इस्लामचा पाळणा पहिल्यांदा जेथे हलला तो सौदी अरेबिया. मक्का आणि मदिना ही इस्लामी तीर्थक्षेत्रे जेथे आहेत तो सौदी अरेबिया आज कट्टर इस्लामी दहशतवादाचे लक्ष्य बनला आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेने आपले लक्ष्य गेल्याच वर्षी सौदी अरेबियाकडे वळविले होते. गेल्या काही महिन्यांत तेथील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून ते दिसले. गेल्या काही आठवडय़ांपासून सौदी सुरक्षा यंत्रणांनी आयसिसच्या ४३१ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. या सगळ्यांचा सौदी अरेबियात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा बेत होता. तो सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला. यातून सीरिया आणि इराकनंतर सौदी हेच आयसिसचे पुढील लक्ष्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र सौदीतील बहुसंख्य सुन्नी मुस्लीम हे आयसिसचे सहानुभूतीदार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. आयसिसविरोधातील सीरिया आणि इराकमधील लष्करी कारवायांसाठी सौदीने आपली लढाऊ विमाने पाठविल्यानंतर सौदी राजपुत्राला धमकीची पत्रे आली आहेत. याहून लक्षणीय म्हणजे आजघडीला आयसिसच्या फौजेत अनेक सौदी तरुण सामील झालेले आहेत. सौदी राजघराण्याचा अमेरिकेकडे असलेला कल लक्षात घेता ही संघटना सौदी अरेबियाला इस्लामी खिलाफतीचा भाग बनविण्याचा प्रयत्न करणार हे स्वाभाविकच होते. त्यामुळेच तेथील राजघराण्याची चिंता आता वाढली असून, आयसिसविरोधातील कडक कारवाया हे त्या काळजीचेच अपत्य आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात जे घडले वा घडत आहे त्याचीच ही पुनरावृत्ती असल्याचेही ध्यानी घेतले पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकारणावर जेव्हा जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या नात्याचा विषय येतो त्या त्या वेळी आम्हीही दहशतवादाचे बळी आहोत, असा रडका सूर पाकिस्तानी राज्यकत्रे आणि माध्यमे लावीत असतात. वस्तुत: पाकिस्तानने जे पेरले त्याचीच ती फळे आहेत. सौदी अरेबियाच्या बाबतीतही हेच म्हणता येते. वहाबी वा सलाफी हा इस्लाममधील अत्यंत कट्टरतावादी विचार पोसला तो सौदी अरेबियानेच. या विचाराच्या प्रचारार्थ आजवर अब्जावधी पेट्रोडॉलर या देशाने खर्च केले आहेत. याच विचाराने आयसिसला जन्म दिला, हे विसरता येणार नाही. सलाफी विचार न मानणारी प्रत्येक व्यक्ती- मग ती मुस्लीम असली तरी धर्मशत्रू आहे अशा तफरिकी भूमिकेच्या पायावर हा अरेबियन भस्मासुर उभा आहे. आयसिसने शिया पंथीयांच्या विरोधात लढाई पुकारलेली आहे. सीरिया, इराकमधील शिया पंथीयांच्या कत्तली करण्यात येत आहेत. इराकमधील शिया राज्यकर्त्यांनी सुन्नींवर केलेल्या अत्याचाराचा बदला म्हणून हे चाललेले आहे किंवा असद यांना धडा शिकविण्यासाठी ते करण्यात येत आहे असे सांगण्यात येत असून, आयसिसची लढाई ही शिया-सुन्नींमधील जुन्या हाडवैरातून आली असून, तो इस्लाम अंतर्गतचा संघर्ष आहे असे स्वरूप त्यास देण्यात येत आहे. आयसिसने आपल्या ताब्यातील प्रदेशात ख्रिश्चनांचे तसेच तेथील आदिवासींचे जे शिरकाण चालविले आहे ते पाहता यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याचे कारण आयसिसला कट्टर इस्लामचे राज्य हवे आहे. सौदी राजघराण्यासमोर आता कधी नव्हे ते मोठे आव्हान निर्माण झाले. त्याला कारणीभूतही अर्थात तेच आहेत. मात्र यातून जगाला मोठाच धडा मिळाला आहे. कोणताही कट्टरतावादी विचार हा भस्मासुरच असतो, हाच तो धडा.
अरेबियन भस्मासुर
इस्लामचा पाळणा पहिल्यांदा जेथे हलला तो सौदी अरेबिया. मक्का आणि मदिना ही इस्लामी तीर्थक्षेत्रे जेथे आहेत तो सौदी अरेबिया आज कट्टर इस्लामी दहशतवादाचे लक्ष्य बनला आहे.
First published on: 21-07-2015 at 04:41 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis target shias muslim in saudi arabia