‘समाजचित्रे’ या शब्दाचा चित्रकलेशी संबंध नाही! हा शब्द मूळचा साहित्यातला. पण ही खास मराठी संकल्पना आपण चित्रांना किंवा एकूण दृश्यकलेला लावू शकतो की नाही, याच्या तपशीलवार शोधाची ही सुरुवात..

या मजकुराची सुरुवातच ‘मुद्रितशोधक बंधूंसाठी सूचना : समाज आणि चित्र हे दोन शब्द इथे मुद्दामच एक केले असून कृपया त्यात शब्दावकाश सोडू नये’ अशी असायला हवी. विजय तेंडुलकरांनी संपादित केलेल्या ‘जाहीरनामा’ या दिवाळी अंकात ‘समाजचित्रे’ हा खास विभाग होता आणि त्या विभागात सगळी व्यक्तिचित्रंच होती, तरीदेखील तेंडुलकरांनी त्याला ‘समाजचित्रे’ म्हटलं होतं. या व्यक्ती अशा आहेत, कारण त्या अमुक समाजाचा भाग आहेत म्हणून! तेव्हा तो समाज तुम्हाला या व्यक्तींमधून दिसावा, अशी त्यामागची भूमिका आणि अपेक्षा होती. तेंडुलकरांची मोडतोड, तेंडुलकरांच्या शब्दांना आणि त्यामागच्या हेतूंना चुकीच्या अर्थानं घेणं हा वारसा आपणा मराठीभाषकांना आपली इच्छा असो-नसो, कधी काळी मिळालेलाच असल्यानं आपण आता इथे या क्षणी ‘समाजचित्रे’ या शब्दाचा चुकीचा अर्थ आपल्या सोयीसाठी लावू, तो असा : चित्र किंवा छायाचित्र जेव्हा ओळखू न येण्याजोग्या व्यक्तीचं असतं, तेव्हा त्या व्यक्तीची वैशिष्टय़ं, व्यक्तीचं स्वभावदर्शन वगैरे चित्रातून घडावं या प्रकारच्या (एरवी चांगल्या व्यक्तिचित्राच्या उचित आस्वादासाठी योग्य ठरणाऱ्या) अपेक्षा आपल्यापुरत्या फोल ठरतात. ‘कुठल्याशा नवाबाचा फोटो’ किंवा ‘पुस्तक वाचणारा धोतर-टोपीवाला, म्हणजेच जुन्या पिढीतला मुलगा’ हेच आपल्याला समजतं. याचा अर्थ, व्यक्तीच्या माहितीऐवजी सामाजिक स्थितीची माहिती आपल्याला जास्त असते! त्यापुढे असं की, चित्रकारानंही त्याला अनोळखी असलेल्या व्यक्तीचं चित्र काढलं असेल, तर? तर एक म्हणजे ते गुणसमुच्चयाचं शिल्प असतं :  म्हणून मग, ‘दरिद्रीनारायण’ किंवा ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पकृतींसाठी मॉडेल कोणत्या व्यक्ती होत्या, याबाबतच्या किश्शांपेक्षा किंवा ‘ही तर अभ्यासशिल्पं’ अशा मूल्यमापनापेक्षा ही शिल्पं आजही प्रेक्षकाच्या मनात तोच भाव पोहोचवू शकतात, हे महत्त्वाचं ठरतं. दुसरा प्रकार म्हणजे, हे गुणांचं / प्रवृत्तीचं चित्र नसून सामाजिक स्थितीचंच चित्र आहे आणि मानवाकृती दिसते आहे ती अमुक सामाजिक स्थिती दाखवण्यासाठी आवश्यक म्हणूनच, हा. (याचं उदाहरण म्हणून पिकासोचं ‘ल दम्वाझेल द ला आव्हियाँ’ डोळय़ासमोर वा गुगलवर आणा). या प्रकारची सर्व चित्रं एका अर्थानं, ‘समाजचित्रं’च.
