अजब पब्लिकेशन्स-डिस्ट्रिब्युटर्सच्या ‘पन्नास रुपयांत पुस्तक’ या योजनेला सध्या मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवलीतील एकंदर पाच आणि एकटय़ा दादर पश्चिम भागातील दोन ठिकाणी ही विक्री चालू असताना रांगा मुंबईतील एकाच दुकानापुढे लागल्या, कारण वृत्तवाहिन्यांनी या एकाच दुकानाची दृश्ये दाखविली होती.  पुस्तकांच्या खरेदीसाठी रांगा लावणारे लोक महाराष्ट्रात पहिल्यांदा दिसले ते १९१५ साली लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’च्या वेळी. त्यानंतर ही बहुधा दुसरीच वेळ. ‘केसरी’च्या वाचकांनी ‘गीतारहस्या’ची जाहिरात सकाळी वाचून गायकवाड वाडय़ासमोर रांगा लावल्या. आता टीव्हीवरच्या बातम्या पाहून लावल्या. फरक आहे तो फक्त माध्यमाचा. मराठी पुस्तके स्वस्त मिळताहेत या बातमीची लोक जणू वाट पाहात होते, हे मात्र यामुळे दिसले. यापूर्वी स्वस्त आवृत्ती, जनआवृत्ती काढून वाचकांना कमी खर्चात पुस्तक उपलब्ध करून देता येईल का, याचा मराठी प्रकाशकांनी फारसा विचार केलेला नाही. अपवादानेच राजहंस, रोहन या प्रकाशन संस्थांनी त्यांच्या काही पुस्तकांच्या जनआवृत्त्या काढल्या, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रंथालीची पुस्तके विक्रेत्यांकडे दहा टक्के सवलतीत मिळत असली तरी ती ग्रंथालीमध्ये वा त्यांच्या पुस्तक प्रदर्शनांमध्ये ४० टक्के सवलतीतच मिळतात, पण प्रकाशकांची व्यावहारिक अडचण अशी असते की, त्यांना फक्त त्यांच्याच पुस्तकांच्या बाबतीत असा प्रकार करता येतो. त्यामुळे सर्व थरांतील वाचकांना आवडतील अशी पुस्तके कुठल्याही एका प्रकाशकाकडे नसल्याने ‘पन्नास रुपयांत एक पुस्तक’सारखी योजना विक्रेते-वितरक यांनीच राबवायची योजना आहे. तशी ती अजबने राबवली. तिचा पुरेसा गवगवा केला. आधी आपल्या उत्पादनांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करायची, ती बाजारात आणायची आणि मग त्यांची मागणी ‘क्रिएट’ करायची, या अर्थशास्त्रीय नियमानुसार अजबने हा प्रयोग केला आहे. या योजनेतली जवळपास सर्व पुस्तके कॉपीराइट फ्री आहेत. त्यामुळे लेखकांच्या रॉयल्टीचा प्रश्न नाही. काही पुस्तकांचे हक्क अजबने कायमस्वरूपी लेखक वा त्यांच्या वारसांकडून विकतच घेतले आहेत, पण तशी पुस्तके फार कमी आहेत. बरीचशी पुस्तके तशी आकाराने लहान आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या १५-२० हजार प्रती छापल्याने निर्मिती खर्चात मोठी कपात झाली. शिवाय हल्ली छपाईच्या तंत्रज्ञानात सुलभता आली असल्याने पुस्तके स्वस्तात छापणे आणि सुबकपणे छापणे तुलनेने स्वस्त झाले आहे, हे यातले खरे इंगित आहे. त्यातच, सध्याचा जमाना लोकांच्या ‘सेल’ग्रस्त मानसिकतेचाही आहे. अजबने गेली अनेक वर्षे वाचकांना हवी असलेली सावरकर, वा. ना. हडप, साने गुरुजी, नाथ माधव यांचीच पुस्तके प्राधान्याने आणली आहेत. त्यात कुठलीही नवी पुस्तके नाहीत. उलट आपल्या वाडवडिलांनी जी पुस्तके चांगली म्हटली, तीच ही. वाचकांची आवड, क्रयशक्ती आणि नवे तंत्रज्ञान यांचा रीतसर अभ्यास करूनच एका प्रकाशन संस्थेने ही धाडसी योजना आखली आणि गेले वर्ष-दीड वर्ष पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि आता मुंबई अशी टप्प्याटप्प्याने राबवत आणली, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. यातली फायदेशीर मौज पाहून इतर प्रकाशकही असेच धाडस करू पाहतील, पण मराठी माणसाची मानसिकता ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. त्यांचा उन्मादज्वर आंदोलनाच्या सहभागातला असो की सेलमध्ये खरेदी करण्यातला.. तो फार काळ टिकत नाही. अर्थात, आणखी काही काळ तरी स्वस्त पुस्तकांच्याच बाजूचा आहे एवढे नक्की.

Story img Loader