एखाद्या भारतातल्या कंपनीत अमेरिकी प्रमुख नेमला गेला तर तिकडे त्याच्या गावात पेढे वाटतात का? ब्रिटनमधलं बुकर वगैरे तत्सम पारितोषिक एखाद्या फ्रेंच वा जर्मन लेखकाला मिळाल्यावर तर तो फ्रेंच वा जर्मन भाषेचाच सन्मान आहे.. अशी भावना त्या त्या भाषकांत दाटून आलीये.. असं कधी अनुभवायला मिळालंय का? याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं झालं तर नाही असं असेल.
..मग हे हास्यास्पद उद्योग करावेत असं आपल्यालाच का वाटतं?
तसे आपण उत्सवप्रियच. काही ना काही साजरं करत राहणं हा आपला राष्ट्रीय उद्योग. त्यासाठी जयंत्या चालतात. आता इतके जन्मणारे आहेत म्हणजे मग मयंत्याही आल्याच. उपोषणं आहेत. विजय आहेत. पराजय आहेत.. कारणांना काही तोटा नाहीच. यात अलीकडच्या काळात आपल्याला आणखी एक तगडं कारण मिळालेलं आहे.
आपल्या देशातच आपली इतकी गर्दी झालीये की जागा पुरी पडत नाही. मग आपण बाहेर पडायला लागलो. जगातला एक देश असा नसेल की जिथे भारतीय नाही. मग तो रुपयाचा सन्मान करणारा नायजेरियाचा एखादा भाग असो वा शुद्ध गुजराती जैन थाळी देणारं स्वित्र्झलडचं माउंट टिटलिस असो. भारतीय असतातच असतात. आता इतके  सगळे भारतीय बाहेर आहेत म्हटल्यावर त्यांतले बरेचसे सरासरी असणार, काही गणंग निघणार आणि काही तिकडेही तेजानं तळपणार हे ओघानं आलंच. तसं होणं नैसर्गिकच.
आपल्याला साजरं करण्यासाठी नवीन एक कारण मिळालं ते हेच. या अनिवासी भारतीयांचं कर्तृत्व साजरं करणं.
समाजशास्त्रीयदृष्टय़ा पाहू गेल्यास परदेशस्थांचं यश असं साजरं करणं हे आपला न्यूनगंड दाखवतं. या उत्सवांच्या मुळाचा शोध घेतल्यास ही भावना चिमटीत पकडता येईल. ती म्हणजे.. आपण किती कमी आहोत, हलाखीत आहोत, वाईट अवस्थेत जगतोय.. अशा वेळी परदेशात का असेना जाऊन एखादा भारतीय दिवे लावत असेल तर त्याची आरती आपण करायला हवी.. ही ती भावना. पूर्वीच्या काळी गुलामांमध्ये अशी भावना आढळायची. वर्षांनुर्वष गुलामीत खितपत असताना, काहीही भविष्य नसताना एखादय़ा गुलामाला त्या हलाखीतून पळून जाण्यात यश आलं तर मागे राहिलेले गुलाम त्या पळून गेलेल्याचं ‘यश’ साजरं करीत. आताच्या काळात राजकीय गुलामी संपली. पण मानसिकता तीच आहे. त्यामुळे हे साजरं करणं काही थांबलेलं नाही.
आता यावर काही राष्ट्रभक्त देशाची अस्मिता वगैरे मुद्दे काढतील. आपल्या देशवासीयाचं यश साजरं करण्यात गैर ते काय..वगैरे युक्तिवाद करतील. हे असं काही बोलणारे फारच शालेय असतात. तरीही त्यांना म्हणून उत्तर द्यायचंच असेल तर वेंकटरमन रामकृष्णन यांचा दाखला द्यायला हवा. त्यांचं नाव या राष्ट्राभिमान्यांना काही आठवणार नाही. या रामकृष्णन यांचा २००९ साली भारतात भलताच कौतुकसोहळा झाला. समस्त वेष्टीधारी द्रविडीस्थानाने सुस्नात होऊन, भस्म वगैरे लावून रामकृष्णन यांच्या सत्काराला हजेरी लावली. त्यांचा सत्कार का झाला? तर त्या वर्षीचं रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक त्यांना जाहीर झालं होतं म्हणून. पण रामकृष्णन हे नाव आणि व्यक्ती भारतीय असली तरी ते भारतात नव्हते. त्यांचं संशोधनाचं काम परदेशातच सुरू होतं. पण नोबेल जाहीर झालं आणि ते आपल्याला आपले असल्याचा साक्षात्कार झाला. लगेच भारतीय वगैरे म्हणून सत्कार समारंभ. तर चेन्नईतल्या सत्कारात जेव्हा त्यांच्या कामापेक्षा भारतीयत्वाचे गोडवे गायले जायला सुरुवात झाली तेव्हा त्यांना रामकृष्णन यांनी सर्वाच्या देखत तोंडावर फटकारलं. ते म्हणाले.. हे बघा.. माणूस म्हणून आपल्याला कुठे ना कुठे जन्म घ्यावा लागतो.. ती बाब काही आपल्या हातात नसते.. तेव्हा जन्म आणि जन्मभूमी हा आपल्यासाठी केवळ एक योगायोग आहे.. त्यात एवढं मिरवण्यासारखं काय आहे..