मग मुद्दाम एखाद्या चित्राला ‘समाजचित्र’ ठरवायचंच कशाकरता?
याच्या उत्तरासाठी आपण या आणि पुढल्या तीन-चार आठवडय़ांत मात्र, व्यवच्छेदकपणे ‘समाजचित्र’ ठरलेल्या चित्रांचा, फोटोंचा, मांडणशिल्पांचा विचार करू. ‘समाजचित्र’ हा एका मराठी लेखकानं केलेला मराठी शब्द आहे, त्या शब्दानं ‘व्यक्तिचित्र’ या लेखनप्रकाराबाबतचं साहित्यभान नक्कीच वाढवलेलं आहे. तो व्यापक अर्थानं, दृश्यकलेला कुठेकुठे लागू पडेल, याची नेमकी उदाहरणं आपण पाहू. त्यातून कदाचित ‘समाजचित्र’ ही तेंडुलकरी संकल्पना आणखी विस्तारेल.
थोडक्यात असं की, कोणती चित्रं ‘समाजचित्रं’ ठरतात, हे मोडतोड न करताही समजून घेता येईलच, तसंच आपण करू.
रस्त्यात मरून पडलेल्या माणसाचा एक फोटो, त्यावरनं झालेलं शल्प आणि त्याभोवती असलेलं मांडणशिल्प असं एक प्रदर्शन १९९६ साली विवान सुंदरम यांनी मुंबईत केलं होतं. तेही कुठे? तर राणीबागेच्या पलीकडे घोडपदेव भागाकडे जाणाऱ्या ज्या गल्ल्या आहेत, तिथल्या एका गोदामात! हे गोदाम तात्पुरतं वातानुकूलित करून, तिथल्या भिंती पांढऱ्याधोप करून गॅलरी उभारण्यात आली होती. अशा ठिकाणी लोक अधिक यावेत, असं चित्रकार विवान यांना मनापासून वाटत होतं. समाजानं या प्रदर्शनातून स्वत:ला पाहावं असा हेतू होता यामागे. त्यातही मुंबईकर स्वत:ला पाहू शकताहेत का, हे जाणण्याची ओढ अधिक होती. याचं कारणही तसंच होतं. मुंबईच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका तीनकॉलमी फोटोनं दिल्लीकर विवान सुंदरम यांना अस्वस्थ केलं होतं आणि त्या अस्वस्थतेतून एक ‘समाजचित्र’ तयार झालं होतं..
‘कुणीही एकजण असा मरून पडू शकतो’ हे १९९३ च्या मार्चमध्येच विवानसकट सर्वाना दिसलं होतं. आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी. पण विवान यांचं प्रदर्शन मुंबईत होण्यासाठी तीन र्वष गेली (त्याआधी दिल्लीत हा फोटो विवाननं मांडला, पण ते केवळ प्रतिक्रियावजा होतं). हा भररस्त्यात मरून पडलेला माणूस काही ‘चुकून भलत्याऐवजी’ वगैरे मारला गेला नव्हता. तो दंगलबळी होता. म्हणजे तो एकतर या गटाचा असणार नाहीतर त्या. किंवा कुठल्याच गटाचा नसूनसुद्धा त्याच्यावरला जन्मदत्त शिक्का त्याला मृत्यूकडे घेऊन गेला. तो नायक नाही. खलनायकही नाही. प्रतिनिधी मात्र नक्की आहे. कशाचा?
कुठल्याही जिवंत माणसाचा. जिवंत राहू इच्छिणारा आणि आता मेलेला माणूस. हे उत्तर विवान सुंदरम यांच्या प्रदर्शनातून सहज मिळत होतं. हा एकच फोटो संगणकाद्वारे मोठा करून, त्याच्या प्रत्येक प्रतीवर निरनिराळं काम विवान यांनी केलं होतं. एकावर पुष्पचक्र होतं, एकावर चिता, एकावर कबर, आणखी एकावर तर भीष्माचार्याच्या शरपंजरासारखा खिळय़ांचा पंजरही होता. फोटोतून बाहेर आलेले शरपंजरासारखे खिळे. ते चित्र सोबत आहे.
पण हे एवढंच नव्हतं. त्या माणसाला घर असेल, घरात पहुडलेला, निद्राधीन झालेला तो असाच दिसत असेल, हेदेखील विवानमुळे आपण त्या प्रदर्शनात पाहू शकत होतो.
रस्त्यात पडलेल्या त्या माणसाचं नाव आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण त्याला पाहून अस्वस्थ होत नाही, असं आहे का? हा प्रश्न समाजाला विचारण्यात विवान सुंदरम यशस्वी झाल्याचा अनुभव हे प्रदर्शन पाहणाऱ्यांना आला होता. म्हणजेच त्याआधीचा अनुभव असा की, ‘आपण इथं फक्त आर्ट एक्झिबिशन बघायला आलोत’ हे व्यवधान प्रदर्शन पाहताना गळून पडत होतं आणि ‘आपण जो फोटो कदाचित पेपरात पाहून सोडून दिला असता, तो यापुढे विसरणं शक्य नाही’ अशी कबुली नकळत मिळत होती. ‘आपण या समाजाचा भाग आहोत, जिथे भररस्त्यात कुणीतरी मारलेल्या माणसाचं नाव आपल्याला माहीत नसलं तर आपल्याला काही वाटत नाही’ याचीही जाणीव डाचत होती.. ते प्रदर्शन पाहताना!
हे अख्खं प्रदर्शन मांडणशिल्पासारखंच होतं. भिंतीवर फोटो होते खरे, पण आत त्या माणसाच्या ‘घरा’च्या जवळपास जाण्यासाठी प्रेक्षकांना लोखंडी आडकाठय़ांमधून वळून जावं लागत होतं. बाहेर पडण्याच्या मार्गावर ट्रंक-पेटय़ा एकमेकींवर रचून केलेलं एक दारासारखं होतं. ‘मुंबई सोडून गावोगावी गेलेल्या श्रमिकांची आठवण’ असं याबद्दल विवान सुंदरम म्हणाले होते; पण कुठलंही शहर- तिथं येणारे वा तिथून परागंदा व्हावं लागलेले श्रमिक- त्यांच्यासाठी त्या शहराचं दार हे असंच असेल!
वीस वर्षांपूर्वीचा तो फोटो आणि सतरा वर्षांमागचं ते प्रदर्शन, यांच्या आठवणी अनुभवाधारित आहेत, म्हणून इथं विस्तारानं सांगितल्या. ‘प्रतिमा प्रचीती’ नावाचं नितीन दादरावाला यांचं छायाचित्रांच्या जागतिक इतिहासाचे टप्पे मांडणारं पुस्तक आहे, त्यातले काही फोटो इतकेच अस्वस्थ करणारे आहेत आणि ‘एक समाज म्हणून या क्रौर्याला, या हिंसेला आपण काय प्रतिसाद देतो?’ हा प्रश्नही यापैकी बरेच फोटो विचारतात.
आपला मूळ विषय होता, दृश्यकलेत ‘समाजचित्र’ कशाला म्हणावं हा. ‘समाजाच्या प्रतिनिधीचं चित्र’ म्हणून समाजचित्र असं म्हणण्यापेक्षा ‘समाजाला, समाज म्हणून काही प्रश्न विचारण्याच्या हेतूनं केलेली दृश्यकला’ म्हणजे समाजचित्र, असं मानण्याची दिशा आपल्याला विवानच्या त्या प्रदर्शनानं नीटसपणे दाखवली होती, म्हणून त्या प्रदर्शनाची आठवण इथं सविस्तर काढली.
समाजाला चित्रं आणखी कोणते प्रश्न विचारू शकतात, हे पुढं पाहूच.

Story img Loader