‘तारे’वरची कसरत संपणार! हा सुहास जोशी यांचा बातमीवजा लेख वाचण्यात आला ( १६ जून) आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
१९७२ मध्ये पुणे येथून टेलिग्राफ प्रक्षिण संपवून मुंबईतील सी.टी.ओ. सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस येथे टेलिग्राफिस्ट म्हणून रुजू झालो. १९७२ ते १९७६ अशी नोकरी करून पुढे त्याच अनुभवावरून इंडियन एअरलाइन्समध्ये टेलिप्रिंटर ऑपरेटर म्हणून निवड झाली व शेवटी ३६ वर्षांच्या एअर इंडियाच्या नोकरीनंतर एअरपोर्ट प्रबंधक म्हणून निवृत्त झालो.
खरोखरच सुहास जोशी यांनी लिहिल्याप्रमाणे हा एक कारखानाच होता.. २० वर्षांचे वय, पण टेलिग्राफिस्ट म्हणून आमचा एक वेगळाच रुबाब होता. आमच्यात काही विशेष गुण आहेत व पूर्ण शक्ती लावून आम्ही या कामात पूर्णत: झोकून द्यायचो. सी.टी.ओ. ही एक ‘हेरिटेज’ इमारत आहे आणि हुतात्मा चौक अगदी कोर्टाच्या बाजूलाच आजही अगदी अभिमानाने व ताठ मानेने उभी आहे व त्याला आम्ही आजही ‘सलाम’ करतो. चोवीस तास आम्ही तत्पर असायचो. यंत्राचा खडखडाट हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता व हा खडखडाट नसून आमच्या जीवनाचे संगीत होते. मोर्स कोड ही आमची विशेषता होती व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असायचा व आजही आम्हाला ती कला येते आम्ही जे टेलिप्रिन्टर वापरायचो ते ब्लाइंड टेलिप्रिंटर असायचे म्हणजे आम्ही जे टाइप करणार ते दुसऱ्या शहरातील सी.टी.ओ. किंवा तार कार्यालयात टाइप होणार व हीच आमची कुशलता होती. कीबोर्डवर बोटं इतक्या सफाईने फिरायची की त्यातून सुमधुर संगीताची अनुभती यायची . खरोखरच आमच्या जीवनातील तो सुवर्णकाळ होता. एका तासाला मी १०० तारा पाठवायचो व त्याकरिता मला एक साहाय्यक मिळायचा. त्याला आम्ही ‘मार्कर’ म्हणायचो जो पाठवलेल्या तारेचे योग्य जतन करून त्याचा रेकॉर्ड ठेवायचा. पगारापेक्षा इन्सेटिव्ह जास्त मिळायचे व दर महिन्याच्या १० तारखेला करकरीत नवीन नोटा मिळायच्या. सी.टी.ओ.ला आम्ही ‘पैशाचे झाड’ म्हणायचो. अगदी आठवडय़ाचा अवकाश किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशीही तुम्ही कामावर जाऊन इन्सेटिव्ह कमावू शकत होता.
एक टेलिग्राफिस्ट म्हणून आमचे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीशी भावनिक नाते जोडलेले होते. लग्न, जन्म, जन्मदिवसाच्या शुभेच्छा, बढती-बदली, पुरस्कार. पण मृत्यूची बातमी टाइप करताना बोटं काही काळ का होईना आपोआप थांबायची. बँकांच्या हुंडी, शेअर बाजार व इतर आर्थिक संदेश देवाणघेवाणीचे काम सतत चालायचे. मी टेलिग्राफिस्ट होतो याचा आजही सार्थ अभिमान आहे व या पोस्टने पुढे आमचे जीवन ‘समृद्ध’ केले व याच पुंजीच्या आधारावर आम्ही जीवनात खूप कमावले ते भावनिक, आर्थिक व अनुभव. खरोखरच आम्ही ‘तारे’वरची कसरत करीत जीवनात मान-सन्मान मिळवत समृद्ध व संपन्न, समाधानी जीवन निवृत्तीनंतरही उपभोगत आहोत.
टेलिग्राफिस्टचा रुबाब
‘तारे’वरची कसरत संपणार! हा सुहास जोशी यांचा बातमीवजा लेख वाचण्यात आला ( १६ जून) आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
First published on: 28-06-2013 at 02:51 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impression of telegraphist