मंगळासंदर्भातील संशोधन आपण करणे गरजेचेच आहे, हे न ओळखता मंगळयान मोहिमेवर आक्षेप घेतले गेले. त्यांना हे यान कक्षेत फिरू लागल्याने उत्तर मिळाले आहे. कमी खर्च, अचूक आखणी आणि सत्ताधाऱ्यांनीही न डगमगता मोहीम सुरू ठेवणे यामुळे हे यश अधिकच अभिमानास्पद ठरते. यानाच्या संशोधनकार्याला असेच यश येईल, ही अपेक्षा आणि भारतीय मानसिकतेतील अमंगळ ग्रहांचा नाश व्हावा या आशा, या यशाने बळावल्या आहेत..  
दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडला परत जाऊ न शकलेल्या एका भारतीय तरुणावर मुंबईतच राहावयाची वेळ आली आणि ही बातमी जेव्हा एका उद्योगपतीच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी या तरुणास बोलावून घेतले. या उद्योगपतीस या तरुणाच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज असल्यामुळे त्यांनी या तरुणास मुंबईतच राहण्याची गळ घातली. तुला जे काही संशोधन करावयाचे आहे, त्यासाठी मी साधनसामग्री पुरवतो, त्यासाठी तू मुंबई सोडावयाची गरज नाही, असे सांगत त्या उद्योगपतीने त्या तरुणासाठी स्वतंत्र विज्ञान संशोधन केंद्राची स्थापना केली. तो तरुण अखेर मुंबईतच राहिला. काल भारतीय अवकाश संशोधनाच्या मंगळयान मोहिमेस जे यश आले त्याचे बीज त्या तरुणास मुंबईत राहण्याचा यशस्वी आग्रह करणाऱ्या त्या उद्योगपतीच्या प्रयत्नात आहे. तो तरुण म्हणजे डॉ. होमी भाभा आणि ते उद्योगपती म्हणजे जहांगीर रतनजी दादाभाई ऊर्फ जेआरडी टाटा. डॉ. भाभा यांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेची एक शाखा बंगळुरूत रुजली आणि अल्पावधीत तिचे रूपांतर भारतीय अवकाश संशोधन केंद्रात झाले. काल या अवकाश संशोधन केंद्राने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला असून त्यासाठी हे अवकाश संशोधक अभिनंदनास पात्र ठरतात. अलीकडे आपल्या देशात चांगल्या, अभिमान वाटावा अशा वृत्तांचा चांगलाच दुष्काळ आहे. मंगळयान यशाच्या आनंददायी वृत्तामुळे काही काळ तरी हा दुष्काळ दूर होईल. अवकाश संशोधकांच्या या यशाचे मोल अनेकार्थानी मोठे आहे. गत साली जेव्हा ही मंगळयान मोहीम जाहीर झाली तेव्हा तीवर टीकेचा वर्षांव झाला होता आणि तो करणाऱ्यांत अवकाश संशोधन केंद्राचे माजी प्रमुख माधवन नायर हेच आघाडीवर होते. ही मंगळयान मोहीम हा राष्ट्रीय अपव्यय आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी अवकाश संशोधन संघटनेवर केली होती. त्यांच्या मते भारतीय उपग्रह हा मंगळाच्या नजीक गेला तरी त्याच्या हाती फार काही लागणार नाही, कारण त्याची कक्षा ही वर्तुळाकार नसेल तर लंबगोलाकार असेल. त्यामुळे तो मंगळाच्या फार जवळ जाऊ शकणार नाही. त्यांचा दुसरा मुद्दा होता तो मंगळयानास अवकाशात घेऊन जाणाऱ्या उपग्रह प्रक्षेपकाच्या वजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर. त्यासाठी जे प्रक्षेपक यान वापरले गेले ते फारच किरकोळ वजन घेऊन जाणार असल्यामुळे मंगळावरील संशोधनासाठीची अवजड साधनसाम्रगी या यानातून नेता येणार नाही. त्यामुळे माधवन नायर यांच्यासारख्यांचे म्हणणे असे होते की, इतकी हलकी मोहीम नेण्याची घाई करण्यापेक्षा आपल्या अवकाश संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या क्षमतावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नायर यांनी घेतलेल्या आक्षेपांत अजिबातच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. परंतु अवकाश संशोधन संघटनेचे विद्यमान प्रमुख के. राधाकृष्ण आणि नायर यांच्यातील तीव्र मतभेदाची धारदार किनार त्यांनी घेतलेल्या आक्षेपांना असल्यामुळे ते फारसे गांभीर्याने घेतले गेले नाहीत. या साऱ्याकडे दुर्लक्ष करीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही मोहीम मंजूर केली. त्यांच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यात एक घोटाळा अवकाश संशोधन क्षेत्रातील कराराबाबतही होता. त्यामुळे मनमोहन डगमगले असते तर अवकाश संशोधन संघटनेची अवस्था घोटाळ्यांमुळे रद्द झालेल्या टू-जी वा कोळसा कंत्राटांसारखीच झाली असती. तो अनवस्था प्रसंग टळला. तेव्हा घेतलेले सारे आक्षेप मंगळयानाच्या बुधवारच्या यशामुळे दखल घेण्याच्या योग्यतेचे नव्हते, हेच सिद्ध झाले. पुढे नायर यांना अवकाश संशोधन संघटनेतून काढावे लागले. त्यामुळे अवकाशातील हे विज्ञान वातावरण अधिकच गढूळ झाले. मंगळयानाच्या या यशाने आज हे सर्वच बदलेल.
मंगळयानाचे कवतिक अनेक कारणांसाठी होणार असले तरी त्यातील दोन मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे त्यासाठी आलेला खर्च. अमेरिकन, युरोप वा रशिया या अन्य तिघांनाच मंगळापर्यंत मजल मारण्यात यश आले आहे. पण यातील प्रत्येकाने त्यासाठी केलेला खर्च मंगळयानाच्या किमान चौपट व कमाल दहापट आहे. या मोहिमेसाठी भारतीय अवकाश संघटनेस साधारण ४५१ कोटी रुपये इतका खर्च आला तर अमेरिकेस चार हजार कोटी रुपये मोजावे लागले होते. तेव्हा इतक्या कमी खर्चात हा पल्ला पार करणे हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. त्याचबरोबर मंगळापर्यंत पोहोचणाऱ्या अन्य कोणत्याही देशाला पहिल्याच प्रयत्नात यश आलेले नाही. आपण मात्र त्यास अपवाद ठरलो. अवघडातील अवघड परीक्षा उत्तीर्ण होण्यात आनंद असला तरी या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे हे अधिक आनंददायी असते. या आनंदाचा अनुभव आज अवकाश संशोधन संघटनेतील विज्ञान तंत्रज्ञांना येत असेल. या मोहिमेच्या प्रयोजनाबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अमेरिकेने मंगळासंदर्भात विपुल संशोधन केलेले असल्यामुळे आपण तेच काम पुन्हा करण्यात काय हशील, असेही बोलले जात होते. यातील अमेरिकेसंदर्भातील तपशील खरा असला तरी त्याचा रोख चुकीचा ठरतो. याचे कारण असे की मंगळाच्या संदर्भात अमेरिकेने जे काही संशोधन केले आहे त्यात त्या देशाने भारतास सहभागी करून घेतले जाण्याची काहीही शक्यता नाही. त्या संशोधनाचे निष्कर्ष वा अन्य तपशील त्या देशाने भारतास का द्यावा? तेव्हा या संदर्भातील माहिती आपणच आपली जमा करणे गरजेचे होते. पृथ्वीवर वातावरणनिर्मितीसाठी जो मिथेन नावाचा वायू कारणीभूत ठरला त्याचे अस्तित्व मंगळाच्या पृष्ठभागावरदेखील आहे, असे मानले जाते. तसे ते असल्यास त्याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. ते करणे या मंगळयानामुळे शक्य होणार आहे. तेव्हा जे काही हाती लागेल ते आपले स्वत:चे संशोधन असेल. या मंगळयानाच्या यशाचे मूल्यमापन हे खऱ्या अर्थाने त्यानंतर होईल. मंगळापर्यंत पोहोचणे यातदेखील मोठे आव्हान होते आणि ते आपल्या शास्त्रज्ञांनी पार केले याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र ठरतात. ही कामगिरी खचितच महत्त्वाची. पण त्या कामगिरीस संशोधनाच्या निष्कर्षांचा आधार मिळाला तर ती अधिकच मोलाची ठरेल. भारतासारख्या अर्धविकसित देशाने ती करून दाखवल्यास ते यश अधिकच मंगळ ठरेल, यात शंका नाही.    
भारतीय मानसिकतेत मंगळ आणि शनी या दोघांविषयी चांगलीच दहशत असते. चंद्र थेट मामाच झाल्यामुळे जवळ आलेला असतो, बुधाची दखल घेतली नाही घेतली तरी फार फरक पडत नाही, गुरू हा गुरूच असल्यामुळे तसा तो लांबच असतो आणि शुक्राचे महत्त्व वयोमानपरत्वे कमीच होत जाते. या सगळ्या टप्प्यांत धाक असतो तो मंगळ आणि शनीचा. तांबारलेल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहणाऱ्या मंगळाचा संबंध अमंगळाशीच लावला जातो आणि कडीवाला शनी तर मानसिक स्वास्थ्यालाच फास लावतो, असे मानले जाते. यापैकी मंगळाविषयीच्या अमंगळ अंधश्रद्धेची भीती या मंगळयानामुळे कमी होण्यास मदत होईल. काळाच्या ओघात पृथ्वीच्या प्रेमगीतातील अन्य ग्रहांनादेखील आपलेसे करण्यात आपले शास्त्रज्ञ निश्चितच यशस्वी होतील. तोपर्यंत अवकाशातील या शुभंकर मंगळागौरीत आपण सहभागी व्हायला हवे.

Story img Loader