देशातील क्रीडाक्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून भांडणांचे वारे वाहत आहेत. सुरुवातीला संघटनांपुरती मर्यादित असणारी भांडणे आता खेळाडूंच्या वादामुळे चव्हाटय़ावर येऊ लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ‘भांडा सौख्य भरे’चा प्रत्यय भारतीय टेनिसमध्येही दिसून येत आहे. लिएण्डर पेस आणि महेश भूपती हे भारताचे टेनिसमधील आतापर्यंतचे आशास्थान. गेली दोन दशके भूपती आणि पेस यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानही मिळवून दिला. वयाच्या चाळिशीपर्यंत पोहोचलेल्या या दोघांच्या कामगिरीचा सूर्यास्त जवळ येऊ लागला आहे. पण डेव्हिस चषक असो किंवा राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा.. पेस, भूपती या अनुभवी खेळाडूंवरच भारत अद्याप अवलंबून आहे. सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा, युकी भांबरी, विष्णू वर्धन, सनम सिंग यांसारखे उदयोन्मुख खेळाडू सध्या मैदान गाजवत असले तरी या अनुभवी खेळाडूंचा बोलबाला कायम आहे. पण नवे आणि जुने खेळाडू देशभावनेला महत्त्व देण्याऐवजी आपापसातील भांडणेच उकरून काढण्यावर भर देत आहेत. आता सोमदेवच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवे आणि जुने हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे या वादाची ठिणगी २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळीच पडली होती. ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत दोन आणि मिश्र दुहेरीत भारताच्या एकाच जोडीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार होती. पेस हा सर्वात अनुभवी आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असल्यामुळे तोच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार, हे स्पष्ट झाले होते. पुरुष दुहेरीसाठी पेससोबत भूपतीच्या नावाचा विचार करण्यात आला. पण एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. पेससोबत खेळण्यास भूपती आणि बोपण्णाने नकार दिला. मिश्र दुहेरीतही बऱ्याच वादंगानंतर पेससोबत खेळण्यास सानिया मिर्झा राजी झाली. अखेर पुरुष दुहेरीत पेसला चांगली साथ देऊन विष्णू वर्धनने छाप पाडली. रोहन बोपण्णा-महेश भूपती यांनाही चमकदार कामगिरी करता आली नाही. मतभेद विसरून देशासाठी खेळायचे ठरवले असते तर पेस-भूपती या अनुभवी जोडीला भारताच्या खात्यात सातव्या ऑलिम्पिक पदकाची भर घालता आली असती. पण दोघांनी अहंभाव जपला. ऑलिम्पिकनंतरही खेळाडूंमधील वाद आणि कुरबुरी कायम आहेत. भारतीय टेनिस संघटनेकडून खेळाडूंना योग्य न्याय मिळत नसल्यामुळे टेनिसपटूंनी टेनिसपटूंच्या भवितव्यासाठी इंडियन प्लेयर्स टेनिस असोसिएशनची स्थापना केली. उपाध्यक्षपदी पेस, भूपती, सानिया मिर्झा आणि सोमदेव या भारताच्या अव्वल खेळाडूंना स्थान देण्यात आले. उभरत्या खेळाडूंच्या भल्यासाठी सर्व टेनिसपटूंनी एकत्र यावे, हा या असोसिएशनच्या स्थापनेमागचा उद्देश होता. पण या संघटनेच्या कार्यप्रणालीवरच टीका करत पेसने नव्या वादाला तोंड फोडले. भारतीय टेनिस संघटनेशी उभा दावा मांडल्यामुळे भूपतीला कोणत्याही स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यावर बंदी घालण्यात आली होती. पेसने मात्र कौटुंबिक कारण देत २०१४च्या मोसमात देशासाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थित भारताने डेव्हिस चषकातील पहिल्या लढतीत चायनीज तैपेईवर ५-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्यामुळे आतापर्यंत पेस, भूपती यांच्यावरच अवलंबून राहणाऱ्या भारतासमोर अनेक युवा खेळाडूंचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ‘पेस, भूपतीचा काळ आता संपला,’ असे वक्तव्य करून संघटनेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न सोमदेवने केला खरा; पण देशाच्या झेंडय़ाखाली खेळणाऱ्या या खेळाडूंमधील वाद संपुष्टात येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा