खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमी असलेले (कै.) डॉ. अरविंद गोविंद रड्डी यांनी आयुष्यभर जंगले, वन्यजीव व वृक्षवर्धन या विषयांचे वाचन, मनन, चिंतन केले. भारतीय वनसेवेत तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेले रड्डी भारतीय वनसेवेच्या सर्वोच्च पदावरून १९९५ मध्ये निवृत्त झाले. ते निवृत्तीनंतरही सतत संशोधन, लेखन व प्रयोग करीत राहिले.
वनखात्याच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीच्या पदांवर असताना त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले. हवाई प्रत्यारोपण, समुद्रकिनाऱ्यावरील मँग्रोव्ह वनस्पतीची लागवड व संवर्धन तसेच पुण्यालगतच्या पाचगाव परिसरात निसर्ग- विहार निर्माण करण्याची कल्पना मांडण्यात व प्रत्यक्षात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
जंगल, वन्यजीव आणि वनसंवर्धन हे रड्डी यांच्या अत्यंत आवडीचे, अभ्यासाचे, संशोधनाचे आणि जिव्हाळ्याचे विषय होते. अतिशय अज्ञान आणि गैरसमज असलेला जंगल हा विषय आणि काहीसे बदनाम झालेले वनखाते आणि वनाधिकारी या विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लिहिलेले ‘इंडियन फॉरेस्टी – अ नॅचरॅलिस्टस पस्र्पेक्टिव्ह फॉर द कॉमन सिटिझन’ हे पुस्तक विज्ञान साहित्यामध्ये मोलाची भर टाकणारे आहे.
इंग्रजी जाणणाऱ्या सर्वसामान्य वाचकाला समजेल, वाचावेसे वाटेल आणि त्यांच्या ज्ञानात भर घालेल अशा पद्धतीने, तांत्रिक शब्दजंजाळाचा कमीत कमी पण आवश्यक तितका वापर करून लिहिलेल्या या पुस्तकाची गरज होतीच. यात पृथ्वीची निर्मिती आणि जीवनसृष्टीची उत्पत्ती तसेच वनांची उत्क्रांती यापासून सुरुवात करून जंगल म्हणजे काय, भारतीय जंगलाचे प्रकार व शास्त्रीय वर्गीकरण, वनखात्याची स्थापना, वनकर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वनसंवर्धन व वन्यजीवांचे संरक्षण, आजची परिस्थिती ते भविष्यातील वाटचाल अशा सर्व विषयांची पद्धतशीर, संगतवार मांडणी केलेली आहे. वनखात्यातील कर्मचारी, निसर्ग संवर्धन, वृक्षलागवड आणि पर्यटनाशी संबंधित व्यक्ती व संस्था, अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य वाचक अशा सर्वानाच उपयुक्त ठरणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा अधिकाधिक, र्सवकष उपयोग होण्यासाठी सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद व्हायला हवा असे वाटते. वनखात्याची कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय आणि खासगी ग्रंथालये यामध्ये असलेच पाहिजे अशा तोलामोलाच्या या पुस्तकाचे स्वागत होईल याची खात्री वाटते.
इंडियन फॉरेस्टी – अ नॅचरॅलिस्टस पस्र्पेक्टिव्ह फॉर द कॉमन सिटिझन : डॉ. अरविंद गोविंद रड्डी, वनराई, पुणे, पाने : ३१२, किंमत : ४४९ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा