इंटरनेटला नवमाध्यम म्हणता म्हणता या माध्यमाने तिसाव्या वर्षांत प्रवेश केला. मात्र, जगभर इंटरनेटविषयीच्या चिंतन आणि चर्चामधून जे सार निघते, ते उत्साहवर्धक नाही..इंटरनेटच्या तिशीतले प्रश्न हे इंटरनेटचे नसून माणसांचेच आहेत..
जगभरात कोठेही संगणकाधारित संदेशवहन करू शकणारी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/ इंटरनेट प्रोटोकॉल ही व्यवस्था १९८३ सालच्या एक जानेवारीपासून स्वीकारण्यास अमेरिकी संरक्षण खात्यातील माहिती-संदेश विभागाने मान्यता दिली. मुळात अशा संदेशवहनाच्या कल्पनेचा जन्म १९६९ सालचा; पण आज चिनी इंटरनेट-बंधनांच्या नावाने खडे फोडणाऱ्या अमेरिकेने तब्बल १४ वर्षे संदेशवहनाची ही व्यवस्था आम आदमीपर्यंत पोहोचू दिली नव्हती. ते अखेर झाले. त्या वेळी शाळा वा कॉलेजात असणारे काही भारतीय तरुण पुढे दशकभरात अमेरिकेस जाऊन इंटरनेटच्या युगाला साजेशी उत्पादने बनवू लागले. मधल्या काळात इंटरनेट कसे आहे, याची आपापल्या परीने चर्चाही समाजशास्त्रज्ञांपासून देशोदेशींच्या सामान्यजनांपर्यंत सर्व पातळय़ांवर घडू लागली आणि काही प्रश्न समोर आले. माहितीचा विस्फोट हा शब्द अदबीने वगैरे उच्चारण्याचा काळ सरला, तेव्हा माहितीच्या अजीर्णाबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या. या चर्चाशी आपला काय संबंध आहे, हा प्रश्न विचारण्याची सोयच उरलेली नसावी, इतके आपण भारतवासी भारतीयदेखील इंटरनेटच्या दुष्परिणामांची चर्चा करू लागलो..तेही आपल्या देशातील परिस्थिती निराळी असताना. भारतात १९९५ मध्ये इंटरनेट हा शब्द प्रथम ऐकू येऊ लागला आणि १९९९पर्यंत त्याचा प्रसार सुरू झाला, तो आजही होतोच आहे. तेव्हा इंटरनेटचे भारतीय वय १७ वर्षे. शिवाय, एकंदर भारतवासींपैकी फार तर १२ ते १३ टक्केच माणसे इंटरनेटशी नेहमीसाठी जोडली गेली असूनदेखील इंटरनेटविषयीची चर्चा करण्यात आपण मागे नाही. लोकसंख्या आणि इंटरनेट वापरकर्ते यांचे हेच प्रमाण अमेरिकेत ८० टक्के आहे आणि ब्रिटन, जर्मनी व हॉलंडमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक; तरीही प्रश्न सारखे. कारण इंटरनेटवरून इंग्रजीत जो काही माहितीचा भडिमार चालू आहे, तो कायदे करून वा आपापला संगणक नीट वापरला की झाले, अशा रीतीने थांबवता येणार नाही. वर्षे ३० की १७ की १५, याला महत्त्व नाही, ते याचमुळे. इंटरनेटने काही महत्त्वाचे सामाजिक आणि मानवी प्रश्न अधोरेखित केले. ते केवळ अभ्यासकांपुरते प्रश्न नसून इंटरनेटशी ओळख असणाऱ्या सर्वाचा त्या प्रश्नांशी या ना त्या प्रकारे परिचय आहे.
इंटरनेटचा वापर ज्या देशांतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या करते, तिथे दहा वर्षांपूर्वीपासून नेहमीसारखे जगण्याऐवजी नेटवरील व्हच्र्युअल, आभासी जीवनच पसंत करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तो आपल्याकडे फारसा झाला नाही, पण सोशल नेटवर्किंगचा प्रसार वाढल्यानंतर जो नवीन प्रश्न उभा राहिला तो सर्व देशांत समान आहे-  लोकांशी वागायचे ते स्वत:चा इगो कुरवाळण्यासाठी, ही प्रवृत्ती इंटरनेटच्या अगोदरही माणसांमध्ये होतीच, पण त्या प्रवृत्तीचे प्रदर्शन होत नव्हते. ते होण्याची जागा म्हणजे फेसबुक वा ट्विटरसारखी सोशल नेटवर्किंगची स्थळे. अनोळखी समुदायांसमोर भावनांचे प्रदर्शन आणि त्यातून होणारी नवी सुखदु:खे यांचे प्रयोग सध्या जोरात आहेत. कोणतीही मैत्री कधीही आक्षेपार्ह नसावी, पण मारूनमुटकून, आटापिटा करून मित्रसंख्या वाढवणाऱ्यांची भावनिक उपासमार चिंताजनक पातळीला जाऊ शकते. हे जसे नेदरलँडचे दुखणे, तसेच भारताचेही. इंटरनेटवरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये चोरीमारी, फसवणूक यांचे प्रमाण कमी त्रासदायक म्हणावे, इतक्या मोठय़ा प्रमाणात ही भावनिक हानी सुरू आहे. जे एरवीच्या जगण्यात घडते तेच इंटरनेटवर सुरू असणार, हा युक्तिवाद वरकरणी आशादायी आणि बिनचूकही वाटेल. पण इंटरनेटमुळे जगण्याच्या सवयी बदलताहेत त्याचे काय, असा अभ्यासकांचा सवाल आहे आणि अशा अभ्यासकांनी इंटरनेटनंतर घडत-बिघडत गेलेल्या संस्कृतीचा अभ्यास करणारी अभ्यासशाखाही उघडली आहे.
ही मानवी चिंता एकीकडे, तर दुसरीकडे कृत्रिम प्रज्ञावाद्यांपैकी एक स्वप्नाळू शाखा म्हणते आहे की, इंटरनेटद्वारे संगणकांत पसरू पाहणारे व्हायरस हे काही केवळ उच्छाद मांडणारेच असतील असे कोठे आहे? हे व्हायरस मानवी चुकांमुळे वा दुष्टाव्यामुळे पसरतात, असे तरी का गृहीत धरायचे? पुढे या स्वप्नाळूंचे म्हणणे असे की, आजचे व्हायरस हे कदाचित उद्याच्या विचारी कृत्रिम प्रज्ञेची नांदी असू शकतात! यंत्राद्वारे यंत्र चालवण्यातील यश ही कृत्रिम प्रज्ञा मानण्यास अशी मंडळी तयार नसतात. गुगलच्या अल्गोरिदमला ‘बुद्धी’ आहे, ती वाढतही जाणार आहे, हे सर्वाना माहीत असले की अशी स्वप्ने अधिकच घट्ट होऊ लागतात. गुगलने लिंक-आधारित शोधासाठी जी यांत्रिक नियतरीत वापरली, तीत पुढे भर पडत गेली हे खरे असले तरी गुगलला खरा रस आहे तो ही बुद्धिसदृशप्रणाली जास्तीत जास्त माणसांना जास्तीत जास्त वेळ गुगलशीच कसे बांधलेले ठेवील, यात. यामागचा हेतू शुद्ध व्यावसायिक आहे आणि असे हेतू गैर ठरवता येत नाहीत.
परंतु, इंटरनेटची मालकी आहे कुणाकडे, असा सवाल उच्चरवात करणारे जे नवे समाजवादी आहेत, ते इंटरनेटवरूनच अशी टीका करताहेत की, इंटरनेटवरल्या लोकप्रिय स्थळांनी मानवी व्यवहारांवर सत्ता गाजवण्याचा दिवस दूर नाही. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण माणूस हा इंटरनेटचा गुलामच होणार आणि उदाहरणार्थ गुगल किंवा फेसबुक दाखवील तेवढेच जग आहे असे मानू लागणार, ही शक्यता सध्या दुरान्वयाची आहे. असे होईलही, पण दोनचारऐवजी अधिक स्थळांकडून होईल. गुगलने याहू किंवा फेसबुकने इन्स्टाग्राम विकत घेतले, म्हणून होणारी चर्चा जणू अफगाणिस्तान रशियाने गिळंकृत केल्याच्या चर्चेसारखी ठरेल. इंटरनेट वापरातून होणाऱ्या परिणामांबद्दलच्या वैयक्तिक आणि सामाजिक चिंताकाळज्या, त्याच्या शक्तीविषयीचा गूढ आदर किंवा त्याहून गहन अनादर, या छटा इंटरनेटविषयीच्या चर्चामध्ये दिसत राहणारच. पण त्या चर्चामधून होणारे निदान मात्र गंभीर आहे. भावनिक गुंतागुंत अनाकलनीय ठरणे, व्यावहारिक गोष्टींमागे व्यवहाराचीच कारणे असू शकतात हे लक्षात न घेता त्या प्रत्येक व्यवहारामागचा हेतू कुटिलच असतो असे म्हणावेसे वाटणे किंवा अतिरेकी स्वप्नाळूपणा ही प्रौढत्वाची लक्षणे नाहीत.   
हे प्रश्न इंटरनेटच्या प्रसारानंतरचे आहेत आणि ते इंटरनेटमुळे नव्हे, तर माणसांमुळेच निर्माण झालेले आहेत. इंटरनेट पन्नाशीत जाईल तेव्हा मात्र ते सुटलेले असतील, कारण माणसांचे गुणावगुण तोवर बऱ्यापैकी उघडे पडलेले असतील आणि एकदा केलेल्या चुका न करण्याची समजही आलेली असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा