत गेल्याचा जो भास होतो (आणि हाच जो भास रेखांकनकला शिकवताना मराठीत ‘यथार्थदर्शन’ म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह म्हणवला जातो) ते ‘यथार्थदर्शन’ घडणं बंद झालंय. असं का झालंय? हां.. खोलीच्या भिंतींना करकरीत कडाच नाहीत, भिंत जिथे जमिनीला मिळते तिथे पाय ठेवलात तर (अनवाणी पायानं किंवा फक्त मोजे घालूनच इथं प्रवेश केल्यानं पाय ठेवणं शक्य आहे,) गोलाई कळतेय. तरीदेखील खोली अशी विशाल, अथांग का वाटते आहे? मागची भिंत जास्त प्रकाशमान असेल, तर फारतर ती खिडकीसारखी वाटली पाहिजे.. तसं न होता खोली, ती तथाकल्पित खिडकी आणि त्याच्या पलीकडचा अवकाश अशी जी काही आपली एरवीची कल्पना असते ती पार उडून कशामुळे जातेय इथं? इथं हे असं काय होतंय? अवकाश म्हणजे खोलीच, शेवटी जी भिंत असली पाहिजे तिथूनच अवकाश खोलीत येतोय अणि अख्खी खोली रंगीत अंतराळासारखी करून टाकतोय, असं का वाटू लागलं? अंतराळ फक्त टीव्हीवर पाहिलाय, त्या अनुभवाची कल्पनाच केलीय.. हे आणि एवढंच खरं असताना, शिवाय आपले पाय जमिनीवरच असताना का सुचायला लागलं असलं काही? प्रकाशाचे रंग बदलू लागले आहेत.. गुलबक्षी, झेंडू, सदाफुली या नेहमीच्या महाराष्ट्रीय फुलांमधून जर प्रकाश पाझरला असता आणि खोलीच त्या प्रकाशाची झाली असती तर जसं होईल, तसं हे आहे. आता आपण त्या अंतराळखिडकी भासणाऱ्या भिंतीच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलो आहोत आणि तिकडली सुरक्षारक्षक आपल्याला अडवतेय. पुढं नाही जायचं. अगदी जपून जा. होय. होय. पुढे खोल खड्डा आहे. आपण जिथून शिरलो तिथं खोली जशी भक्क उघडी होती, तशीच ती शेवटीही आहे. आहे भिंत, पण किमान सात फूट लांब आहे. सात फूट रुंद, खोलीच्या रुंदीएवढय़ा लांबीचा आणि दहाहून अधिक फूट खोल असा तो खड्डा प्रकाशानं पूर्ण भरलाय. डोहासारखा. खोलीची ती मापं तिथून बाहेर पडल्यावर बुटांचे बंद बांधताना, कॅमेरा व बॅग परत घेताना लक्षात आली.
तो जो गोंधळ मघाशी केलेल्या वर्णनात होता, तो ‘खरा’ होता. त्याच्या खरेपणामागचं सत्य हे रोजच्या वास्तवातलं ‘यथार्थ’ सत्य असतं. पण जेम्स टरेलच्या त्या खोलीनं नेहमीच्या वास्तवापासून आपल्याला दूर नेलं. त्या खोलीत कोणत्याही अवरोधाविना, पूर्णत: बंधमुक्त असा प्रकाशच प्रकाश आपण पाहिला आणि मग दिशांचं, लांबीरुंदीचं भान हरपलंच. तरंगलांब्या बदलत होत्या, पण प्रकाशाचा अथांगपणा मात्र मुद्दामहून घडवून आणलेला असल्यामुळेच बहुधा, फार परिणामकारकरीत्या जाणवत होता.
हे प्रकाशाच्या खोलीचे खेळ जेम्स टरेल १९९९ पासून इथे ना तिथे, या ना त्या प्रकारे करतोच आहे. कधीतरी त्यानं पूर्ण अंडाकृती आकाराची खोली केली होती. पण मागच्या भिंतीऐवजी प्रकाशाचा डोहच, हे मात्र कमी ठिकाणी केलं. हा तपशील बाजूला ठेवला, तर अनुभवातून काय शिकायला मिळेल?
अनुभव प्रकाशाचा होता आणि मुख्य म्हणजे, फक्त प्रकाशच असल्यामुळे (औषधालाही सावली नसल्यामुळे) झालेल्या गोंधळाचाही होता. म्हणजेच उलटं असं की, प्रकाशाला सावल्यांची जोड असेल तर आपण जे पाहतोय त्यातल्या खाचाखोचा कळतात. गोंधळ कमी होतो. स्पष्टता येते. छायाप्रकाशाचा खेळ आणि त्यातला प्रकाशित- अप्रकाशित भागांचा तोल, यामुळे चित्राकडे लक्ष वेधलं जातं. हेच फोटोग्राफीबद्दलही खरं आहे. मराठीत ‘छायाचित्रणा’बद्दल फारच खरं! फोटो-ग्राफी हे प्रकाश-अंकनाचं तंत्र वापरून केलेलं चित्र असतं, म्हणून त्याला काही जण ‘प्रकाशचित्र’ म्हणतात. पण फोटोग्राफी जेव्हा कला ठरते, तेव्हा ती सावल्यांचा खेळ/मेळ कसा दाखवते आहे हे महत्त्वाचं ठरणारच, हे अशा – प्रकाशचित्र या शब्दाचा आग्रह धरणाऱ्या- लोकांनाही योग्यरीत्या माहीत असतं.
रंगवलेल्या चित्रातून ‘यथार्थदर्शन’ घडवू पाहण्याची सुरुवात युरोपमध्ये झाली आणि (त्याआधीपासून) भारतीय वा आशियाई चित्रांनी यथार्थदर्शनाऐवजी फार निराळय़ा वाटा शोधल्या, हा इतिहास आहे. मात्र फोटोग्राफीचा इतिहास घडला (किंवा कॅमेरा ऑब्स्क्युरा ही पहिली चित्रांकनखोली पहिल्यांदा घडवली गेली) ती युरोपीयांच्या ‘हुबेहूबपणा’च्या सोसापायी. कॅमेरा येण्याच्या आधी हुबेहूबपणा दाखवण्याची जी काही तंत्रं आणि ज्या शैली युरोपीय चित्रकारांनी शोधून काढल्या होत्या, त्यात राफाएल आणि लिओनादरे या १६व्या शतकातल्या इटालियनांच्या बरोबरीनं (त्यांच्यानंतर १०० वर्षांनी आलेल्या)
रेम्ब्रां या डच चित्रकाराचं नाव घेतलं जातं. रेम्ब्रांनं अंधाराचा योग्य वापर नाटय़मयतेसाठी करून घेतला, व्यक्तिचित्रांतसुद्धा चेहऱ्याच्या अध्र्याच भागावर प्रकाश दाखवून त्यानं दोन प्रमुख परिणाम साधले : एक ‘जिवंतपणा’च्या नाटय़मय प्रत्ययाचा, आणि दुसरा ‘खोली, मिती, अवकाश’ वगैरेचा प्रत्यय तातडीनं प्रेक्षकाला देण्याचा. हे दोन्ही परिणाम महत्त्वाचेच आहेत, असं आजवरचं जग मानतं. चित्रपटांत आणि फॅशन फोटोग्राफीतही हा ‘रेम्ब्रां लाइट’ (खरंतर रेम्ब्रांचा अंधारच) आजदेखील वापरात आहे.
आपला आत्ताचा मुद्दा एवढाच आहे की, प्रकाशाचे डोही प्रकाशतरंग असा अनुभव ‘अलौकिक’ असतोच, पण लौकिक जगात प्रकाशाइतकाच अंधारही महत्त्वाचा असतो. अर्थात, हे जेम्स टरेललाही एरवी माहीत आहे.
प्रकाशाचे डोही, प्रकाशतरंग..
प्रकाशाच्या अंतराळात जाऊन आल्यावर आपल्याला अंधाराचंही महत्त्व कळतं, त्याबद्दलच्या या अनुभवाधारित नोंदी..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-11-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व कलाभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of darkness comes out of light