इंडियन प्रीमिअर लीग हे क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या कानामागून येऊन तिखट झालेले बाळ आता सर्वच संबंधितांच्या गळ्याला नख लावेल की काय अशी परिस्थिती आहे. क्रिकेटपेक्षा क्रिकेट संघटना चालवण्यात रस असणाऱ्यांनी आयपीएल आवृत्तीमुळे क्रिकेट खेळाच्या लोकप्रियतेत किती आमूलाग्र बदल होईल याची स्वप्ने रंगविली होती आणि ही स्पर्धा जणू खेळासाठी क्रांतीच आहे, असे दावे केले होते. तसे ते करताना क्रांती पहिल्यांदा आपल्याच पिल्लांना खाते याचा संबंधितांना विसर पडला. ज्यांच्या खेळसाम्राज्यावर कधी सूर्य मावळणारच नाही अशी हवा ज्यांच्याभोवती निर्माण झाली होती त्या आयपीएलच्या जन्मदात्यास ललित मोदी यांना या खेळाने पहिल्यांदा गिळले. राज आणि अर्थकारणचतुर असे ललित मोदी बघता बघता बाराच्या भावात गेले आणि या खेळासंबंधातील वादात त्यांची अशी काही दशा झाली की त्यांना दिवाभीतासारखे परदेशातच जाऊन राहावे लागले. मोदी यांचा सुरुवातीचा तोरा पाहून या खेळाच्या स्वप्नविक्रीत पडून वाहत्या अर्थगंगेत हात धुऊन घेण्याचा मोह अनेकांना झाला. यातील उल्लेखनीय म्हणजे संयुक्त राष्ट्रांत कारकीर्द गाजवणारे आणि संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांच्यानंतर ते पद आपल्यालाच मिळेल असा भ्रम ज्यांना झाला होता ते शशी थरूर. परराष्ट्र संबंध कलेत नैपुण्य मिळवलेल्या थरूर यांनाही नंतर या राष्ट्रीय आयपीएलचा तडाखा बसला. हे थरूर केरळचे. सारी कारकीर्द गेली अमेरिकेत. त्यामुळे देशाशी आणि जमिनीवरील राजकारणाशी कसलाच संबंध नाही. अशा मंडळींच्या केवळ इंग्रजीवरील प्रभुत्वाखाली दबून त्यांना विद्वान मानायची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामुळे हे थरूर महाशय थेट संयुक्त राष्ट्रांचे पुढचे सरचिटणीसच असतील, अशी हवा निर्माण केली गेली होती. ज्यांना संयुक्त राष्ट्रांची व्यवस्था कशी चालते याची कसलीही माहिती नाही त्या मंडळींचा या लोणकढीवर विश्वास बसला. संयुक्त राष्ट्र यंत्रणेचा निम्म्यापेक्षा जास्त खर्चाचा वाटा एकटी अमेरिका उचलते. तेव्हा या संघटनेचे प्रमुखपद अमेरिकेच्या आशीर्वादाशिवाय कोणालाही मिळणे शक्य नाही. इतकी साधी बाब अनेकांना समजलीही नाही आणि त्यामुळे या थरूर यांचे विमान उंच उडत राहिले. आयपीएलने ते जमिनीवर असे कोसळवले की त्यामुळे आपली विद्यमान पत्नी सुनंदा पुष्कर हिच्यासमवेत झोपाळ्यावर बसून छायाचित्रे काढण्याखेरीज थरूर यांना काही कामच राहिले नाही. आयपीएल ही स्पर्धा सामन्यांबरोबरच सीमारेषेवर तंग कपडय़ात नृत्यसदृश हातवारे करणाऱ्यांच्या निर्बुद्ध धांगडधिंग्यासाठीही ओळखली जाते. बऱ्याचदा सामन्यांपेक्षा या चीअरलीडर्सच आकर्षणाचा विषय असतात. या स्पर्धेमुळे उझबेकिस्तान आदी गाळात गेलेल्या देशांतील आणि आपल्याकडीलही अशा तरुणींसाठी चीअरलीडर्स अशी नवी व्यवसायसंधी उपलब्ध झाली. या स्पर्धेतील पुरुष चीअरलीडर असे ज्यांचे वर्णन करता येईल ते मल्या पितापुत्र यांनाही या आयपीएलने चांगलाच हात दाखवला. रा. रा. विजय मल्या यांची लाडकी किंगफिशर ही विमान कंपनी बाराच्या भावात गेली आणि चि. सिद्धार्थ मल्या यांच्यावर नटव्या मैत्रिणींसाठी काटकसर करायची वेळ आली. वास्तविक आयपीएलमध्ये येण्यापूर्वी शाहरुख खान यांचे तसे बरे चालले होते. पण आयपीएलमध्ये स्वत:चा संघ उतरवण्याची अवदसा त्यांना सुचली आणि बघता बघता शाहरुख खान यांचा आधीही तसा यथातथाच असलेला कर्तृत्वालेख आणखीनच घसरला. खेळाच्या मैदानावर दारू पिऊन तर्र झालेल्या शाहरुख खान यांची पतही अधिकच खालावली आणि याच काळात आलेला त्यांचा रा-वनही सपशेल आपटला. भारतीय क्रिकेटचे कृषिपितामह शरद पवार यांचे औद्योगिक बोट धरून या क्षेत्रात आलेले एन. श्रीनिवासन यांना तर भलत्याच आरोपांना सामोरे जावे लागले. आपण समलिंगी आहोत म्हणून आपले वडील आपला अतोनात छळ करतात असा टाहो स्वामी श्रीनिवासन यांचा पोटचा पोरगा कु. अश्विन यानेच फोडला. हा कु. अश्विन ४३ वर्षांचा आहे आणि नको ते करताना पकडला गेल्यामुळे पोलीस कोठडीत राहण्याचा अनुभव त्याच्या नावावर आहे. असे काही जाहीर करून त्याने वडिलांच्या कपाळावरचे गंधच वितळवून टाकले. बरे, आयपीएल आयोजकांनाच या स्पर्धेचा शाप भोगावा लागला असे नाही. अनेक खेळाडूंचीही या स्पर्धेत दशा झाली. या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याचे डोके फिरले आणि त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा दिशाहीन जलदगती गोलंदाज एस. श्रीशांत याच्या श्रीमुखात भडकावली होती. श्रीशांत हा गोलंदाजीपेक्षा अपील करतानाच जास्त आक्रमक असतो. हरभजनने थोबाडीत लगावून त्याचा आवाजच बंद केल्यावर त्यास भोकाड पसरावे लागले होते. नंतर हरभजन आणि श्रीशांत या दोघांच्या कामगिरीला उतार पडला. वीरेंद्र सेहवाग याचेही असेच झाले. आयपीएलचा शाप ज्यांना भोवला त्यात आता भर पडली आहे ती डेक्कन चार्जर्स संघाची. पहिला आयपीएल चषक जिंकणाऱ्या या डेक्कन चार्जर्सचे दुकान गेल्या आठवडय़ात बंद झाले आणि त्यामुळे या सगळ्याच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
डेक्कन चार्जर्स हा संघ मूलत: आंध्रात असलेल्या डेक्कन क्रोनिकल या वृत्तपत्र समूहाचा. डेक्कन क्रोनिकल, एशियन एज आदी वर्तमानपत्रे या गटाकडून प्रसिद्ध होतात. अतिरिक्त कर्जउभारणी आणि ती फेडण्यात येत असलेले अपयश यामुळे हा समूह प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. तो चालवणाऱ्यांनी नक्की किती पैसे उभारले आणि त्याचे काय केले याचा अंदाजही कोणास नाही. या समूहाच्या आर्थिक संकटामुळे आपल्याकडील एकंदर कुडमुडी भांडवलशाही यंत्रणाही उघडी पडली आहे. याचे कारण असे की उत्पन्नाची हमी द्यावी अशी परिस्थिती नसतानाही या समूहाच्या कर्जउभारणीस मानांकन करणाऱ्या कंपन्यांनी उत्तम दर्जा दिला आणि त्यावर भाळून आपल्या बँकांनी मोठमोठय़ा रकमेची कर्जे या समूहास दिली. आता सगळेच संकटात आले आहेत. ही कर्जे वसूल करायची कशी हा बँकांपुढील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. काप गेल्यावरही भोके राहावीत त्याप्रमाणे वाईट अर्थिक परिस्थिती असूनही डेक्कन समूहाने या आयपीएलच्या आतबट्टय़ाच्या व्यवहारात उडी मारली आणि आपले पोळले जात असलेले हात अधिकच भाजून घेतले.
अशी परिस्थिती आली याचे कारण आपले आयपीएलचे प्रारूपच अशा गैरव्यवहारांना उत्तेजन देणारे आहे. ते आखताना युरोपातील फुटबॉल स्पर्धेच्या धर्तीवर आयपीएलची बांधणी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. हे अर्धसत्य होते. युरोपातील क्लबांच्या स्वतंत्र कंपन्या आहेत आणि त्यातील बऱ्याचशा भांडवली बाजारात नोंदल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या उत्पन्न आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा लागतो. आपल्याकडे तसे नाही. आपले आयपीएल क्रिकेट संघ हे कंपनी मालकांचे वा दुपारी भिशीऐवजी आणखी काही करू पाहणाऱ्या त्यांच्या पत्नींचे खासगी संघ आहेत. त्यामुळे त्यांच्या कमाईचा वा खर्चाचा कसलाच तपशील देण्याचे बंधन कोणावर नाही. तेव्हा हे असेच होणार. जोपर्यंत आयपीएलच्या रचनेत मूलभूत सुधारणा केल्या जात नाहीत तोपर्यंत ही स्पर्धा भारताची प्रीमिअर पनवती स्पर्धाच ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा