सद्गुरूंचा बोध हाच जणू विवेकाचा हातवडा आहे आणि त्या बोधानुरूपचं जगणं म्हणजे जीवनाच्या दागिन्याला आकार देणं आहे.. कामक्रोधादि विकारांचा निरास करणं आहे, इथपर्यंत चर्चा येऊन ठेपली. काही क्षण शांतता पसरली. अभ्यासिकेतही बंगलीजवळच्या समुद्राची गाज ऐकू येत होती. जणू या गंभीर चर्चेला पोषक असं पाश्र्वसंगीत निसर्गच देत होता!
हृदयेंद्र – सद्गुरुंचा सहवास हा त्यासाठी अनिवार्य आहे, पण सद्गुरू जर खरा असेल ना तर त्यांच्या सहवासात राहणं हीसुद्धा मोठीच परीक्षा असते! आपल्या मनाविरुद्धच त्यांची प्रत्येक आज्ञा असते, मग कुणाला कसं आवडेल ते? ते सांगतात त्याविरुद्ध वागल्यानंतर जेव्हा जग धक्के देतं तेव्हा सद्गुरुंच्या सांगण्यातला खरा अर्थ समजतो. ते सांगत होते, तसंच वागलो असतो तर इतक्या त्रासात पडलोच नसतो, असं मग कळतं.. तुकाराममहाराज एका अभंगात म्हणतात, ‘‘लोहो परिसासीं रुसलें। सोनेंपणासी मुकले।। येथें कोणाचें काय गेलें। ज्याचें तेणें अनहित केलें।।’’
योगेंद्र – व्वा!  लोखंड परिसावर रुसलं तर त्याचाच तोटा आहे, त्याचंच अनहित आहे..
हृदयेंद्र – तेव्हा सद्गुरुंपासून मीच दूर राहू लागलो तर माझंच अनहित आहे.. तेव्हा दागिनाही सुंदर हवा आणि त्यावर हातवडय़ाचा ठोका नको, असं कसं चालेल?
कर्मेद्र – पण काय हो दादासाहेब, खरंच असा परीस म्हणून काही असतो का हो? (दादासाहेब हसतात आणि काही सांगू पाहातात तोच त्यांच्या हसण्यात साथ देत हृदयेंद्र उद्गारतो..)
हृदयेंद्र – परीस असतो की नाही माहीत नाही, पण सद्गुरू असतोच! त्यांचा तर स्वीकार कर..
कर्मेद्र – हृदयेंद्रमहाराज मी काही लोखंड नाही.. तुझ्याही मते मी दगडच तर आहे..
हृदयेंद्र – पण एका अभंगात सद्गुरुला परिसापेक्षाही विलक्षण मानलं आहे बरं का, हेच म्हटलंय त्यात की परिस फक्त लोखंडाचं सोनं बनवू शकतो, पण तुम्ही तर प्रत्येक जीवमात्राचं सोनंच करता!
कर्मेद्र – चला तो परीस आणि ते सद्गुरू दोघं आपापल्या जागी राहू द्या.. आपण अभंगाच्या पुढच्या चरणाकडे वळू या का?
योगेंद्र – पुढचा चरण आहे.. मनबुद्धीची कातरी। रामनाम सोनें चोरी।।.. दादासाहेब तुमच्या मोबाइलमधल्या हत्यारांच्या त्या छायाचित्रात कात्रीही आहेच..
दादासाहेब – हो ना.. ही पहा..  
योगेंद्र – आपली जी कात्री असते त्यापेक्षा ही वेगळीच आहे..
नाना – हो तर.. हिच्यानं सोन्याचा पत्रा कापतात.. आपल्या कामाची नाही ती..  
हृदयेंद्र – वा! आता मनबुद्धीची कात्री दिसते खरी!
कर्मेद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – अरे या कात्रीच्या आकाराकडे पहा! दोन्ही बाजू समसमान आणि कमानीसारख्या..
कर्मेद्र – कुठल्या कात्रीच्या दोन बाजू समान नसतात?
हृदयेंद्र – तसं नाही रे.. पण यातल्या एका बाजूला आहे ही स्प्रिंग! सोन्याचा पत्रा कापायचं काम किती अलगद असलं पाहिजे.. त्यामुळे कापाकापी सुरू असताना ही स्प्रिंग जणू नियमन, नियंत्रण, रोधकाचं काम करत असली पाहिजे.. (दादासाहेब मान हलवतात) तर ही एक बाजू आहे मनाची आणि स्प्रिंग असलेली दुसरी बाजू आहे बुद्धीची! बुद्धीही मनाच्या आवेगांचं नियमन, नियंत्रण, रोधन करण्याचंही काम करत असतेच ना?
योगेंद्र – ओहो.. पण हे ‘रामनाम सोनं चोरी’ काय आहे? बिचारी निर्जीव कात्री काय सोनं चोरते का?
दादासाहेब – अहो शेवटी सोन्याच्या लहानात लहान कणालाही मोठं मोल असतंच.. पूर्वी सगळी काम एकाच दुकानात होत.. तेव्हा सोनं कापताना त्याचे कण पडतंच, कात्रीलाही चिकटत.. पण ते डोळ्यांना सहज दिसतंही नसत.. अहो आमच्या दुकानातला जो कचरा असायचा ना तोसुद्धा विकला जाई! आजही तुम्ही पाहाता ना, सोनाराच्या दुकानाबाहेर लहान झाडू घेऊन माणसं झाडून कचरा गोळा करत असतात! त्या कचऱ्यातून असे सुवर्णकण मोठय़ा कष्टानं गवसतात.. तर तसे सूक्ष्मकण या कात्रीला चिकटतात..
चैतन्य
प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा