योग हा धर्म, भाषा, देश आदींच्याही वर आहे. त्यामुळे योगास हिंदू धर्माच्या जोखडात अडकवणे हे हिंदू धर्मीयांसाठीही कमीपणाचे ठरेल. योगासनांमुळे शरीरापेक्षाही मनास लवचीकता प्राप्त होऊन ते अधिक सहिष्णू बनणे अपेक्षित असते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाने या प्रक्रियेला कितपत चालना मिळाली?
जी गोष्ट पारंपरिक पद्धतीने केली जाते ती अधिक आकर्षक वेष्टनात, नीटनेटकेपणाने करून इतरांना तशी करण्यास उद्युक्त करणे म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. मग ते पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या विवाहाचे मॅरेज सेरिमनी होणे असो, गणपत्युत्सवाचे गणेश फेस्टिव्हल करणे असो वा तंदुरुस्तीसाठी घरोघर केल्या जाणाऱ्या योगासनांचे इंटरनॅशनल योगा डेमध्ये रूपांतर होणे असो. असा बदल काळाचा रेटाच दर्शवतो आणि त्यात काही गर आहे असे नाही. या अशा बदलांकडे परंपरावादी इतके दिवस नाके मुरडून पाहत. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर या परंपरावाद्यांच्या दृष्टिकोनात निश्चितच बदल झाला असणार. विशेषत: ‘आपल्या’ योगक्रियेस मोदी यांनी जे जागतिक परिमाण दिले ते पाहून या परंपरावाद्यांची छाती अनुलोम-विलोम न करतादेखील काही इंचांनी फुगली असेल. कारणे काहीही असोत. मोदी यांच्या निमित्ताने का असेना, या मंडळींना बाजारपेठेचे महत्त्व समजले असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे. आणि तसे ते समजावून दिल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन. परंतु ‘आपला’ योग मोदी यांनी कसा जागतिक स्तरावर नेला याबद्दल अनेकांच्या भावना उचंबळून येत असताना काही गोष्टींचे भान राखणे हे बुद्धियोगाशी द्रोह करणारे ठरेल. ते टाळणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
तेव्हा या आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात आवर्जून विचार करावा असा पहिला मुद्दा म्हणजे िहदू धर्मीयांनी योगावर आपला स्वामित्व हक्क सांगणे. तसे करणे क्षुद्र ठरेल. विशेषत: योगाच्या मुद्दय़ावर मोदी यांच्या आसपासचे भगवे वस्त्रधारी जी भाषा वापरत आहेत ती भीतीदायक आहे. असे करून ही मंडळी योगास संकुचित करीत आहेत. याचे कारण योग हा धर्म, भाषा, देश आदींच्याही वर आहे. त्यामुळे योगास हिंदू धर्माच्या जोखडात अडकवणे हे हिंदू धर्मीयांसाठीही कमीपणाचे ठरेल. विविध आजारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लशी शोधणारे, जीवदान देणाऱ्या हृदयरोपणासारख्या शस्त्रक्रिया विकसित करणारे शल्यक हे ख्रिश्चन धर्मीय होते म्हणून उद्या पोप महाशयांनी या विद्याशाखांवर ख्रिस्ती धर्माचा क्रूस रोवला तर योग्य ठरेल काय? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात हरिनामाचे गोडवे गाणाऱ्या अनेक उत्तम चीजा मुसलमानी खाँसाहेबांनी रचलेल्या आहेत. म्हणून उद्या एखाद्या धर्माध माथेफिरूने त्यावर दावा ठोकला तर ते आपणास चालेल काय? मानवी आयुष्य समृद्ध करणारे अनेक शोध लावणारे अनेक जण यहुदी धर्मीय होते. म्हणून त्यावर इस्रायलने मालकी सांगावी काय? या संदर्भात आवर्जून लक्षात घेण्याजोगी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पातञ्जल योगसूत्रांचे पहिले भाषांतर हे अरबी भाषेत झाले आहे. तेव्हा योग म्हणजे हिंदू धर्माने जगाला दिलेली देणगी असे म्हणणे संकुचितपणाचे ठरेल. योगसाधकांनीच असा संकुचितपणा दाखवणे योग्य नव्हे.
