भारत हा अजूनही आदिम संस्कृतीत जगणारा देश असून तेथे हरघडी बलात्कार होत असतात. इथल्या पुरुषांच्या नजरा वखवखलेल्या असतात आणि ते महिलांकडे फक्त वैषयिक नजरेनेच बघतात, असा जगातल्या इतर देशांचा समज झाला आहे! दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर भारतात कोणत्याही कारणाने येणाऱ्यांसाठी अशा प्रकारे भारताची ओळख होणे, हा जगातील सर्वात वेगाने विकास पावणाऱ्या आर्थिक शक्तीचा अपमान आहे, यात शंकाच नाही. नॉयडा येथे होत असलेल्या ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या वार्षिक सभेसाठी जगभरातून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामध्ये भारतात वावरताना महिलांनी अंग पूर्णपणे झाकावे, असे म्हटले आहे. आपले पाय उघडे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन करत असतानाच हा देश सर्वच पातळ्यांवर कसा मागासलेला आहे, याची अनेक उदाहरणेच या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आली आहेत. भारतीयांनाही जे माहीत नाही, ते या बँकेच्या अधिकाऱ्यांना कुठून कळले, असा प्रश्न पडावा, अशा या सूचना भारतीय संस्कृतीची आणि येथील नागरिकांच्या वर्तनशैलीची मानहानी करणाऱ्या आहेत. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात अंगभर वस्त्रे घालण्याचीच परंपरा आहे. प्रगत असणे म्हणजे अल्पवस्त्रात राहणे असा अर्थ भारताने आपल्या राहणीमानात कधीच उतरवला नाही. भारतीय चित्रपटांमध्ये वावरणाऱ्या नटय़ा तोकडय़ा कपडय़ात असतात, म्हणूनच येथे बलात्कार होतात, असा जो अपसमज पसरवला जातो, तो किती गांभीर्याने घेतला जातो, याचे हे एक उदाहरण आहे. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांप्रमाणे भारतात पिस्तूल किंवा बंदूक बाजारात उपलब्ध नसतात. इथे कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अगदीच रसातळाला गेलेली नाही. ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’ने त्यांच्या प्रतिनिधींना ज्या सूचना दिल्या आहेत, त्या करमणूक करणाऱ्या आहेत. त्यात म्हटले आहे, की भारतात जाहीर ठिकाणी मिठी मारणे किंवा चुंबन घेण्यास मज्जाव आहे. कोणतेही दोन पुरुष हातात हात घालून दिसले, तर त्याचा अर्थ ते समलिंगी आहेत, असा होत नाही. भारतात समलिंगी प्रवृत्तीला कायद्यानेच नकार दिला आहे.. या आणि अशा सूचना भारतीयांबद्दल जगात कोणत्या प्रकारचे समज आहेत, याचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. प्रत्येक मानवी समूहाची एक सांस्कृतिक रचना असते. तिथल्या माणसांच्या वर्तनशैलीशी आणि त्यांच्या श्रद्धांशी त्याचा संबंध असतो. या श्रद्धा त्या प्रदेशातील माणसांचे जगणेच एक प्रकारे नियंत्रित करत असतात. हे नियंत्रण कायद्याचे नसते. परंतु भारतीय समाज हा विकृत असल्याची जी कल्पना या बँकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे, ती निषेधार्ह म्हटली पाहिजे. या मार्गदर्शक तत्त्वांचा भारतीयांनी विचार मात्र करायला हवा. बलात्काराच्या घटना जगातील सगळ्याच देशांत सतत घडत असतात. परंतु भारताबद्दल असा गैरसमज पसरण्यास दिल्लीतील बलात्काराची घटना कारणीभूत ठरली असेल, तर प्रगत समाज म्हणून आपण आत्मपरीक्षण करायला हवे. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती लाभल्याबद्दल फुकाचा अभिमान बाळगण्यापेक्षा जगाच्या नजरेत आपली जी छी थू होत आहे, त्याकडे काळजीने पाहण्याची मात्र गरज आहे.
भारतनिंदेचा विखार
भारत हा अजूनही आदिम संस्कृतीत जगणारा देश असून तेथे हरघडी बलात्कार होत असतात. इथल्या पुरुषांच्या नजरा वखवखलेल्या असतात आणि ते महिलांकडे फक्त वैषयिक नजरेनेच बघतात, असा जगातल्या इतर देशांचा समज झाला आहे! दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर भारतात कोणत्याही कारणाने येणाऱ्यांसाठी अशा प्रकारे भारताची ओळख होणे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instruction on dress to women member participating in asian development bank annual meeting from india