रामकृष्णन चांगलेच फटकळ. पुढे जाऊन ते असंही म्हणाले, मला नोबेल जाहीर झाल्यापासून भारतातून इतके फालतू मेल येतायत मला की मी वैतागलोय. रामकृष्णन यांना माहीत नसावं, अनेक आयांनी त्या मेल्समधून विचारलं असेल आमच्या दुसरीतल्या मुलाला रसायनशास्त्रातलं नोबेल मिळावं यासाठी कोणत्या क्लासला घालू.. किंवा कदाचित.. तुम्ही क्लास घ्याल का.. असाही प्रश्न असेल. असो. मुद्दा तो नाही.
तर हा की विकसित म्हणून गणल्या जाणाऱ्या देशातल्यांना आपल्या एखाद्या देशवासीयाचा गुणगौरव उत्सव करावा इतका मोठा वाटतो का?
म्हणजे एखाद्या भारतातल्या कंपनीत अमेरिकी प्रमुख नेमला गेला तर तिकडे त्याच्या गावात पेढे वाटतात का? किंवा केक कापतात का? एखादं कुठलं आपल्या देशातलं पारितोषिक एखाद्या ब्रिटिशाला जाहीर झालं तर आपलीच मान ताठ झाली असं समस्त ब्रिटिशांना वाटलंय असं कधी झालंय का? किंवा ब्रिटनमधलं बुकर वगैरे तत्सम पारितोषिक एखाद्या फ्रेंच वा जर्मन लेखकाला मिळाल्यावर तर तो फ्रेंच वा जर्मन भाषेचाच सन्मान आहे.. अशी भावना त्या त्या भाषकांत दाटून आलीये.. असं कधी अनुभवायला मिळालंय का? या सगळय़ा प्रश्नांचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं झालं तर नाही असं असेल.
मग हे हास्यास्पद उद्योग करावं असं आपल्यालाच का वाटतं?
कारण आपण अजूनही वैचारिकदृष्टय़ा गुलामीच्या अवस्थेतच आहोत म्हणून.
वर उल्लेखलेल्या गुलामांच्या जथ्थ्याला आपल्यातल्या एखाद्याचं पळून जाणं हेच मोठं यश वाटायचं, तसंच आपलंही आहे. कोणीतरी देशाबाहेर जाऊन काही तरी दिवे लावतोय.. तर करा त्याच्या नावानं आरत्या. असं केल्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. इथे असलेल्यांना आपण किती गुणग्राहक आहोत हे दाखवता येतं आणि दुसरं म्हणजे फुकाचं राष्ट्रीयत्वही मिरवता येतं. यातल्या राष्ट्रीयत्वाला फुकाचं म्हणायचं ते अशासाठी की ज्यांच्या यशाच्या गुणगानाची स्पर्धा आपल्यात लागते त्यांचं यश काही त्यांना ते भारतीय आहेत म्हणून मिळालेलं नसतं. म्हणजे चला.. हा आला आर्यसंस्कृतीतला सद्गुणांचा पुतळा भारतीय..देऊन टाका त्याला वरचं पद.. असं काही कुठे घडलेलं नसतं. जे काही असेल ते त्यानं मेहनतीनं मिळवलेलं असतं.
म्हणजे खरं श्रेय ते मेहनतीचं. त्याकडे आपण लक्षच द्यायचं नाही. आणि मिरवायचं काय तर भारतीयत्व. मग कधीतरी एखादा रामकृष्णन खरं बोलून गेला तर ते लागतं आपल्याला.
आणि आणखी एक मुद्दा. तो असा की साजरं करण्याइतकं भव्यपण काय, हे कळतं का आपल्याला? उदाहरणार्थ सत्या नाडेला.
तो बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट्स कंपनीचा प्रमुख कार्यकारी अधिकारीपदी नेमला गेल्यावर समस्त भारतवर्षांला धन्य धन्य झालं. आपल्या मातृभूमीचे त्याने पांग फेडले असंच अनेकांना वाटायला लागलं. पण ही नियुक्ती आपण मिरवावी इतकी महत्त्वाची आहे का? खरं तर या नियुक्तीबद्दल आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्याला भारतीय म्हणून लाज वाटायला हवी, अशी परिस्थिती आहे, याची जाण आपल्याला आहे का? याचंही खरं उत्तर नाही असंच असेल.
आज जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक अभियंते भारतीय आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांत ज्येष्ठ ज्येष्ठ पदांवर भारतीयच आहेत. तेव्हा त्याचा आनंद साजरा करत असताना एक प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं एक तरी उत्पादन भारतीयानं जन्माला घातलेलं आहे का?
मायक्रोसॉफ्ट. अ‍ॅपल. गुगल. फेसबुक. ट्विटर. विकिपीडिया. व्हॉट्सअ‍ॅप. झालंच तर गेलाबाजार याहू. ऑर्कुट.. यादी कितीही वाढवता येईल. यातलं आपलं काय? त्यावर काही जण सुबीर भाटिया आणि हॉटमेलचा दाखला देतील. पण सुबीर किती भारतीय आणि हॉटमेलचं आज काय झालंय हे सांगायची गरज नाही.
तेव्हा इतर कुणी काही तरी जन्माला घालायचं आणि आपण त्याचं पालनपोषण करायचं ही गुलामीच आपण करतोय, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण त्याच वेळी नवीन काही जन्माला घालायची ताकद आपण हरवून बसलोय, हेही ध्यानात घ्यायला हवं. आता ही बाब काय आपण साजरी करावी इतकी थोर आहे?
पण हे कुठं कळतंय आपल्याला?
बेगानी शादी में धुंद होऊन नाचणारा आपला भारतीय अब्दुल्ला दीवानाच आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा