इराकबाबत वारंवार चुकाच करणाऱ्या अमेरिकेने तीन वर्षांपूर्वी या देशामधून आपले सैन्य मागे घेतले, तेव्हापासून इराक यादवीच्या उंबरठय़ावरच होता. ती यादवी इराकमध्ये आता होताना दिसते. या संघर्षांमुळे आपल्यासारख्या देशासमोरील संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे..
जागतिक राजकारणात ज्या देशाबाबत सर्वाच्या सतत चुकाच झाल्या.. आणि अजूनही होत आहेत.. असा देश म्हणजे इराक. गेले आठवडाभर हा देश पुन्हा धुमसू लागला असून त्या देशातील अस्वस्थता रोखली न गेल्यास त्याचा मोठा फटका आपल्यासारख्या तोळामासा अर्थव्यवस्थांना मोठय़ा प्रमाणावर बसणार आहे. गेल्या चार दशकांहूनही अधिक काळ इराकसंदर्भात सर्वाच्या चुकाच होत असून या चुकांची शिक्षा साऱ्या जगालाच भोगावी लागत आहे. या मालिकेतील सर्वात पहिली चूक म्हणजे सद्दाम हुसेन याचा उदय. सत्तरच्या दशकात सद्दाम साधा लष्करी अधिकारी होता आणि त्याला अधिक बळ मिळावे यासाठी प्रयत्न झाले. त्यात आघाडीवर अमेरिका होती. इराकशेजारील इराण या देशात शहा महंमद रझा पहलवी या अमेरिकाधार्जिण्या राजाची सत्ता होती आणि शेजारील इराकमध्येही आपल्या मर्जीतीलच सत्ताधारी असावा असा अमेरिकेचा आग्रह होता. या दशकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये राहून इराणमध्ये उठाव घडवून आणू पाहणाऱ्या अयोतोल्ला खोमेनी यांची ताकद वाढत गेली आणि १९७९ सालातील पहिल्याच महिन्यात खोमेनी यांनी तेहरानच्या भूमीवर पाऊल टाकले. त्यापाठोपाठ इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली आणि शहा यांना अमेरिकेत पळून जावे लागले. तेथेच त्यांचा अंत झाला. पुढे तेहरानमधील अमेरिकी दूतावासातील कर्मचाऱ्यांना खोमेनी समर्थकांनी ओलीस ठेवले. याच काळात शेजारील सद्दाम हादेखील खोमेनी यांना खुपू लागला होता. याचे कारण धर्मवादी खोमेनी यांच्या नजरेतून सद्दाम पाखंडी होता. त्याच्या देशात महिलांना बुरखा घ्यावा लागत नसे आणि त्यांना आधुनिक शिक्षणदेखील घेता येत असे. तेव्हा अशा सद्दामच्या सुधारणावादी धोरणांचा दुष्परिणाम आपल्या देशावर व्हावयास नको म्हणून त्याला नेस्तनाबूत करण्याचे खोमेनी यांच्या मनाने घेतले आणि इराकबरोबर युद्ध छेडले. या युद्धात अमेरिकेने दुटप्पी भूमिका बजावली. अमेरिकेने इराणचे खोमेनी आणि इराकचे सद्दाम हुसेन या दोघांना लढवत ठेवले आणि दोघांनाही एकमेकांविरोधात लढण्यासाठी मुबलक शस्त्रपुरवठा केला. दशकभर चाललेल्या या युद्धाने काहीच साध्य झाले नाही. उलट सद्दामची राजवट तेवढी अधिक मजबूत झाली. युद्धकाळात अमेरिकेकडून मिळालेल्या युद्धसामग्रीचा उपयोग त्याने आपल्याच देशातील बंडखोरांना संपवण्यासाठी केला. त्या देशाच्या तुर्कस्तान सीमेलगत मोठय़ा प्रमाणावर कुर्द वंशाचे लोक राहतात. त्यांचा सद्दामला पूर्ण पाठिंबा नव्हता. म्हणून सद्दामने या कुर्दाना संपवण्याचा सपाटा लावला. त्यासाठी त्याला मदत झाली ती अमेरिकेनेच पुरवलेल्या जैविक आणि रासायनिक अस्त्रांची. तेव्हाचे सद्दामचे वागणे मानवतेला काळिमा फासणारे होते. परंतु ते सर्वानी.. म्हणजे अर्थातच अमेरिकेनेही.. सहन केले. कारण तोपर्यंत सद्दाम अमेरिकेस लागेल तितके तेल पुरवीत होता. इराणविरोधातील दशकभराच्या युद्धाने इराकी अर्थव्यवस्थेस रक्तबंबाळ केले होते. तेव्हा त्या आर्थिक जखमा भरून काढण्यासाठी सद्दामने कुवेत या दुसऱ्या तेलसंपन्न देशाचा घास घेण्याचा प्रयत्न केला. तसे करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे कुवेतचा तेलसाठा मिळाल्यास जगातील सर्वात तेलसंपन्न देश असलेल्या सौदी अरेबियास मागे टाकता येईल, असा त्याचा विचार होता. परंतु त्याने सौदीला आव्हान देणे अमेरिकेस परवडणारे नव्हते. त्यामुळे कुवेत वाचवण्यासाठी अमेरिकेने उडी घेतली आणि सद्दामला माघार घ्यावयास लावली. अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांच्याकडून सद्दामसंदर्भात दुसरी चूक झाली. ती म्हणजे सद्दामला जिवंत सोडण्याची. पूर्ण पराभूत करूनही बुश यांनी सद्दाम याला ना अटक केली ना त्याची सत्ता उलथून पाडली. त्यानंतर १३ वर्षांनी या जॉर्ज बुश यांच्या चिरंजीवाकडे अमेरिकेची अध्यक्षीय सूत्रे आली आणि या धाकटय़ा जॉर्ज बुशसाहेबांनी २००३ साली सद्दामविरोधात खोटा कट करून हल्ला केला. ही तिसरी आणि अत्यंत गंभीर चूक. तोपर्यंत २००१ साली ९/११ घडले होते आणि अमेरिकेला आपली लष्करी ताकद किती आहे, हे दाखवण्याची गरज निर्माण झाली होती. इस्लामी दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन मनोरे पाडून अमेरिकेचे नाक कापले होते. त्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याच्याशी सद्दाम हुसेन याचे लागेबांधे असल्याचा खोटाच दावा अमेरिकेने केला आणि ते कारण दाखवत इराकमध्ये लष्करी कारवाई करून सद्दामला नेस्तनाबूत केले. ती या मालिकेतील चौथी आणि सर्वात गंभीर चूक. इराकमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते या अखेरच्या चुकीची परिणती आहे. या परिसरातील अन्य राजवटींच्या तुलनेत सद्दामची राजवट अधिक आधुनिक आणि निधर्मी होती. देशांतर्गत पातळीवर तो जे काही करीत होता त्याचे समर्थन करता येणार नसले तरी त्याच्याविरोधात अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी ज्या काही उचापती केल्या, त्याचेही समर्थन होऊ शकणार नाही. इराकच्या भूमीत व्यापक जनसंहाराची क्षमता असलेली अस्त्रे असल्याचा बनाव अमेरिकेने रचला आणि टोनी ब्लेअर यांच्या ब्रिटनने अमेरिकेचे अंधानुकरण करीत सद्दामविरोधी कारवाईस मम म्हटले. परंतु तेव्हापासून आजतागायत इराकचे काय करायचे याचे उत्तर ना अमेरिकेस देता आले ना ब्रिटनला. सद्दामला नेस्तनाबूत केल्यानंतर अमेरिकी सैनिक काही काळ त्या देशात राहिले. निवडणुकांच्या मार्गाने तो देश स्थिरावेल अशी अमेरिकेची अटकळ होती. ती पूर्ण खोटी ठरली. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने या देशामधून आपले सैन्य मागे घेतले कारण तो खर्च अमेरिकेस परवडेनासा झाला. तेव्हापासून इराक यादवीच्या उंबरठय़ावरच होता. ती यादवी इराकमध्ये आता होताना दिसते.
समर्थ मध्यवर्ती ताकदीअभावी इराकमधील धार्मिक आणि वांशिक मतभेद उफाळून आले असून सध्या जे काही सुरू आहे, ते त्याचेच प्रत्यंतर आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड ग्रेटर सीरिया, म्हणजे आयएसआयएस, या संघटनेने हा उठाव घडवून आणला असून तो पसरेल अशीच लक्षणे आहेत. इराक हे एका अर्थाने शियाबहुल राष्ट्र. परंतु त्या देशात सत्ता होती ती सुन्नींच्या हाती. सद्दाम जिवंत होता तोपर्यंत हा शिया-सुन्नी वाद निर्माण झाला नाही. याचे कारण तोपर्यंत सुन्नी जमातीचेच या देशात प्राधान्य राहील असा समज पसरवण्यात त्याला यश आले होते. परंतु त्याच्या हत्येनंतर ही दरी अधिक स्पष्ट होऊ लागली आणि आता तर या धर्मपंथीयांत सशस्त्र संघर्षच सुरू झाला आहे. त्यातूनच आयएसआयएस या संघटनेने गेल्या तीन दिवसांत तीन महत्त्वाची शहरे हस्तगत केली आणि देश म्हणून इराकच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. या दोघांपासून धडा घेत कुर्द बंडखोरांनाही कुर्दिस्तानचे वेध लागले असून त्यांच्या प्रदेशातील तेलसंपन्न प्रदेशांवर कुर्दानी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
याचा थेट परिणाम जागतिक तेलबाजारावर झाला असून या परिसरातील संभाव्य संकटाच्या भीतीने देशोदेशींचे बाजार आकसू लागले आहेत. या संघर्षांमुळे आपल्यासारख्या देशासमोरील संकट अधिक गहिरे होणार आहे. याचे कारण आपला बहुसंख्य तेलसाठा इराण, इराक आदी देशांतूनच येतो. त्यामुळे या देशांत खुट्ट वाजले की आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो. आताही जागतिक बाजारात तेलाचे दर वाढू लागले असून त्यामुळे आपल्या तुटीत वाढ होण्याची भीती आहे. तेलाचे दर प्रतिबॅरल एकडॉलरने वाढल्यास आपल्याला आठ हजार कोटींचा खड्डा पडतो. तेव्हा इराक लवकरात लवकर स्थिरावण्यासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे आहे. इतरांच्या पापाची फळे आपण का आणि किती दिवस चाखावीत?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा