edt04रजनी कोठारींची पुस्तके वाचताना मला दिसे एका विद्वानाची मूर्ती.. बुद्धिमान आणि सांस्कृतिक आत्मविश्वासाने परिपूर्ण असा विद्वान..
काही वेळा काही गोष्टी अनायासे घडून जातात व त्यात ठरवून काही केलेले नसते, पण नंतर जणू तीच आपली ‘नियती’ ठरते. रजनी कोठारी यांच्या ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ या पुस्तकाशी माझी गाठ एका अशाच ‘नियती’ने घालून दिलेली होती. मी नव्हे; तर त्या पुस्तकाने माझी निवड केली होती, जणू काही त्या पुस्तकाची व माझी भेट पूर्वी ठरलेलीच होती. रजनी कोठारी हे शाळा वा महाविद्यालयात मला शिकवायला नव्हते, रूढार्थाने माझे शिक्षक नव्हते, पण नियतीने त्यांना माझे गुरू बनवले.
महाविद्यालयीन शिक्षणाचे ते दिवस होते. श्रीगंगानगर येथील खालसा कॉलेजमध्ये मी बीए करीत होतो. महाविद्यालयाच्या वाचनालयात एका नव्या पुस्तकावर माझी नजर गेली. ते पुस्तक होते रजनी कोठारी यांच्या ‘पॉलिटिक्स इन इंडिया’चा हिंदी अनुवाद. हा अगदीच रसहीन गद्यानुवाद.. त्यातील शब्दही संस्कृतप्रचुर आणि बोजड होते. तरीही मी त्या पुस्तकाच्या वाचनात गढत गेलो, कारण त्याची सुरुवातीची काही पाने वाचतानाच, आपण काही तरी नवे वाचतो आहोत हे लक्षात येत होते. काही पुस्तके तुम्हाला शिकवून जातात, विचार देत नाहीत- पण विचार कसा करावा हे शिकवतात, तसेच ते पुस्तक होते.
बीए झाल्यानंतर ‘पॉलिटिक्स इन इंडिया’च्या साथीने विचार करण्याची सवय लागली. तो एक प्रवासच सुरू झाला. एमएच्या दिवसांतही तो सुरू होता. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माझे अनेक शिक्षक मार्क्‍सवादी विचारांच्या परंपरेतील होते. त्यांच्या चाहत्या विद्वानांमध्ये रजनी कोठारी यांचे नाव नव्हते. त्या वेळी आमचे प्राध्यापक आम्हाला सांगायचे, रजनी कोठारी यांनी जे लिहिले आहे ते वाचा, म्हणजे आपण रजनी कोठारी यांनी राजकारणाची जी ‘चरित्राने मध्यमवर्गीय व चेहऱ्याने व्यक्तिवादी’ अशी व्याख्या केली आहे तिच्याशी वाद घालू शकू, अशा राजकारणावर व तेच अभ्यासणाऱ्यांवर टीका करायला शिकू. ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ पुस्तक मी पुन्हा वाचले. या वेळी ते इंग्रजी भाषेतून वाचले. आता तर ते मला पूर्वीपेक्षा जास्त सखोलतेने समजले व उमजलेही. वर्गात प्राध्यापक भारतीय राजकारणातील मार्क्‍सवादाची खिचडी भरवत होते, त्या तुलनेत कोठारी यांचे पुस्तक म्हणजे विचारांचा खजिना आहे. विचारप्रवर्तक आहे. अनेक नवीन वाटांचे मार्गदर्शक आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील त्या काळात रजनी कोठारी यांना भेटण्याचा योग काही मला आला नाही.. मी अशा जागी होतो, की तसा योग येणारच नव्हता. म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायला मिळणे दूरच राहिले. पण मी त्यांचे सगळे लेखन वाचत राहिलो. मनाने मी एकलव्य होतो. रजनी कोठारींची पुस्तके माझ्यासाठी गुरू होती.
त्यांची पुस्तके वाचताना, ती डोक्यात साठवताना नेमके काय घडायचे हे आठवायला लागलो, की एका विद्वानाची मूर्ती डोळय़ांसमोर यायची. तो विद्वान बुद्धिमान व सांस्कृतिक आत्मविश्वासाने भरलेला होता. रजनी कोठारी यांच्या अगोदर भारतात प्राध्यापकांमध्ये दोन प्रवृत्ती होत्या. त्या एकमेकांवर मात करीत असत. भारतीय लोकशाहीकडे पाश्चिमात्य नजरेतून पाहायचे ही एक प्रवृत्ती होती व दुसरी त्याला एक वेगळे सांस्कृतिक रूप असल्याचा डंका पिटण्याची प्रवृत्ती होती. कोठारी यांनी या दोन्ही विचारांच्या प्रवृत्तींना पर्याय देताना भारतीय लोकशाही राजकारणाकडे सहज सामान्य व आधुनिक दृष्टिकोनातून बघायला शिकवले, त्याचबरोबर हेही सिद्ध केले, की आपल्या या दृष्टिकोनात पाश्चिमात्यांचे लांगूलचालन केलेले नाही. त्यात अस्सल भारतीय लोकशाही राजकारणाचा विचार आहे. आज असे वाटते, की त्यांनी जो मार्ग दाखवला होता तो मनात स्वीकारणे सोपे आहे, पण आचरणात आणणे अवघड आहे. भारतीय लोकशाहीचे वेगळेपण त्यांनी जपले, त्याला आधुनिक रूप देण्याचे काम अजूनही बाकी आहे, त्याला सिद्धान्त व विवेचनाची गरज आहे.
बहुतेक विद्वान हे आपल्या कट्टर विचारांना चिकटून राहतात. आपण ठरवलेल्या चौकटीबाहेर जाण्याची हिंमत त्यांच्यात नसते. रजनी कोठारी यांचे तसे नव्हते. त्यांनी ठरवलेल्या विचारांच्या काही चौकटी त्यांनी मोडल्याही होत्या. आपल्या मनात ठसलेले विचार काही वेळा बदलले होते. ही लवचीकता त्यांच्यात होती. ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक १९७० मध्ये प्रकाशित झाले होते. प्रकाशनाबरोबरच हे पुस्तक एक गौरवग्रंथ बनले. रजनी कोठारी त्या वेळी ४० वर्षांचे होते. नंतर त्यांनी विचारांचे क्षितिज विस्तारत नेले, देशापलीकडे जाऊन जग समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जगाच्या भवितव्याचा विचार नव्या संकल्पनेतून करणाऱ्या विद्वान गटांशी त्यांचे संबंध होते. ‘अल्टरनेटिव्ह’ हे नियतकालिक त्यांच्या या वेगळय़ा वैचारिक घडणीतून जन्माला आले. हे नियतकालिक सुरू झाले तेव्हा आणीबाणी सुरू झाली होती. रजनी कोठारी यांच्यातील लोकशाहीवादी या घटनेने अंतर्बाहय़ हेलावला. तरीही त्यांनी पुन्हा विचार करण्याचे साहस दाखवत बौद्धिक उपक्रमासाठी नव्या वाटा शोधल्या. आणीबाणीनंतर त्यांनी ‘स्टेट अगेन्स्ट डेमोक्रसी’ या नावाने जे लेखन केले आहे ते भारतीय राजसत्तेची समीक्षा आहे. पर्याय शोधण्याची गरज त्यांना आंदोलनांकडे घेऊन गेली. त्यांनी भारतातील विद्वानांची मोट बांधली व त्यातून भारतासाठी एक उद्देशपत्रिका (अजेंडा) तयार करण्यात यावी, असा त्यांचा त्यात हेतू होता. आता विकासाच्या प्रचलित संकल्पनेवर होणाऱ्या टीकेकडे अधिक सहृदयतेने पाहू शकत होते.
आपल्या बौद्धिक मंथनाच्या या काळात रजनी कोठारी हे ज्ञानयोग्यापेक्षा कर्मयोगी अधिक होते. त्यांच्या मते सैद्धान्तिक-शैक्षणिक लेखन व वृत्तपत्रीय लेखन यात काही अनुल्लेखित दरी नसते. त्यांचे अनेक लेख ‘सेमिनार’ या नियतकालिकात छापून आले होते. ते वृत्तपत्रातूनही लिहीत होते. पक्षविहीन राजकारणासाठी त्यांनी ‘लोकायन’ नावाची वेगळी योजना तयार केली. धीरूभाई सेठ व विजय प्रताप यांच्याबरोबर त्यांनी माझ्या पिढीतील अनेकांना या नव्या राजनीतीचा अर्थ आणि व्याकरणही शिकवले.
आंदोलनात सहभागी असल्याने त्यांच्यात खोलवर एक कार्यकर्ता होता. परदेशात त्यांनी आणीबाणीविरोधातील लोकांना एकत्र केले. १९७७ मध्ये जनता पक्षाचा जाहीरनामा लिहिण्यात त्यांची सक्रिय भूमिका होती. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्षही होते. १९८४ मध्ये शीखविरोधी दंगलीनंतर एक अहवाल तयार करण्यात आला होता, त्याचे नाव ‘हू आर द गिल्टी’ म्हणजे दोषी कोण असे होते. या अहवालात काही काँग्रेसी नेत्यांना दोषी ठरवले होते व त्याचे स्पष्टीकरण दिले होते. हे धाडस रजनी कोठारीच करू शकत होते. हा अहवाल लिहिण्यात त्यांचा मोठा वाटा होता व काळाच्या ओघात हा अहवाल एक आदर्श बनून राहिला आहे.
रजनी कोठारी यांच्याकडून १९९३ मध्ये मला थेट शिकण्याची संधी मिळाली. त्या वेळी मी ‘सीएसडीएस’शी संबंधित होतो. सीएसडीएस ही संस्था १९६३ मध्ये रजनी कोठारी यांनीच जेव्हा स्थापन केली, त्या वेळी ते अवघे ३३ वर्षांचे होते. सीएसडीएस त्या वेळी कोठारींचे सेंटर म्हणून ओळखले जात असे. तेथे येऊन मला हे कळले, की एखादी संस्था उभारताना कोठारी यांची भूमिका नेमकी काय असायची. त्यांनी प्रतिभाशाली समाजवैज्ञानिकांना घेऊन एक विचार संप्रदाय उभा केला. वयाच्या पन्नाशीत आपल्याच संस्थेचे नेतृत्व सोडण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला. फार थोडे संस्थाचालक असे करू शकतात. त्यांना मोह सुटत नाही. त्यामुळे सीएसडीएस या संस्थेत पिढीनुसार बदल होत गेले व सुवर्णमहोत्सवी वर्षांत ते एक अग्रणी शैक्षणिक केंद्र बनलेले आहे.
कोठारी यांचे सगळे जीवनच राजकीय पर्यायांचा शोध घेण्यात व्यतीत झाले. या संदर्भात एक योगायोगाची बाब अशी की, मंगळवारी जेव्हा त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे उमेदवारी अर्ज भरायला निघाले होते.
योगेंद्र यादव
*  लेखक आम आदमी पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व पक्षाच्या राजकीय सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत व त्यासाठी दिल्लीतील ‘विकासशील समाज अध्ययन पीठा’तून (सीएसडीएस) सध्या सुटीवर आहेत.
त्यांचा ई-मेल  yogendra.yadav@gmail.com

Story img Loader