कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे तेथील एकेकाळचे आधारस्तंभ येडीयुरप्पा यांनी अखेर डाव साधला. महत्प्रयासाने टिकवून ठेवलेल्या भाजप सरकारला सुरुंग लावून आता तेथील विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आणण्यापर्यंत येडीयुरप्पा यांनी राजकारण ताणले आहे. ‘घोटाळा मंत्री’ म्हणून कपाळावर शिक्का बसल्यानंतर पायउतार झालेल्या येडीयुरप्पा यांनी आपणास पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी हरप्रकारे करून पाहिली. चहूबाजूंनी पोळलेल्या भाजपला त्यांची ही मागणी मान्य करून आगीतून फुफाटय़ात उडी घ्यायची नव्हती. येडींच्या कर्नाटक जनता पार्टी या नव्या पक्षाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला भाजपच्या २१ आमदारांनी उपस्थिती लावून मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या पायाखालची सतरंजी काढून घ्यायला सुरुवात केली. २२५ आमदारांच्या विधानसभेत भाजपचे ११८ आमदार आहेत. या नव्या राजकीय पक्षाला पन्नास आमदारांचा पाठिंबा असल्याचा येडीयुरप्पा यांचा दावा आहे. गेली दोन वर्षे सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला सळो की पळो करून सोडले होते. एका अर्थाने नवा पक्ष स्थापन केल्याने आपल्यामागील ब्याद गेली, अशी भाजपची भावना झाली असतानाच राज्यातील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला याबाबतचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत घेणे आवश्यक ठरणार आहे. येडीयुरप्पा यांना, ते केवळ लिंगायत आहेत, म्हणून सत्तेत सहभाग हवा आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही लज्जा सोडून सत्तेत राहण्याची इच्छा असणाऱ्या येडीयुरप्पा यांना त्यांच्याच पक्षात अद्याप आव्हान देऊ शकेल असा नेता नाही, ही भाजपची खरी चिंता आहे. त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी तेवढय़ाच तोलामोलाचा लिंगायत नेता पुढे आणण्यासाठी भाजपने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत, असे दिसते आहे. भाजपसारख्या पक्षात धोरण आणि विचार यावर भरवसा ठेवून राजकारण करणाऱ्यांचे प्राबल्य असते, असे जे सांगितले जाते, ते सध्याच्या जातीच्या राजकारणात किती फोल आहे, हे सिद्ध झाले आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला कर्नाटकमधील त्यांच्याच सहकाऱ्यांनी अशी चपराक लगावली आहे, की भाजपला आपली तथाकथित वैचारिक परंपरा सोडून विधानसभेत लैंगिक फिती पाहणाऱ्यांना पाठीशी घालण्याची वेळ येते आणि खाणी लुटणाऱ्या मंत्र्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवावा लागत होता. येडीयुरप्पा यांच्या या नव्या खेळीने नव्याने निवडणुका झाल्या, तर तेथे भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याची शाश्वती नाही. तेथील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच एवढी सुंदोपसुंदी सुरू झाली आहे की, निवडणुकीपर्यंत आणखी बरेच काही घडू शकणार आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या चिरंजीवांच्या हट्टाखातर कर्नाटकात आघाडीच्या सरकारचाही प्रयोग झाला. परंतु त्याने फारसे काही साध्य झाले नाही. आता आघाडी करण्यासाठीही पक्ष उरलेला नाही आणि स्वत:ची ताकदही हळूहळू कमी होते आहे, अशा कात्रीत भाजप आता सापडला आहे. भाजपने दिलेल्या वागणुकीचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेल्या येडीयुरप्पा यांच्या पाठीशी कर्नाटकातील जनता उभी राहते की त्यांच्याशी दोन हात करता करता हतबल झालेल्या भाजपला साथ देते, हे आत्ताच सांगणे कठीण असले तरीही येत्या काही दिवसांत तेथील राजकीय उलथापालथ अधिक अडचणीची ठरणार आहे, हे मात्र निश्चित.
कर्नाटकातील अस्थिरता
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे तेथील एकेकाळचे आधारस्तंभ येडीयुरप्पा यांनी अखेर डाव साधला. महत्प्रयासाने टिकवून ठेवलेल्या भाजप सरकारला सुरुंग लावून आता तेथील विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आणण्यापर्यंत येडीयुरप्पा यांनी राजकारण ताणले आहे.
First published on: 11-12-2012 at 05:58 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instability in karnataka