भारतात एक ‘चहावाला’ पंतप्रधान झाला. आता वेळ इंडोनेशियाची आहे. तेथे झोपडपट्टीत ज्याचे लहानपण गेले असा लाकूडसामानाचा विक्रेता राष्ट्राध्यक्ष बनणार आहे. जोको विडोदो हे त्यांचे नाव. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी – खरे तर प्रतिद्वंद्वीच – माजी सेनाधिकारी प्राबोवो सुबिआन्तो यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, पण सुबिआन्तो यांना हा निकाल पचला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची अवघ्या सहा टक्के मतांनी हार झाली. त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. मतदानात व्यवस्थित घोटाळा झाल्याचा, पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला आणि जोको विडोदो तथा जोकोवी हे इंडोनेशिया या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकशाही राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर केले. सुबिआन्तो यांनी याविरोधात न्यायालयात जाऊ वगैरे धमक्या दिल्या आहेत. हे सगळे अलीकडेच अफगाणिस्तानात झालेल्या निवडणुकीच्या वळणावर चालले आहे. तेथे जूनमध्ये झालेल्या निवडणुकीची धुळवड अजून संपलेली नाही. जागतिक बँकेचे माजी अधिकारी अश्रफ घनी आणि माजी मुजाहिदीन बंडखोर अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात अफगाण अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात घनी विजयी झाले. त्याला अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला. प्रकरण यादवी युद्धापर्यंत जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. अखेर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी त्यात मध्यस्थी केली. मतमोजणी पुन्हा करण्याचे ठरले, पण एकंदर ऑगस्टअखेरीपर्यंत अफगाणिस्तानला नवा अध्यक्ष मिळेल की नाही, अशी शंका आहे. इंडोनेशियात मात्र निवडणूक आयोगाने ठाम भूमिका घेतल्याने देश यादवीच्या वगैरे उंबरठय़ावर आला नाही. त्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इंडोनेशियातील जनतेला हवा असलेला बदल जोकोवी यांच्या रूपाने मिळाला. या आधीचे अध्यक्ष सुसिलो बॅम्बँग युधोयोनो यांनी देशाला आर्थिक सुबत्तेच्या वाटेवर आणून ठेवले. आज आशियातील भारत आणि चीन या देशांच्या आर्थिक वाढीच्या वेगाशी इंडोनेशिया स्पर्धा करीत आहे, पण म्हणून तेथे सगळेच आलबेल आहे असे नाही. आशियायी देशांच्या पाचवीला पुजलेल्या भ्रष्टाचार, दारिद्रय़, अपुऱ्या पायाभूत सुविधा, गरीब-श्रीमंत वर्गातील वाढती दरी अशा अनेक समस्या तेथे आहेत. अशा परिस्थितीत देशाचा आर्थिक गाडा पुढे नेतानाच सामाजिक विकासही घडवून आणण्याची क्षमता असणारा नेता जनतेला हवा होता. तो जोकोवी यांच्यात त्यांना दिसला. त्या अर्थाने जोकोवी म्हणजे इंडोनेशियाचे ‘ओबामा’च. तसाच वावर. तसाच आशावाद आणि बदल घडवून आणण्याची आस. ओबामांप्रमाणेच जोकोवी यांनाही सत्तेचा अनुभव होताच. २००५मध्ये ते सुराकार्ता या शहराचे महापौर म्हणून निवडून आले होते. २०१२मध्ये ते जकार्ताचे गव्हर्नर बनले. या काळात झोपडपट्टय़ांना भेटी देणे, सरकारी कार्यालयांत अचानक जाऊन चुकार कर्मचाऱ्यांची हजेरी घेणे अशा प्रचारी कामांतून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळविली. जकार्ताचे गव्हर्नर म्हणून त्यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या योजना लोकांनाही भावल्या. तशात लोकांनाही नातेवाईकशाहीपासून सुटका हवी होती. त्याचा परिणाम माजी राष्ट्राध्यक्ष सुकार्तो यांचे जावई असलेल्या सुबिआन्तो यांच्या पराभवात झाला.  निवडणूक प्रचारात त्यांचे विरोधक नेहमी म्हणत असत की, देश चालवणे हे कोणा छोटय़ा राज्यातील राजकारण्याचे काम नाही. त्यावर जोकोवी यांचे उत्तर होते: अखेर हा सगळा व्यवस्थापनाचा भाग असतो. राज्यकारभारात महत्त्वाची गोष्ट असते ती व्यवस्थापकीय नियंत्रण. जेथे १० कोटी लोकांची दिवसाची कमाई आजही शे-दीडशे रुपयांहून कमी आहे, असा देश चालवण्यासाठी जोकोवी यांचे हे कौशल्य किती कामी येते ते पाहायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा