भारतीय हवाई दलास नवी झेप घेताना, लढाऊ विमानांइतकेच भारवाहू विमानांच्या आधुनिकीकरणाकडेही लक्ष पुरवावे लागणार होते. हे ‘भारवाहू’ काम हवाई दलच नव्हे तर स्थलसेनेची नेआण करण्यासाठी आणि शांतताकाळातही महत्त्वाचेच आहे..
भारतीय संरक्षण दलांनी, तीन्ही सेनांमधील आधुनिकीकरणाचे उद्दिष्ट तर ओळखलेले आहेच. परंतु या उद्दिष्टपूर्तीसाठी काही वेळा काही अडथळे येतात. हे अडथळे आर्थिकच असतात असे नाही, तर राजकीय किंवा प्रशासकीय असू शकतात. संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचारांच्या बातम्या येऊ लागल्यावर जनमानसही मूळ उत्पादनाच्या दर्जाबाबत साशंक होते. या साऱ्या अडथळय़ांवर मात करत वायुसेनेच्या किंवा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात महत्त्वाच्या सुधारणा गेल्या काही दिवसांत झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, हवेतून जमिनीवरची लक्ष्ये टिपणे किंवा मारगिरी करणे हे जे वायुसेनेच्या विमानांचे काम असते, त्या अर्थाने ही ‘लढाऊ विमाने’ नाहीत. यांना ‘भारवाहक’ विमाने म्हणता येईल. भारवाहक ताफ्यात झालेली ही सुधारणादेखील का (कोणत्या उद्दिष्टांकरिता) महत्त्वाची ठरते तसेच ताफ्यातील नव्या विमानांची भर यादृष्टीने विशेष उपयुक्त का ठरते, हे प्रस्तुत लेखात आपण पाहू. सध्या रशियन बनावटीचे ए.एन. (एन्टोनोव) ३२ आणि आय.एल.(इल्यूशैनॉव) ७६ गजराज विमाने आहेत. परंतु गेल्या वर्षी सहा सी सुपर हक्र्युलिस विमाने (लॉकहीड मार्टनि या अमेरिकन कंपनी कडून) तसेच दहा सी – १७ ग्लोब मास्टर ३ (बोइंग कंपनी कडून) ह्या जंगी विमानांची भर पडल्याने भारतीय वायुसेनेची ताकद वाढली आहे. भारत सारख्या विशाल देशांत (पूर्व ते पश्चिम सीमांमधील अंतर २९३३ किलोमीटर, नवी दिल्ली ते अंदमान-निकोबार बेटांमधील अंतर २४५९ किलोमीटर )वेगवान गतीने भौगोलिक परिस्थितीत सन्याला तत्परतेने एका युद्धक्षेत्रा पासून दुसऱ्या सामरिक महत्त्वाच्या ठिकाणी पाठवण्यासाठी या मोठय़ा भारवाहक विमानांची महत्त्वाची भूमिका असते.
युद्ध परिस्थिती नसताना आंतरराष्ट्रीय सीमेवर संयुक्त राष्ट्राच्या निर्देशानुसार सीमेवर बॉर्डर सेक्यूरिटी फोर्स गस्तीसाठी असतो व युद्ध सुरू होण्याच्या परिस्थितीत सेना (स्थलसेना) ती जबाबदारी आपल्या हातात घेते. भारतीय स्थलसेनेने देशाच्या पश्चिमेकडील सीमेवर आपल्या काही तुकडय़ा व चिलखती व रणगाडयांचे दल सज्ज केलेले आहे. आणीबाणीच्या स्थितीत वेळ न गमविता त्यांना सीमेवर लढाई साठी लवकरात लवकर पोहोचता येईल. व्यूहात्मक तयारीचा भाग म्हणून, तसेच युद्ध काळात किंवा अन्य तातडीच्या प्रसंगात सामग्री आणि सैनिक यांची नेआण करण्यासाठी मोठय़ा क्षमतेच्या भारवाहक विमानांची हमखास गरज आहेच !
दीडशेहून अधिक सैनिक
भारताने मोठय़ा भारवाहक श्रेणीतील सर्वात अवाढव्य विमान सी १७ ग्लोब मास्टर ३ या जातीच्या दहा विमानांच्या खरेदीचा करार बोईंग कंपनीशी केला आहे. हे विमान ७० टन भार असेल तर ४२०० किलोमीटर उंची गाठते आणि भार ४० टन असल्यास ९००० किलोमीटर पर्यंत झेप घेऊ शकते. या विमानाची मुख्य वैशिष्टय़े म्हणजे छोटय़ा, खडकाळ व धुळीने माखलेल्या धावपट्टीवरही उतरू शकतात. अशा धावपट्टीची लांबी फक्त तीन हजार फूट असली तरी पुरेशी आहे. तसेच हवेत इंधन भरण्याची सवलत ह्यात सामील आहे. एका सी १७ विमानात १०२ छत्रीधारी सनिक ( ५४ सनिक विमानाच्या िभतीला टेकून व ४८ सनिक मधल्या जागेत) आरामात बसू शकतात, किंवा तसेच १५२ हत्यारसज्ज सनिक बसू शकतात. जखमी व रग्णांना उपचारांसाठी घेऊन जायचे असेल तर ५४ सनिक निजलेल्या स्थितीत, शिवाय सोबत प्रत्येकासाठी चिकित्सा उपकरणे घेऊन जाता येईल. एक छोटा रणगाडा, किंवा चिलखती गाडय़ा यांची नेआणदेखील या विमानातून सहज होऊ शकते. विमानाच्या पंखांच्या दोन्ही टोकातील अंतर १७० फूट आहे व ४ प्राट व्हिटनी एंजिन आहेत. लांबी १७४ फूट, मागील उंची ५५ फूट ..म्हणजे चार मजली उंचीची इमारतच म्हणावी, असे हे विमान आहे. १८ फूट रुंद व १२ ते १५ फूट उंचीचे सामान यात आरामात चढवता येईल. विमानाला ४०टायर आहेत.
आपल्या देशाने ही दहा सी १७ ग्लोब मास्टर थ्री विमाने २५० अब्ज रुपयात विकत घेतली. हा करार १५ जून २०११ रोजी झाला होता, यापैकी पहिली तीन विमाने गेल्याच सोमवारी, २ सप्टेंबर रोजी भारताचे संरक्षण मंत्री ए.के अँटनी यांच्या उपस्थितीत हवाईदलात रीतसर सामील झाली. मोठय़ा भारवाहू विमानांसाठी ‘स्क्वाड्रन ८१’ हा नवीन स्क्वाड्रन दिल्लीलगतच, हवाई दलाच्या हिंडन अड्ड्यावर उभारला जात आहे. आणखी दोन विमाने वर्षअखेर येतील, उरलेली पाच पुढील वर्षी पोहोचतील. लढाऊ विमाने शत्रूंवर प्रत्यक्ष क्षेपणास्त्रे डागतात, तेव्हाही या भारवाहू विमानांचे काम आहेच. या विमानांत दिशाभूल करणारे अग्निगोळे असतात.
चिनी हालचालींना जरब
भारतीय वायूसेनेची दुसरी मोठी खरेदी म्हणजे, अमेरिकेच्या लॉकहीड मार्टनि कंपनीकडून १.२ अब्ज डॉलरना घेतलेली ‘सी १३० जे सुपर हक्र्युलिस’ या प्रकारची सहा विमाने. यात सामान ठेवण्याची जागा ४१ फूट लांब, १० फूट रुंद व नऊ फूट उंच अशी आहे. २० टन वजन उचलून नेण्याची याची क्षमता आहे. चार रोल्सरॉइस टबरेप्रॉप इंजिने बसविलेले हे विमान ताशी ६७० किलोमीटर ह्या वेगाने उड्डाण करून ५२५० किलोमीटर अंतर एका टप्प्यात गाठू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानाला फक्त ९५३ मीटर लांबीची धावपट्टीसुद्धा पुरते. विमानात १२८ हत्यार घेऊन सनिक आगाऊ मोच्र्यावर जाऊ शकतात किंवा ९२ छत्रीधारी सनिकांना शत्रू देशात पॅराड्रॉप करता येते. अलीकडेच उत्तराखंडातील श्रद्धाळूंना साह्य करण्यास याच विमानाची मदत झाली.
एवढेच नव्हे तर चिनी सीमेजवळील दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ) अग्रवर्ती हवाई पट्टी वर म्हणजेच जगातील सर्वात उंच धावपट्टी वर ( उंची १६,६१४ फूट ) हे विमान काही दिवसा पूर्वी उतरले होते. चिनी सेनेने आपल्या हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न जेथे केला, तेथून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर ही धावपट्टी आहे. याआधी २३ जुलै १९६२ रोजी स्क्वाड्रन लीडर सी.के.एस राजे यानीं पहिल्यांदा भारतीय वायुसेनेचे विमान उतरवले होते. या धावपट्टीस २००८ साली पुन्हा वापरण्या साठी मजबूत करण्यात आले आणि त्यानंतर पहिल्यांदा इतके मोठे, वजनदार विमान तिथे उतरवले गेले. यापूर्वी ‘ए.एन. ३२’ विमाने येथे उतरत. ही सर्वोच्च धावपट्टी कराकोरम पर्वत रांगेत लडाखमधील उत्तर भागात आहे. आपल्या हवाई दलात सध्या १२५ ए.एन. – ३२ विमाने आहेत. या विमानांची वहनक्षमता ‘सी १३० जे सुपर हक्र्युलिस’ पेक्षा निम्म्याने कमी (४२ छत्रीधारी सनिक) आहे.
हवाई दल याआधी तयार नव्हते आणि आताच आधुनिक झाले, असेही समजण्याचे कारण नाही. ‘आयएल – ७६ गजराज’ या प्रकारची २० विमाने आपल्याकडे आधीपासून आहेत. रशियन बनावटीची ही विमानं गेल्या २० वर्षां पासून आपली कामगिरी बजावत आहेत. सध्या लेह, बागडोगरा या विमानतळाला सन्याचे सामान पोहचवण्याचे काम सातत्याने करीत आहेत. ४२ टन माल घेऊन जायची तयारी आहे. लांबी १५३ फूट, उंची ४८ फूट व ताशी कमाल वेग ९०० किलोमीटर या मापाने ४३०० किलोमीटर चे उड्डाण एका झेपेत ‘गजराज’ घेऊ शकते. ४२,७०० फूट या उंचीपर्यंत याची भरारी आहे. यावर असलेल्या दोन मशीनगन प्रत्येकी २३ मि.मी. व्यासाच्या असून जमिनीवर किंवा हवेत मारा करण्यास त्या उपयुक्त आहेत.
यापैकी तीन ‘गजराज’ विमाने परिवर्तित करून ती फाल्कन रेडार युक्त एवॅक्स ( अॅडव्हान्स्ड वॉíनग अँड कंट्रोल सिस्टम) साठी भारताने वापरली. एवॅक्स म्हणजे आकाशातील आपले डोळे .
ही विमाने स्थलसेनेसाठी अधिक उपयुक्त आहेत. संख्येने अधिक सनिकांची जलद नेआण करण्याच्या कामगिरीसाठी ही भीमकाय विमानं अत्यंत उपयोगी आहेत यात मुळीच शंका नाही. काही दिवसांपूर्वी ‘सी १७ ग्लोब मास्टर’ विमानांनी लष्कराची एक संपूर्ण बटालियन पोर्ट ब्लेअर येथे स्थानांतरित करण्याची कामगिरी चोख पणे बजावली. हेच ह्या विमानाचे वैशिष्टय म्हणावे लागेल. या अवाढव्य विमानांचा देखभालखर्चही मोठा आहे. पण सन्याच्या ‘तय्यार आणि हुश्शार’ या स्थितीला त्यांचामुळे नवी दिशा आणि उंच झेप मिळालेली आहे हे निसंशय. देशाच्या चिंतांचा भार ही विमाने मोठय़ा प्रमाणावर हलका करतील, यात मुळीच शंका नाही.
* लेखक निवृत्त कर्नल आहेत. त्यांचा ई-मेल : sarang.thatta@gmail.com
(हा लेख मराठीत आणण्यासाठी सुहास आपटे यांची मदत कर्नल थत्ते यांना झाली आहे.)
चिंताच भार वाहण्यास समर्थ!
भारतीय हवाई दलास नवी झेप घेताना, लढाऊ विमानांइतकेच भारवाहू विमानांच्या आधुनिकीकरणाकडेही लक्ष पुरवावे लागणार होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian load bearing aircraft able to load the burden of country