देशातल्या सर्वात पॉवरफुल उद्योगपतीला भावानेच झाडलेल्या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्यांनी मृत्यू यावा, ही काही भारतीय औद्योगिक संस्कृती नाही. गुरुदीपसिंग चढ्ढा यांना असे मरण यावे, यामागे केवळ कौटुंबिक हेवेदावे, भाऊबंदकी, इस्टेटीचे भांडण असली नेहमीची कारणे असतीलच असे नाही. उद्योगाचा पसारा वाढला म्हणून त्यात अधिक वाटा मागणाऱ्या भावाला समाधानी करता आले नाही, हेही त्याचे कारण असेल असे नाही. गुरुदीपसिंग ऊर्फ पॉन्टी चढ्ढा यांच्यावर त्यांचा भाऊ हरदीप याने गोळ्या झाडल्या, म्हणून पॉन्टीच्या सुरक्षारक्षकाने हरदीप यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारात या दोन्ही भावांना जीव गमवावा लागला. या दोघांच्या मृत्यूने अल्पकाळात देशातील सर्वात वेगाने प्रगती करणारा उद्योगपती म्हणून जे गूढ खासगीत व्यक्त होत होते, त्यावर सार्वजनिकरीत्या चर्चा होऊ लागली आहे. राजकारण्यांच्या आशीर्वादाने अल्पावधीत किती मोठी संपत्ती गोळा करता येते, याचे पॉन्टी चढ्ढा हे एक उदाहरण आहे. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तिसगढ या राज्यांमधील दारूचा सारा व्यवसाय या पॉन्टीच्या ताब्यात होता. दारू, चित्रपटगृहे, साखर कारखाने, बांधकाम व्यवसाय, पेपर मिल, शॉपिंग मॉल्स अशा अनेक उद्योगांत चढ्ढा यांनी आपले बस्तान बसवले, ते पैशाच्या जोरावर. राजकारणी किती विकाऊ असतात हे अगदी सहजपणे स्पष्ट व्हावे, इतक्या कमी कालावधीत चढ्ढा यांनी आपला औद्योगिक विस्तार केला. या पाचही राज्यातील दारूविक्रीचे परवाने त्यांनाच मिळावेत, हा योगायोग असणे शक्य नाही. त्यासाठी मायावतींपासून ते अमरिंदरसिंगांपर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी अक्षरश: खिशात घातले होते. परवाने देण्याचे धोरण ठरवताना ते फक्त या एकाच उद्योगपतीला कसे मिळतील, याचा बारकाईने विचार केला जाई, अशी माहिती आता पुढे येते आहे. अधिक पाप केले की मग पुण्यही गोळा करणे भाग पडत असले पाहिजे. चढ्ढा यांनी मग मानसिक व शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी रुग्णालय उभारले, गरिबांना अर्थसाह्य केले आणि मंदिरांच्या उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणावर निधीही दिला. ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला ते पाहता, हे गोळा केलेले पुण्य त्यांना उपयोगी पडलेले दिसत नाही. उद्योगक्षेत्रातली कोणतीही व्यक्ती ही त्या त्या देशातील आर्थिक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. परंतु गेल्या काही दिवसांत ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या पाहता, औद्योगिक क्षेत्राच्या नव्या संस्कृतीची उभारणी सुरू आहे की काय, अशी शंका यावी. हरयाणातील गोपाळ कांडा या मंत्र्याने सुरू केलेल्या विमानसेवेच्या उद्योगात एका युवतीवर अत्याचार केल्याचे प्रकरण तर अगदीच ताजे आहे. सरकारमधील सत्ताधारी अशाप्रकारे पैसे फेकून हवे ते विकत घेण्याच्या प्रवृत्तीला बळी पडतात आणि त्यामुळेच कमी श्रमात आणि कमी वेळेत झटपट श्रीमंत होण्याचे उद्योग फोफावतात. पॉन्टी चढ्ढा यांनी ज्या गतीने स्वत:चा विकास घडवला तो पाहता, त्यांच्या एकूण मिळकतीमधील एका फार्म हाऊसच्या मालकीवरून दोघा भावात खून करण्यापर्यंत भांडणे होतील, असे संभवत नाही. राजकारणी आणि त्यांना विकत घेणारे असे अनेक चढ्ढा देशाच्या प्रत्येक राज्यात कार्यरत आहेत, हे काही नव्याने सांगायला नको.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा