राज्यात आघाडीचे सरकार असताना १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नेहमीच परस्परांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण केले जाई. अगदी तुटेपर्यंत ताणले जाई, पण शेवटी सत्ता महत्त्वाची असल्याने उभयता दोन पावले मागे घेत. असाच खेळ आता भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झाला आहे. युती तुटल्याने भाजपला आपल्या ताकदीचा अंदाज आला हे वक्तव्य करून कोल्हापूरमध्ये झालेल्या भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात भाजपची राजकीय वाटचाल कशी असेल याचे संकेत दिले. सुमारे दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपने ‘शत प्रतिशत’चा निर्धार केला होता. प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या कारकीर्दीत भाजपचे हे उद्दिष्ट साध्य झाले नाही, पण मोदी लाटेत भाजप या तिथवर पोहोचला. यामुळे भाजपच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या असून राज्यात भाजपची ताकद वाढली पाहिजे, असा स्पष्ट संदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. एकहाती सत्ता आली पाहिजे, हे पक्षाचे उद्दिष्ट आहे, पण राज्यातील भाजप नेत्यांना आपल्या मर्यादांची जाणीव आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मित्रपक्ष शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी मात्र थोडीशी मवाळ भूमिका मांडली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेशी युती कायम ठेवण्यात येईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले. यातून शिवसेनेबद्दल भाजपचे धोरण ठोस नाही हाच संदेश गेला. मोदी लाटेमुळेच महाराष्ट्रात भाजपला सत्तेचा सोपान गाठता आला. पंतप्रधान मोदी यांनी विधानसभेच्या वेळी जवळपास ५० सभा घेतल्या होत्या व त्याचा पक्षाला फायदा झाला होता. हाच कल भविष्यात कायम राहील याची खात्री देता येत नाही. यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावध भूमिका घेत शिवसेनेला तोडण्याचा आमचा इरादा नाही, असा संदेश देण्याचीही खबरदारी घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सहा महिन्यांमध्ये झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील चित्र भाजपला तेवढे आशादायी नव्हते. एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य झाले म्हणून नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली असली तरी जिल्हा परिषदांत पालघरचा अपवाद वगळता अन्यत्र शिवसेनेने भाजपला मागे टाकले. नवी मुंबईत तर पार कचरा झाला. दोन महापालिका आणि १० नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून मोठमोठाल्या घोषणा केल्या, पण त्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. भाजपमध्येच एकमेकांचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू असते. यामुळेच अमित शहा यांना करवीरनगरीत डोळे वटारावे लागले. सरकारमध्ये भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याने शिवसेना भाजपला सुनावण्याची संधी सोडत नाही. आठवडय़ातून किमान दोनदा तरी शिवसेनेकडून भाजप सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध मतप्रदर्शन केले जाते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी नाही तरी शरद पवार यांनी व्यक्त केली आहेच. भाजपची ताकद वाढविण्याचा संदेश कोल्हापूर अधिवेशनातून देण्यात आला असला तरी पुढील वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या नगरपालिका व नंतर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाची खरी कसोटी लागणार आहे. यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.