दहशतवाद माजवून भारतात अस्थर्य निर्माण करण्याचे प्रयत्न पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनांनी फार पूर्वीपासूनच चालविले असताना आता आणखी नवे दहशतवादी धोके भारताच्या उंबरठय़ाशी येऊन दाखल झाले आहेत. मुंबईशेजारच्या कल्याणमधून पाच महिन्यांपूर्वी अचानक गायब होऊन इराकमध्ये इसिस या अतिरेकी इस्लामी बंडखोर संघटनेत दाखल झालेला आरिफ मजिद नावाचा तरुण भारतात परत आल्यामुळे या धोक्याच्या घंटा अधिकच तीव्रपणे वाजू लागल्या आहेत. आरिफचे भारतात परतणे सहज आणि साधे समजले जाऊ नये, असा इशारा संरक्षण क्षेत्रातील जाणकार देत असतानाच, तिकडे गुवाहाटीमध्ये पोलीस प्रमुखांच्या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील इसिसचे आव्हान आणि भारतासमोरील धोके अधोरेखित केले. भारतातील अनेक धर्मवेडे तरुण इसिससारख्या अतिरेकी धर्माध संघटनेकडे आकृष्ट होऊ लागले आहेत. आजवर भारतातील अतिरेकी कारवायांना केवळ पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा सार्वत्रिक समज होता. आता अशा कारवायांची पाळेमुळे देशाबाहेरील अनेक संघटनांपर्यंत पोहोचू पाहात आहेत. इसिसच्या आव्हानाकडे त्याच नजरेने पाहणे आवश्यक आहे. देशातील मुस्लीम तरुणांमध्ये कट्टर धर्मवेडाची भावना रुजवून त्यांना भडकावण्याचे प्रयोग इसिससारख्या संघटनांकडून होत असल्याचे आरिफसारख्या तरुणांच्या इराकमधील पलायनामुळे उघड झाल्याने, एक नवे देशांतर्गत आव्हान उभे राहू पाहात आहे. इसिसमध्ये दाखल होण्यासाठी भारताबाहेर जाऊ पाहणाऱ्या १८ युवकांना गेल्या सहा महिन्यांत रोखण्यात आल्याचे गुवाहाटी परिषदेत गुप्तचर यंत्रणेकडून सांगण्यात आले. धोक्याची घंटा देशात वाजू लागली आहे, हे त्यावरूनच पुरेसे स्पष्ट होते. भारतामध्ये अस्थर्य माजविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना खतपाणी घालणाऱ्याच या घडामोडी आहेत. इसिसचा जन्म सिरीया आणि इराकमध्ये झाला असला तरी भारतीय उपखंडावर या संघटनेची नजर असल्याचे लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीत, देशातील मुस्लीम समाजाच्या मानसिकतेची खरी कसोटी सुरू होणार आहे. या देशातील मुस्लीम समाज धर्माधांच्या फूस लावण्याच्या प्रयत्नांना बळी पडण्याएवढा कमकुवत नाही, तरीही देशाबाहेरच्या संघटना या समाजात धर्मवेडाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करीतच राहणार, याचे संकेत आता मिळू लागले आहेत. इसिसच्या तंबूतून भारतात परतलेल्या कल्याणच्या आरिफ मजिदने त्याच्या चौकशीत अजूनही सारी पाने उघडलेली नाहीत. जेमतेम २३ वर्षांच्या या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी अन्य तिघा जणांसह इसिसमध्ये दाखल होण्यासाठी घर सोडले, तेव्हाच या संकटाच्या चाहुलीने देशाला धक्का दिला होता. इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील तरुणांची भरती करण्याचे इसिसचे प्रयत्न असून ते वेळीच रोखले पाहिजेत, असा इशारा गुप्तचर विभागाच्या संचालकांनी आरिफच्या अटकेनंतर लगेचच दिला. तरुणांमध्ये धर्मवेड भिनविण्याचे प्रकार रोखण्यासाठी आता ठोस उपाययोजनांची गरज केंद्र सरकारला भासू लागली आहे, ही त्यातली समाधानाची बाब मानावी लागेल. माजिदच्या परतण्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. कोणत्या तरी अविचाराने बहकून अतिरेकी कृत्ये करू पाहणाऱ्या तरुणाईला वळणावर आणण्याची आवश्यकता आहे, याची खूणगाठ तरी आता यानिमित्ताने पक्की झाली आहे. सुशिक्षित तरुणांना दहशतवादाच्या आकर्षणापासून मुक्त करण्याकरिता नवी पावले उचलण्याचे नवेच आव्हान आता निर्माण झाले आहे. मात्र, ते केवळ सरकारसमोरील आव्हान नाही. पालकांनाही या आव्हानाचा भार उचलावाच लागणार आहे. ती जबाबदारी ओळखली नाही, तर पश्चात्तापाची वेळ दूर नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा