खेळपट्टी, नाणेफेक यांसारख्या गोष्टी क्रिकेटमध्ये सामन्याला कलाटणी देतात, पण त्याहीपेक्षा सामन्याला कलाटणी देणारी गोष्ट म्हणजे सदोष पंचगिरी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्याच एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने मोहम्मद हफिझला त्रिफळाचीत केले, दुसऱ्या चेंडूवर त्याने अझर अलीला पायचीत पकडले खरे, पण पंचांनी त्याला नाबाद ठरवल्याने भारताचे मनोधैर्य खचले, त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर सेहवागने पकडलेला झेल पंचांनी दिला नाही, तर अश्विनने झेल घेतल्यावर पंचांकडे त्याचे अपील केले आणि त्यामुळेच युनूस खानचा बळी आपल्याला मिळवता आला. या सामन्याला सदोष पंचगिरीचा फटका बसला खरा, पण यापूर्वी बऱ्याच सदोष पंचगिरीमुळे अनेक वेळा सामने गमावण्याची वेळ जवळपास साऱ्याच संघांवर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंच पुनर्विचार प्रणालीला (यूडीआरएस) लाल दिवा दाखवला असला तरी त्याचा फटका सर्वात जास्त भारतीय संघालाच बसलेला आहे.क्रिकेटमध्ये भारतीय संघ समृद्ध समजला जात असला तरी पंचांच्या बाबतीमध्ये मात्र आपली दयनीय अवस्था आहे. एस. वेंकटराघवन यांच्यानंतर एकही ‘एलिट’ गटामध्ये आपण पंच देऊ शकलेलो नाही. सध्या एस. रवी, संजय हजारे, सुधार असनानी, असे काही पंच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असले तरी त्यांचा ‘एलिट’ गटामध्ये समावेश करण्यात आलेला नाही, यावरूनच त्यांची कामगिरी कशी असेल याचा अंदाज येऊ शकतो. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) प्रत्येक पंचांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असते. त्यामध्ये त्याने किती चुकीचे आणि किती योग्य निर्णय दिले याचा तपशील असतो. भारतीय पंचांची कामगिरी सुमार दर्जाचीच पाहायला मिळाली आहे. जिथे भारत शेकडो क्रिकेटपटू घडवतो, तिथे त्यांना चांगल्या दर्जाचा एक पंच बनवता येत नाही, याचे आश्चर्य वाटते. भारताकडे एकामागून एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांच्यासाठी तशा अकादमी कार्यरत आहेत, जिथे खेळाडूंना चांगले प्रशिक्षण दिले जाते, त्याचबरोबर त्यांचे दुखापतीनंतर पुनर्वसन केले जाते. पण चांगले पंच घडावेत, यासाठी बीसीसीआय जास्त काही करताना दिसत नाही.  भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत न देण्याचा धक्कादायक निर्णय बिली बाऊडेन यांनी दिला, त्या वेळी महेंद्रसिंग धोनीचाही या निर्णयावर विश्वास बसला नव्हता. त्याने बाऊडेन यांच्याकडे ‘रेफरल’ची खूण केली खरी, पण बाऊडेन यांनी त्यावर फक्त स्मितहास्यच केले. तर दुसरे पंच एस. रवी हे भारताचेच असले तरी त्यांनीही दोन निर्णय चुकीचे दिले आणि पंचांच्या या तीन चुकीच्या निर्णयांमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. कारण हेच निर्णय जर योग्य दिले असते तर सामना भारताच्या बाजूने झुकू शकला असता. आंतरराष्ट्रीय दर्जावर भारतीय पंचांची कामगिरी अन्य देशांच्या पंचांच्या तुलनेत नक्कीच चांगली होताना दिसत नाही. भारतासारखा मोठा देश एकही चांगला पंच आंतराष्ट्रीय दर्जावर देऊ शकत नाही, हे शल्य नक्कीच कुठे ना कुठे तरी क्रिकेटरसिकांच्या मनात असेल. पण त्यासाठी बीसीसीआयने काही कडक पावले उचलायला हवीत, त्यांनी जर पावले उचलली नाहीत तर भारत पंचगिरीतून बाद व्हायला वेळ लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा