पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार व्यक्त करताना सामूहिक नेतृत्वाविषयी व्यक्त केलेल्या काही मौलिक कल्पना व्यवहारात आणणे फारसे कठीण नाही असे वाटते. नित्य व्यवहार करताना सामान्य नागरिकाकडून देशसेवा घडू शकते याची उदाहरणेसुद्धा व्यावहारिक वाटावीत अशी आहेत, किंबहुना सुट्टीच्या काळात शाळकरी विद्यार्थ्यांनी देशाच्या ईशान्य भागातील राज्यांना सहलीच्या रूपाने भेट देऊन तेथील जनजीवनाची व संस्कृतीची ओळख करून घ्यावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर ही ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखली जाणारी सात राज्ये भारतात असली तरी तेथे सहलीला जाणे हे काश्मीरमधील श्रीनगरला जाण्याइतके सोपे नाही हे प्रथम लक्षात घेतले पहिजे.
राजकीय म्हणा, तेथील संस्कृतीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा घुसखोरीपासून सुरक्षितता यासाठी या सात राज्यांत भारतीय नागरिक मुक्तपणे प्रवास करू शकत नाही. या प्रत्येक राज्यात भारतीय पर्यटक म्हणून जाणाऱ्यास, राज्यानुसार ‘इनर लाइन परमिट’ हा प्रवेश-परवाना आवश्यक ती सारी कागदपत्रे दाखल करून घ्यावा लागतो. तसेच अशा पर्यटकास तेथे फार मर्यादित वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाते. असे परवाने मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेतून जाताना किती वेळ जाईल आणि प्रत्यक्ष तेथे काय पाहता येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. शिवाय तेथे गेल्यावर स्थानिकाकडून पर्यटकांचे कसे व किती स्वागत केले जाते हा पूर्णपणे वेगळा विषय म्हणावा लागेल!
डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा