मेहनतीला प्रामाणिकपणाची जोड दिली तर कसा सकारात्मक बदल होतो, याची दोन समूह पातळीवरील आणि एक वैयक्तिक पातळीवरील उदाहरणं म्हणून या तिन्ही पुस्तकांकडे पाहता येतं.
शैला अनरेपाऊलस या पत्रकार महिलेने ग्रामीण भागातील महिलांना स्कूटर मिळाल्यानंतर खेडी कशा प्रकारे बदलली याची सत्यकहाणी ‘सारीज् ऑन स्कूटर्स- हाऊ मायक्रोक्रेडिट इज चेंजिंग व्हिलेज इंडिया’ या पुस्तकात सांगितली आहे. फ्रान्स, ग्रीस, स्वित्र्झलड, चीन आणि भारत या देशांमधून मुक्त पत्रकारिता करणाऱ्या शैला यांनी २१ महिने आंध्र प्रदेशातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेडय़ांमध्ये फिरून हे पुस्तक लिहिलं आहे. खेडय़ांतील सर्वसामान्य महिलांनी अल्पबचतीतून स्वत:चे व्यवसाय कसे सुरू केले आणि त्यामुळे सामाजिक परिवर्तन कसं घडलं, याची यशोगाथा यात सांगितली आहे. २००१ ते २००२ या काळात म्हणजे उदारीकरणानंतर, म्हणजे बरोबर दहा वर्षांनंतरच्या ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनाची ही हकिकत आहे. ती प्रेरक आणि सर्वच महिलांना आत्मविश्वास मिळवून देणारी आहे. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर विठ्ठल राजन यांनी स्थापन केलेल्या डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीच्या ७० खेडय़ांतील पाच हजार दलित स्त्रियांची ही गोष्ट आहे. अशी पुस्तकं केवळ एक वेळ वाचण्यासाठीच असतात. कारण असे एनजीओटाइप प्रयोग कितीही लोभस आणि आकर्षक वाटत असले तरी ते प्रयोग म्हणूनच ठीक असतात. त्यांची कलमं इतर ठिकाणी लावता येत नाहीत. पण आंध्र प्रदेशात हा प्रयोग यशस्वी झालेला आहे हेही तितकंच खरं. त्या दृष्टीनेच या पुस्तकाकडे पाहायला हवे.शोभा बोंद्रे यांनी ‘मुंबईज् डब्बावाला- द अनकॉमन स्टोरी ऑफ द कॉमन मॅन’मध्ये मुंबईतल्या डबेवाल्यांचं व्यवस्थापनशास्त्र उलगडून दाखवलं आहे. बोंद्रे यांचं हे पुस्तक आधी मराठीमध्ये प्रकाशित झालं होतं. काही वर्षांपूर्वी लंडनचे प्रिन्स चार्ल्स भारतभेटीवर आले तेव्हा त्यांनी मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं होतं. तेव्हा हे डबेवाले एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचाच हा शलाका वाळिंबे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद आहे. ५००० माणसं अवघ्या तीन तासांत दोन लाख जेवणाचे डबे मुंबईभर घरांपासून ते ऑफिसेसपर्यंत कसे पोहचवतात, याचा हा आढावा आहे. समन्वय, तत्परता, प्रामाणिकपणा आणि कष्ट या व्यावसायिक गुणांचं उत्तम उदाहरण म्हणून आणि व्यवसायाचं यशस्वी गमक म्हणून  या डबावाला संघटनेकडे अनेक व्यवस्थापनतज्ज्ञ पाहतात. या गमकाचा रहस्यभेद बोंद्रे यांनी या पुस्तकात केला आहे. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात स्वस्त दरात घरगुती जेवण वेळेत देण्यामागची निकड जाणून ते यशस्वीपणे पार पाडणाऱ्या संघटनेचं कौतुक होणारच, व्हायलाही हवं.
सिक्स सिग्मा या व्यवस्थापनशास्त्रातल्या संकल्पनेचा हल्ली बराच गवगवा केला जातो. या मॉडेलचा वापर देशपांडेनामक एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नातही केल्याचा आणि त्याचा त्यांना चांगला फायदा झाल्याचा उल्लेख लेखिकेने केला आहे. या मॉडेलविषयी एक स्वतंत्र प्रकरण आहे. प्रिन्स चार्ल्स यांची भेट आणि त्यानंतरचं त्यांचं डबेवाल्यांविषयीचं अगत्य याविषयी लेखिकेने दोन प्रकरणं लिहिली आहेत. छोटय़ा छोटय़ा २६ प्रकरणांतून ही कहाणी उलगडत जाते.
तिसरं व शेवटचं पुस्तक हे ‘केसरी ट्रॅव्हल्स’च्या केसरी पाटील यांचं आत्मचरित्र आहे. याचं उपशीर्षक आहे, ‘मेमरीज ऑफ अ सक्सेसफुल पायोनिअर ऑफ इंडियन टूरिझम’. हेही पुस्तक मराठीतून इंग्रजीत अनुवादित केलेलं आहे. केसरी ट्रॅव्हल्सच्या विभाजनाचा इतिहास ताजा आहे. कारण ती काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. पण मुळात केसरी पाटील यांना केसरी ट्रॅव्हल्सची कल्पना सुचली कशी, त्यांनी कशी सुरुवात केली, त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचा विश्वास कसा संपादन केला आणि आपल्या यशाची कमान कशा प्रकारे चढती ठेवली, याचा सुरुवातीपासूनचा इतिहास या पुस्तकातून जाणून घेता येतो. पालघर तालुक्यातील एका सामान्य खेडय़ात जन्मलेले पाटील कल्पकतेच्या आणि कष्टाच्या जोरावर कुठपर्यंत पोहचले, याची ही कहाणी रोचक आहे.खरं तर हे पाटील यांचं आत्मचरित्र, त्यामुळे आधीच्या दोन्ही पुस्तकांपेक्षा या पुस्तकाची शैली वेगळी आहे. पण हेही पुस्तक निदान एकदा वाचावं असं आहे, हे नक्की.
ही तीन पुस्तकं, तीन वेगवेगळ्या विषयांची. पण त्यांच्यामध्ये एक समान गोष्ट आहे. आणि ती म्हणजे कल्पकतेला मेहनतीची जोड देत अविरत प्रयत्न केले तर एक दिवस यश मिळतं आणि यश मिळाल्यावर त्यातच केवळ समाधान न मानता आपली निष्ठा शाबूत ठेवली तर ते इतरांसाठी प्रेरक आणि काही प्रमाणात मार्गदर्शक उदाहरणही ठरतं. या तिन्ही पुस्तकांतील सत्य कहाण्या तेच तर सांगू पाहत आहेत.

सारीज ऑन स्कूटर्स : शैला मॅकलोओड अर्नोपाऊलस,
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
पाने : ३४८,
किंमत : ३९५ रुपये.

अ जर्नी कॉल्ड लाइफ : केसरी पाटील,
अमेय प्रकाशन, पुणे,
पाने : २३६,
किंमत : ३३० रुपये.

मुंबईज् डब्बावाला : शोभा बोंद्रे,
वेस्टलँड, नवी दिल्ली,
पाने : १८५,
किंमत : २५० रुपये.

Story img Loader