अमेरिकी पत्रकार जेम्स फॉली यांची इसिसच्या (इस्लामिक स्टेट इन इराक अ‍ॅण्ड सीरिया) अतिरेक्यांनी केलेल्या हत्येने अबू बक्र अल बगदादीच्या स्वप्नातील इस्लामी खिलाफत कशी असेल याचे सुस्पष्ट चित्र जगासमोर आले आहे. इराक आणि सीरियाच्या काही भागांत पाय रोवून बसलेल्या या धार्मिक राजवटीच्या अत्याचारांच्या बातम्या आजवर येत होत्या. त्या भागांतील आदिवासी टोळ्यांवरून अतिरेकी रणगाडे फिरत आहेत. इसिस प्रशासित भागांमध्ये रोज नवनवे फतवे निघत आहेत आणि त्यात प्रामुख्याने महिला भरडून निघत आहेत. हे सगळेच क्रूर आहे. पण त्याची झळ आजवर पाश्चात्त्य जगाला लागली नव्हती. फॉली यांच्या शिरच्छेदाने मात्र हे सुसंस्कृत जग हादरून गेले आहे. मध्य पूर्वेतल्या कुठल्याशा वैराण वाळवंटात नेऊन इसिसच्या अतिरेक्यांनी जेम्स फॉली यांचा शिरच्छेद केला. त्या आधी फॉली यांनी एक निवेदन वाचून दाखविले. त्यात त्यांनी आपल्या हत्येला ओबामा हेच जबाबदार असून, अमेरिकेने इसिसच्या ताब्यातील भागावर केलेल्या बॉम्बहल्ल्यांचा बदला म्हणून आपणांस प्राण गमावावा लागत असल्याचे म्हटले. त्यांच्याकडून ते जबरदस्तीने वदवून घेण्यात आले हे उघडच आहे आणि कोणतीही नि:पक्षपाती व्यक्ती या घटनेबद्दल ओबामा यांना जबाबदार धरणार नाही. परंतु वेगळ्याच अर्थाने त्या विधानात तथ्य आहे हे लक्षात घ्यावे लागेल. सीरियातील बशर अल असाद यांच्या विरोधातील बंडखोरांना मदत करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला लागलेले आणि आता परिपक्व झालेले फळ म्हणजे इसिस. तीन वर्षांपूर्वी असाद यांच्या राजवटीविरोधात उभ्या ठाकलेल्या बंडखोरांना ओबामा प्रशासनाने सर्व प्रकारची मदत दिल्याचे आता उघड झाले आहे. याच बंडखोरांच्या फौजेतून इसिसची स्थापना झाली आहे. त्यांचे नेतृत्व करणारा अल-बगदादी हा मुळात इराकमधील अल कायदाचा नेता. त्या संघटनेशी फारकत घेऊन त्याने इसिसची उभारणी केली. आज ही संघटना खिलाफतीची तलवार उगारून संपूर्ण जगाला कवेत घेण्याचे स्वप्न पाहात आहे. त्यात त्यांना यश येणे शक्यच नाही.  पण मुळात या संघटनेला बळ मिळण्यास अमेरिकेची इराक- अफगाणिस्तानमधील धोरणे जेवढी जबाबदार आहेत तेवढीच असादविरोधी भूमिकाही कारणीभूत आहे. जे अफगाणिस्तानात तालिबान आणि ओसामा बिन लादेन यांच्याबाबतीत झाले त्याचीच छोटीशी पुनरावृत्ती इसिसच्या निमित्ताने होताना दिसते आहे. इसिसच्या खिलाफतीची आफत अमेरिकेने ओढवून घेतली आहे. या संघटनेविरोधात अमेरिकेला आता अधिक ठोस पावले उचलावीच लागतील असे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी मध्यममार्गी प्रसारमाध्यमांतून असाद यांच्याबाबतीत सहानुभूतीचा सूर आढळून येत आहे. इसिसला नेस्तनाबूत करण्यासाठी ओबामा प्रशासनाने असाद यांची मदत घ्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. जेम्स फॉली यांच्या हत्येप्रमाणेच काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या करण्यात आली होती. त्यामागे अल कायदाचा हात होता. त्या हत्येला मिळालेल्या कुप्रसिद्धीनंतर अतिरेकी संघटनांना हे जणू नवे दबावास्त्रच मिळाल्यासारखे झाले आहे. फॉली यांची हत्या त्याचाच एक भाग होती. आजही इसिसच्या ताब्यात ‘टाइम’ मासिकाचे मुक्त पत्रकार स्टीव्हन सॉट्लॉफ आहेत. अमेरिकेने हल्ले न थांबविल्यास त्यांचीही हत्या केली जाईल, अशी धमकी इसिसने दिली आहे. अर्थात अमेरिका त्याला बधलेली नाही. त्यानंतरही इसिसच्या तळांवर तोफा डागण्यात आल्या. अतिरेक्यांशी कोणत्याही प्रकारे सौदेबाजी न करण्याचे अमेरिकेचे हे धोरण चांगलेच आहे. खेद याचाच, की त्याची अंमलबजावणी सर्वच वेळा, सर्वच परिस्थितीत केली जात नाही.

Story img Loader