हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग सुरू झालं, त्या सुमारास या क्षेत्रात नौशाद, सी. रामचंद्र, के. दत्ता, अनिल विश्वास, नंतर शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, रोशन, हेमंतकुमार, सलील चौधरी आदी प्रतिभाशाली संगीतकारांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. या पंक्तीत एस. डी. बर्मन अर्थात सचिनदा आपल्या बंगाली संस्कृतीचा, लोकसंगीताचा वारसा घेऊन आले. त्यांच्या समकालीन संगीतकारांपैकी कोण पाश्चिमात्य संगीत देत होता, कोण निखळ भारतीय, कोणी आपल्या संगीतात वाद्यांचा प्रभाव दाखवत होता, तर कोण एकाच वेळेला भारतीय आणि पाश्चिमात्य प्रभाव असलेल्या गाण्यांनी लोकांची मनं जिंकून घेत होता. सचिनदा मात्र या सर्वापेक्षा वेगळे ठरले! आणि ते त्यांनी अखेपर्यंत टिकवलं. जिद्द, संगीतात सातत्यानं प्रयोग करण्याची वृत्ती आणि निखळ व्यावसायिकपणा यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. १९५१ मधल्या ‘बाजी’ या चित्रपटातलं ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले’ (गायिका – गीता दत्त) हे गीत त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचं ‘थीम सॉँग’ ठरलं.
अशा या सचिनदांचा विस्तृत प्रवास खगेश देव बर्मन यांनी ‘एस. डी. बर्मन – द वर्ल्ड ऑफ हिज म्युझिक’ या चरित्रात सविस्तर मांडला आहे. यात त्यांच्या एकंदर सांगीतिक कारकिर्दीसह त्यांचं बालपण; त्रिपुरातील वास्तव्यात झालेले संगीताचे संस्कार;  संगीत आणि कलाप्रेमी, चांगले सतारवादक असलेले वडील नवद्वीप चंद्र बर्मन; कलाप्रेमी, नृत्यप्रेमी मातोश्री निरुपमा देवी यांच्याकडून संगीताचा  मिळालेला वारसा, याचं प्रवाही वर्णन पहिल्या दोन प्रकरणांमध्ये खगेश यांनी केलं आहे. सचिनदांच्या चिरतरुण संगीताची बीजं या प्रकरणांमध्ये जाणवतात. नंतर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण आटोपून सचिनदा १९२५ मध्ये कोलकात्याला आले. तिथं त्यांचा १९३२ पासून संगीतप्रवास सुरू झाला. पहिलं बंगाली गीत त्यांनी याच वर्षी गायलं. नंतरच्या काळात त्यांनी बरीच बंगाली गीतं गायली. त्यांचा पहिला बंगाली चित्रपट ‘सांझेर प्रदीप’(१९३५). त्यानंतर त्यांनी १८ बंगाली चित्रपटांना संगीत दिलं.
सचिनदांचा प्रारंभीचा कोलकात्यापर्यंतचा प्रवास खगेश यांनी पहिल्या तीन प्रकरणांमध्ये, तर शेवटच्या प्रकरणात त्यांच्या मुंबईच्या कारकिर्दीचा दीर्घ आलेख मांडला आहे. १९४४ मध्ये ते मुंबईत आले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘आठ दिन’ (१९४६). परंतु सुरुवातीला मनासारखं यश न मिळाल्यानं पुन्हा कोलकात्यात जाण्याच्या तयारीत असलेले सचिनदा अशोककुमार यांच्या सल्ल्यावरून ‘मशाल’ (१९५०) या चित्रपटाचं संगीत स्वीकारतात. यातील मन्ना डे यांनी गायलेलं ‘उपर गगन विशाल’ हे गीत कमालीचं लोकप्रिय ठरतं आणि सचिनदा आपला विचार बदलतात. त्यानंतर अखंड अडीच दशकं सुरू होतो अत्यंत प्रवाही, तालबद्ध असा संगीतप्रवास.. त्यांनी तब्बल ८९ हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरले ‘बाजी’, ‘नौजवान’, ‘सजा’, ‘पेइंग गेस्ट’, ‘प्यासा’, ‘कागज़्‍ा के फूल’, ‘नौ दो ग्यारह’, ‘चलती का नाम गाडी’, ‘काला पानी’,  आणि ७० च्या दशकातला ‘अभिमान’. या चित्रपटांमधली ‘थंडी हवाएँ’, ‘तुम ना जाने किस जहाँ में खो गए’, ‘छोड दो आँचल’, ‘माना जनाब ने पुकारा नहीं’, ‘हाल कैसा है जनाब का’, ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ यांसारखी सचिनदांनी स्वरबद्ध केलेली गाणी एव्हरग्रीन ठरली आहेत.
या गीतांमधून सचिनदांचं अष्टपैलुत्व सिद्ध होतं. मात्र यापैकी अनेक गाण्यांचं मूळ बंगाली रूपही लेखकाने नमूद केलं आहे. बासरीचा उपयोग ही सचिनदांची खासियत होती.
हिंदी चित्रपटातले कलाकार, संगीतकार, गायक, गीतकार आणि इतर घटकांबद्दल सर्वसामान्य रसिकांना औत्सुक्य असतं. अशा प्रकारच्या पुस्तकातून त्याचा काही प्रमाणात खुलासा होणं अपेक्षित असतं. पण यात काही गोष्टी स्पष्ट होतात, काही अर्धवटच राहतात. उदाहरणार्थ, लतादीदी साधारण १९५७ ते १९६१-६२ पर्यंत बर्मनदांकडे का गात नव्हत्या? त्या काळात त्यांना प्रामुख्यानं साथ मिळाली आशा भोसले यांची. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांचे परस्परांशी संबंध हा एक गुंतागुंतीचा विषय. परंतु सचिनदांनी सर्व गायक-कलाकारांशी निखळ व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले होते. अर्थात ‘बंदिनी’ आणि ‘डॉ. विद्या’पासून दीदींनी सचिनदांकडे गाणी गायली. ‘जाए तो जाए कहॉँ’, ‘जलते है जिसके लिए’ गाणाऱ्या तलत मेहमूदला नंतर सचिनदांच्या संगीतात फारसं स्थान का मिळालं नाही, याचाही उलगडा होत नाही. तसंच सुमन कल्याणपूर यांच्याबाबतीतही आहे. खगेश यांनी अनेक ठिकाणी सचिनदांच्या ‘संगमर निखद’ या मूळ आत्मचरित्रातले उतारे दिले आहेत. याखेरीज इतर मान्यवर, त्यांचे सहकारी आदींनी सचिनदांविषयी जे मतप्रदर्शन केलं आहे, त्यांचाही समावेश अनेक ठिकाणी केला आहे.
सचिनदांनी चित्रपट संगीतात नवे ‘ट्रेण्ड’ कसे आणले, याचेही दाखले खगेशनी दिले आहेत. चित्रपटाच्या कथेप्रमाणे आधी संगीत आणि नंतर काव्य ही पद्धती सचिनदांनीच प्रथम रूढ केली. राज कपूरसाठी मुकेश, देव आनंदसाठी किशोरकुमार आणि दिलीपकुमारसाठी मोहम्मद रफी असं समीकरण सर्वमान्य होतं. परंतु कोणत्या गीताला कोणत्या गायकाचा किंवा गायिकेचा आवाज चपखल बसेल, एवढा एकमेव निकष लावून सचिनदांनी संगीत दिलं.
एक प्रतिभाशाली संगीतकार म्हणून सचिदांना या चरित्रानं न्याय दिलेला आहे. मात्र असं असलं तरी खगेश यांनी समकालीन संगीतकारांच्या तुलनेत सचिनदांचं महत्त्व पुरेशा जोरकसपणे मांडलेलं नाही. सचिनदा उतारवयातही अधिक मागणी असलेले संगीतकार होते, परंतु अपवाद वगळता इतरांच्या तुलनेत त्यांचं नेमकं वेगळेपण ध्वनित होत नाही. खगेश यांची भाषा तशी सोपी असली तरी तपशील मात्र काहीसा जंत्रीयुक्त वाटतो. (कारण ठिकठिकाणी नमूद केलेले उतारे).
आजच्या पिढीला सचिनदांची गीतं माहीत असली तरी संगीतकार म्हणून त्यांची फारशी ओळख नाही. त्यासाठी हे चरित्र उपयुक्त ठरू शकतं. शेवटी सचिनदांच्या जीवनपटाबरोबरच त्यांच्या सर्व बंगाली आणि हिंदी चित्रपटांची यादी दिली असून अभ्यासकांना ती उपयुक्त ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस. डी. बर्मन – द वर्ल्ड ऑफ हिज म्युझिक : खगेश देव बर्मन,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने :  २९१,
किंमत : २९५ रुपये.

एस. डी. बर्मन – द वर्ल्ड ऑफ हिज म्युझिक : खगेश देव बर्मन,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने :  २९१,
किंमत : २९५ रुपये.