रस्त्यावरच्या गुलमोहराला लालकेशरी फुलांचा भरघोस मोहोर आला आहे, नखशिखान्त बहरलेला बाहवा पिवळ्याजर्द फुलांची मिजास मिरवत रस्त्यारस्त्यांवर हळदी रंगाचा सडा शिंपू लागला आहे. गावाकडच्या आंब्याच्या डेरेदार झाडांवरच्या हिरव्याकंच कैऱ्यांनाही शेंदरी झाक चढली आहे, जुनाट झाडांची पिकली पाने गळून जाऊन त्यांना हिरवाईचा कोवळा साज चढला आहे.. एखाद्या हिरव्यागार झाडाच्या फांदीआड दडलेल्या कोकिळाच्या सुरांना दाद देण्यासाठी डोलू पाहणारी पानं मात्र कोमेजल्यागत झाली आहेत.. रणरणत्या उन्हाच्या झळा झेलत, वाऱ्याची एखादी कोवळी झुळूक अंगावर यावी म्हणून ताटकळत बसलेल्या फांद्या मलूल पडल्या आहेत आणि चिवचिवाट, कलकलाट करीत धमाल करणारी चिमण्या-पाखरंही पंख मुडपून सावलीला विसावली आहेत. संचारबंदी जारी व्हावी असा सन्नाटा सर्वत्र पसरल्याने वर्दळ संथ होऊन रस्तेही सुनसान झाले आहेत आणि दिवसभर सूर्याला पाठीवर घेऊन धावणारी महानगरे उन्हाळ्याच्या काहिलीने सर्द झाली आहेत.. रस्त्याकडेच्या एखाद्या हातगाडीवर कापून ठेवलेल्या कलिंगडांच्या लालबुंद फोडी शुष्कपणे गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत रखडल्या आहेत, तर रसायनाच्या पुडीमुळे गुदमरून सक्तीने पिवळे पडलेल्या आंब्यांची शहरी मजा अनुभवण्याचा उत्साहदेखील हरवू लागला आहे. गावाकडचं कैरीचं पन्हं, गवताच्या आढीतून घमघमणारा पिकलेल्या आंब्यांचा गंध, एखाद्या शांत, निवांत झाडाच्या डेरेदार सावलीत बसून वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत पहुडण्याचा आनंद, सारं जणू आठवणीपुरतं उरत चाललं आहे.. कारण एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ातच अचानक तापलेला उन्हाळा!.. खरं म्हणजे, ‘नेमेचि येणारा’ काही फक्त पावसाळाच नसतो. उन्हाळादेखील ‘नेमेचि येणारा’च  असतो आणि या हंगामातही ‘सृष्टीचं कौतुक’ ओसंडून वाहत असतं. फक्त, ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि त्याचा आनंद उपभोगण्यासाठी मनाला लागणारे स्वास्थ्य मात्र, उन्हाच्या काहिलीत करपलेलं असतं. ‘यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे’.. असे बोल प्रत्येक उन्हाळ्यात, अंगावरचा घाम पुसणाऱ्या अनेकांच्या तोंडी दिवसातून एकदा तरी आलेच पाहिजेत, हेही ठरलेलंच असतं. राजकारण तापलंय, निवडणुकांचे वारे अजूनही शमलेले नाहीत, त्याची चर्चा सुरू असताना एखाद्यानं केवळ विषयांतरापुरती उन्हाळ्याची आठवण काढली, तरी गप्पांचा सारा माहोल उन्हाळ्यावरच येऊन थांबतो.. मग वर्तमानपत्रांची पाने चाळून तापमानाचे आकडे शोधण्याची घाई होते आणि काल अनुभवलेला उन्हाळा मोसमातील सर्वाधिक तापमानाचा होता, असं लक्षात आलं, की पंख्याखाली असतानाही घामाघूम झाल्यासारखं वाटू लागतं.. वर्तमानपत्राचे ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’सारखे मथळे खुणावू लागतात आणि ‘काय करावे, काय करू नये’सारख्या सूचनांच्या वाचनात रमताना, उन्हाच्या झळा सुसह्य़ झाल्याचा भासदेखील होऊ लागतो.. अशातच, कुठे तरी भारनियमन होणार असल्याची बातमी वाचनात येते आणि डोक्यावरचा पंखा फिरत असताना, खोलीतलं वातानुकूलन यंत्र थंड हवेचे झोत सोडत असतानाही, भारनियमनग्रस्त गावातील लोकांच्या हलाखीच्या केवळ कल्पनेनेच नकळत कपाळावर घाम साचल्यासारखं वाटून जातं.. कुठे तरी पाणीटंचाई सुरू झालेली असते, तर विदर्भ-खान्देशातल्या एखाद्या शहरानं विक्रमी तापमानाची नोंद केल्यानं मे महिन्यात काय होणार या चिंतेनं मन अस्वस्थ होऊन जातं.. एखाद्या गावात, बीअरची विक्री वाढल्याचीही बातमी समोर येते आणि कधी एकदा सूर्य मावळतो, संध्याकाळ होते, या विचारानं रात्रीकडे डोळे लागतात.. प्रत्येक उन्हाळ्यात हेच चित्र असतं, तरीही दर वेळी ते नवंनवंच भासतं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा