असहिष्णुता – मग ती परप्रांतीयांबद्दल असो वा परधर्माबद्दल – आजचा युगधर्म बनली आहे काय? युगधर्म हा फारच मोठा शब्द झाला. परंतु भवताली तशी परिस्थिती खासच आहे. असहिष्णू आक्रमकता आणि त्यातून उद्भवणारा सामाजिक संघर्ष ही परिस्थिती मागासलेल्या देशांचीच मक्तेदारी आहे, असेही समजण्याचे कारण नाही. ऑस्ट्रेलियातील एका मंत्र्याने कुराणावर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतली. ही तशी अत्यंत सर्वसाधारण घटना, परंतु त्यावरून तेथील समाजमाध्यमांतून जो गदारोळ निर्माण झाला, तो पाहता आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रगती यांचा आंतरसंबंध नसतो, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात सत्ताबदल झाला. ज्युलिया गिलार्ड या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांच्या जागी केव्हिन रुड आले. गिलार्ड यांना त्यांच्या कारकिर्दीत जो पुरुषवर्चस्ववादाचा सामना करावा लागला, त्यातून हा स्थलांतरितांचा देश अजूनही सामाजिकदृष्टय़ा स्थिरावलेला नाही, हेच स्पष्ट झाले. त्या पुरुषवर्चस्ववादामध्ये बेमालूम मिसळलेला धार्मिक कट्टरतावाद तेव्हा कुणाच्या लक्षात आला नव्हता. तो एड ह्य़ुसिक यांच्या शपथविधी प्रकरणातून मुखर झाला. नव्या मंत्रिमंडळात केव्हिनरुड यांनी एड ह्य़ुसिक या मुस्लीम नेत्याचा समावेश केला. ह्य़ुसिक हे पहिले मुस्लीम मंत्री ठरले. मात्र गिलार्ड यांना ज्याप्रमाणे त्यांच्या बाईपणामुळे त्रास भोगावा लागला, त्याचप्रमाणे ह्य़ुसिक यांना ते मुस्लीम धर्मनिष्ठ असल्याने टीकेचे धनी बनावे लागले. ह्य़ुसिक यांनी कुराणावर हात ठेवून शपथ घेतल्याने ऑस्ट्रेलियातील अनेकांचा पापड मोडला. या टीकाकारांचे म्हणणे असे, की त्यांनी बायबलसाक्ष शपथ घ्यायला हवी होती. तसे झाले असते, तर त्यांचे ऑस्ट्रेलियात्व अधोरेखित झाले असते. हा एकूण ख्रिश्चनत्व हेच राष्ट्रीयत्व असा प्रकार झाला. वस्तुत: यापूर्वी खुद्द गिलार्ड यांनी बायबलवर हात ठेवून पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली नव्हती. काही ज्यू मंत्र्यांनी टोराहवर हात ठेवून शपथ घेतलेली होती. टीकाकारांना ते चालले. कुराणाची शपथ मात्र चालली नाही. इस्लामविषयीच्या तीव्र भयगंडाचाच हा परिणाम आहे. अर्थात येथे हीही गोष्ट विचारात घ्यावयास हवी, की अवघी २.२५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशातील बहुसंख्याकांमध्ये हा इस्लामोफोबिया कोठून आला? इस्लाममधील आक्रमक कट्टरतावादी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियातील मुस्लिमांमध्ये जिहादी मानसिकता रुजवण्याचे त्यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. गतवर्षी ‘इनोसन्स ऑफ मुस्लीम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सिडनेमध्ये झालेला हिंसाचार हे त्या प्रयत्नांचेच फलित होते. मात्र त्या आंदोलनाचा मध्यममार्गी मुस्लिमांनी कडाडून निषेध केला होता, ही बाबही येथे ध्यानी घेतली पाहिजे. मुस्लिमांतील या मवाळपंथी विचारधारेला बळ देण्याची आवश्यकता ऑस्ट्रेलियातील राजकीय वर्गास पटलेली दिसते. मात्र धार्मिक प्रतिक्रियावाद्यांमुळे तेथील ‘सेक्युलर’ बहुसांस्कृतिकता नासत चाललेली आहे. ह्य़ुसिक यांच्या प्रकरणातून जाणवलेल्या ख्रिश्चनत्व हेच ऑस्ट्रेलियात्व या भावनेतून तेथील समाजाचे हेच नासलेपण समोर आले आहे.
असहिष्णूंचा वेडाबाजार!
असहिष्णुता - मग ती परप्रांतीयांबद्दल असो वा परधर्माबद्दल - आजचा युगधर्म बनली आहे काय? युगधर्म हा फारच मोठा शब्द झाला. परंतु भवताली तशी परिस्थिती खासच आहे. असहिष्णू आक्रमकता आणि त्यातून उद्भवणारा सामाजिक संघर्ष ही परिस्थिती मागासलेल्या देशांचीच मक्तेदारी आहे, असेही समजण्याचे कारण नाही. ऑस्ट्रेलियातील एका मंत्र्याने कुराणावर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतली. ही तशी अत्यंत सर्वसाधारण घटना, परंतु त्यावरून तेथील समाजमाध्यमांतून जो गदारोळ निर्माण झाला, तो पाहता आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रगती यांचा आंतरसंबंध नसतो, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे.

First published on: 04-07-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intolerant peoples crack brained gathering