या संदर्भातील दुसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा. तो प्रत्यक्ष योगक्रियेबद्दल आहे. तो म्हणजे योग म्हणजे केवळ शारीरिक हालचाली नव्हे. योगक्रियांचा थेट संबंध मनाशी आहे. त्याचमुळे पातञ्जल योगदर्शनाचे पहिले नाव ‘भारतीय मानसशास्त्र’ असे आहे. तेव्हा दोनपाच आसने करणे म्हणजे योगा करणे असे मानणे खुळचटपणाचे ठरेल. या खुळचटपणास राजाश्रय देण्याचे पाप नि:संशय बाबा रामदेव आणि तत्समांचे. या असल्या भडभुंजा भोंदूंनी योगास अत्यंत उठवळ केले असून हे एका अर्थाने योगाचे नुकसानच होय. प्राणायाम, अनुलोम..विलोम, भस्त्रीका, ध्यान आदी अवस्था जाणून घेण्यासाठी योगशास्त्रात प्रावीण्य मिळवावे लागते. त्या घाऊक पद्धतीने शिकविता येत नाहीत आणि तसे शिकवणे शारीर आणि मानसशास्त्रीयदृष्टय़ा धोक्याचे असते. बाबा रामदेवास त्याची फिकीर नाही. पातञ्जल योगशास्त्रानुसार सूर्यनमस्कार हा ताडासनापासून सुरू होऊन आठ आसनांनंतर संपूर्ण होतो. बाबा रामदेव तो फक्त तीन आसनांत उरकतात. परिणामी, सूर्यनमस्कार हे दंडांवर बेटकुळ्या आणून दाखवणाऱ्या जिम नावाच्या आधुनिक व्यायामशाळांत केल्या जाणाऱ्या पुशअपसारख्या व्यायामप्रकाराच्या पातळीवर उतरतात. हे त्या योगक्रियेचे अध:पतन होय. ‘योगांगाच्या अनुष्ठानाने चित्तांतील अशुद्धीचा क्षय होऊन ज्ञान प्रदीप्त होत जाणे अपेक्षित आहे’, असे पतञ्जली सांगतात. तेव्हा रंगमंचावर उभे राहून पोटाचे स्नायू गरागरा फिरविण्याचे कौशल्य साध्य होणे म्हणजे योग नव्हे, हे पहिल्यांदा ध्यानात घेण्याची गरज आहे. ती समजून घेतल्यास बाबा रामदेव यांच्यासारख्यांची दुकानदारी बंद होईल. तेव्हा योग म्हणजे केवळ आसने नव्हेत. मूळ पातञ्जल योगशास्त्रातील १९६ श्लोकांत कोठेही आसनांचा उल्लेख नाही. भक्तीच्या नवविधा प्रकारांत ज्याप्रमाणे मूर्तिपूजा ही प्राथमिक पातळी असते आणि बहुसंख्य भाविक त्या पहिल्याच पायरीस कवटाळून बसतात त्याप्रमाणे योगक्रियेचे झाले आहे. सगळ्याचेच सुलभीकरण होण्याच्या काळात असे होणे दुर्दैवी असले तरी आश्चर्यकारक नाही. यात फरक इतकाच की योगसाधनेच्या टप्प्यात आसने ही दुसरी पायरी आहे. यम आणि नियम यांनी योगमार्ग सुरू होतो. यम नियमांचे पालन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर आसने येतात. परंतु सध्याचा हास्यास्पद प्रकार म्हणजे पहिल्या टप्प्याची फिकीर न बाळगता सर्वच जण थेट आसनांना भिडतात. दहावी उत्तीर्ण न होताच पदवी परीक्षेची तयारी करण्यासारखेच हे. परंतु अनेकांना त्याचे भान नसते आणि रविवारी दिल्ली आणि गल्लीगल्लीतील राजपथांवर आसनांचा घाऊक रतीब घालणाऱ्यांनाही ते असण्याची शक्यता नाही. बेमुर्वतखोर जीवनशैली आणि सौख्यसाधने ओरबाडून घ्यायची क्षमता यामुळे सुटलेली पोटे आत जावी यासाठी हा वर्ग योगासनांच्या आश्रयास जातो. त्यांचे उद्दिष्ट योगासनांनी साध्य होत नाही. कारण योगासने हा उष्मांक जाळण्याचा मार्ग नाही. हे समजून घेण्याची कुवत नसलेले अंगाची गोलाई दाखवणारे तंग कपडे आणि रंगीबेरंगी चटया यावर प्रेक्षणीय आसने करणे यालाच योग साधना मानू लागतात आणि ती केल्यानंतर न आलेला घाम पुसत योगा किती ‘बेनिफिशियल’ आहे, त्याच्या बाता मारण्यात मश्गूल होतात. अशा मंडळींचा अलीकडच्या काळात आपल्याकडे चांगलाच सुळसुळाट झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अशा बनव्यांना चमकण्यासाठी एक अधिकृत व्यासपीठ मिळेल.
पण म्हणून याचे महत्त्व कमी लेखण्याचे कारण नाही. फार काही नसले तरी अशा मिरवण्याचेही काही फायदे असतातच. योग आसनांसाठी चटया वा पांढरे कपडे तयार करणारे/ विकणारे, योगासनांच्या शिकवण्या करणारे वगरेंच्या हाती चार पसे पडू शकतात हा एक मोठाच फायदा. कोणत्याही कारणाने असेल, पण अर्थव्यवस्थेचे चाक अंगुळभर का होईना पुढे जात असेल तर ते केव्हाही स्वागतार्हच. कारण बाकी काही जमले न जमले तरी अर्थयोग हाच महत्त्वाचा. त्यासाठी तरी अशा दिनांचा उपयोग होतो हे विसरून चालणार नाही. परंतु त्याचे महत्त्व तितकेच. रविवार, २१ जून रोजी योग दिन साजरा होत असताना आंतरराष्ट्रीय जिराफ दिनदेखील साजरा होत होता. म्हणजे लगेच जिराफांना आता चांगले दिवस येतील असे नाही. तसेच योग दिनाचेही.
हे समजून घेण्याची क्षमता तयार करणे म्हणजे योगसाधनेतील पहिला टप्पा. योगासनांमुळे शरीरास.. किंबहुना शरीरापेक्षाही मनास.. लवचीकता प्राप्त होऊन ते अधिक सहिष्णू बनते. निदान तसे अपेक्षित असते. आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवामुळे ती प्रक्रिया सुरू होईल अशी आशा बाळगणे अस्थानी ठरणार नाही. भंगु दे काठिण्य माझे, आम्ल जाउ दे मनीचे ही मर्ढेकरांची प्रार्थना योग दिनाच्या निमित्ताने फळणार असेल तर त्याचे स्वागतच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा