अमेरिका, सोविएत रशिया आणि बरोबरीने फ्रान्स या देशांनी इस्लामी अतिरेक्यांत जे काही पेरले ते चांगलेच फळले असून आता जागतिक स्थैर्याचाच बळी त्यात जातो की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र पेशावर, पॅरिस येथील दहशतवादी कृत्यांमुळे सर्वात मोठे नुकसान होणार आहे ते इस्लामी जनता आणि इस्लाम यांचेच..
विचारांनी एकारलेले असलेल्यांना विनोदाचे वावडे असते. हिंस्रपणे आपल्या भावना प्रकट करणारे हे वीर नेहमीच विनोदास घाबरतात. म्हणूनच हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यास दोस्त राष्ट्रांच्या लष्करी ताकदीपेक्षा चार्ली चॅप्लीन याची भीती वाटत होती. अखेर त्या हिटलरला आत्मनाश करून घ्यावा लागला. त्यानंतरच दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली. फरक इतकाच की त्या वेळी विनोदांना घाबरणाऱ्या हिटलरांची संख्या मर्यादित होती आणि ते सहज ओळखू येत. त्यामुळे त्यांना तोंड देणे एकप्रकारे सोपे होते. अलीकडील आव्हान हे की ही हिटलरांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून विचारांना घाबरणारे हे साध्या वेशातील सतान समाजजीवनात अनेक ठिकाणी दबा धरून आहेत. प्रसंगानुरूप यांची नावे तेवढी बदलतात. कधी ते सलमान रश्दीच्या पुस्तकाच्या निमित्ताने दिसून येतात, कधी त्यातील काहींचे दर्शन पुण्यातील प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्यातून होते तर कधी रिडल्सविरोधाच्या कोडय़ातून ते प्रकट होतात. या सर्वाच्या अभिव्यक्तीची तीव्रता एकच असते असे नाही. परंतु एक धागा मात्र समान असतोच असतो. तो म्हणजे विचारांना विरोध. पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ नियतकालिकावरील हल्ल्याच्या निमित्ताने या सतानांचा फ्रेंचावतार समोर आला आहे. आपल्या वंदनीय असलेल्या श्रद्धेय व्यक्तीचे व्यंगचित्र काढले हाच काय तो या नियतकालिकाचा गुन्हा. तो केला म्हणून या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी दहा पत्रकार, व्यंगचित्रकारांना कंठस्नान घातले. या मारेकऱ्यांत एक प्रकारची लष्करी शिस्त आणि सराईतपणा होता. त्यावरून या असल्या विचारांच्या व्यक्तींना किती मोठय़ा प्रमाणावर संस्थात्मक पािठबा आहे, हे दिसून येते. देशकाल आदी नागर जीवनाच्या कोणत्याही व्यवस्थेचा भाग नसलेले हे दहशतवादी आधुनिक जगासमोरील गंभीर संकट असून त्यास सामोरे कसे जायचे याचे उत्तर विद्यमान व्यवस्थेत कोणाहीकडे नाही, ही बाब अधिक गंभीर आहे.
म्हणूनच या असल्या बेजबाबदारांना पोसण्यास ज्यांनी सुरुवात केली, त्यांचीही झोप उडाली असून या अशा बेजबाबदारांत फ्रान्स या देशाचाही समावेश होतो. १९७८ साली तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात शिरल्यानंतर त्यांना बेजार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अश्लाघ्य, अमानवी मार्गाची निवड केली, त्यात फ्रान्सचा समावेश होतो. अफगाणिस्तानातील रशियन फौजांना अफूचे व्यसन लागावे यासाठी त्या परिसरात या मादक घटकाच्या लागवडीस उत्तेजन देणाऱ्यांत आणि त्या अफूविक्रीतून येणारा पसा इस्लामी अतिरेक्यांच्या हाती जावा यासाठी सक्रिय प्रयत्न करणाऱ्यांत अमेरिकेच्या बरोबरीने फ्रान्सही होता. यासाठी पुढे अमेरिकेचे उपाध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांनी इस्रायलच्या मदतीने जी गुप्त योजना आखली त्यात तिसरा सहभागी देश फ्रान्स होता, हा इतिहास आहे आणि त्याची आठवण करून देणे आज फ्रेचांना आवडणार नाही. त्या वेळी पॅरिसजवळील एका विमानतळावर अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष जॉर्ज बुश आणि फ्रान्सच्या हेरगिरी यंत्रणेचे प्रमुख अलेक्झांडर मरांचेस यांची गुप्त भेट झाली होती आणि त्यातूनच इस्लामी दहशतवाद्यांना मदत देण्याचा घाट घातला गेला. याचे कारण अमेरिकेचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार झिबिग्न्यु ब्रेझंस्की यांनी कम्युनिझमच्या वाढत्या आव्हानास तोंड देण्यासाठी इस्लामी बंडखोरांना हाताशी धरावे, उत्तेजन द्यावे अशा प्रकारचा सल्ला आपल्या सरकारला दिला होता. त्यानुसार अमेरिकेने पश्चिम आशियाच्या वाळवंटी प्रदेशात आणि सोव्हिएत रशियाच्या इस्लामबहुल राज्यांत मोठय़ा प्रमाणावर या इस्लामी अतिरेक्यांना उत्तेजन दिले. अफगाणिस्तानात गुलबुद्दीन हेकमत्यार असो किंवा सौदी अरेबियातील ओसामा बिन लादेन. त्यांचे प्रस्थ याच काळात वाढले आणि पुढे हीच मंडळी अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या डोक्यावर मिरे वाटू लागली. त्या वेळी या देशांनी ठिकठिकाणी इस्लामी अतिरेक्यांत जे काही पेरले ते चांगलेच फळले असून आता जागतिक स्थर्याचाच बळी त्यात जातो की काय, अशी परिस्थिती आहे.
असे होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या दहशतवादी राजवटींना हाताळण्यामागील धरसोड वृत्ती. एकीकडे इराकचा सर्वेसर्वा असलेल्या सद्दाम हुसेन याला हटवण्यासाठी वाटेल त्या थरास जाणाऱ्या अमेरिकेने सद्दामहून नृशंस असलेल्या सीरियातील असाद कुटुंबीयांच्या िहसाचाराकडे दुर्लक्ष केले. या असादने स्वदेशीयांचेच शिरकाण चालवले असून त्यास रोखण्याचा कोणताही प्रयत्न अमेरिकेने केलेला नाही. या दुटप्पी वागण्यामागील एक कारण म्हणजे सीरियात तेल नाही. त्यामुळे त्या देशाला मारण्यात वा तारण्यात अमेरिकेला रस नाही. सीरिया त्या अर्थाने निरुपयोगी आहे. असाद यांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये अन्यथा अमेरिका बघ्याची भूमिका घेणार नाही, असा इशारा बराक ओबामा यांनी दिला, त्यासही बराच काळ लोटला. या काळात अमेरिकेने काहीही केले नाही. आता त्याच असाद यांच्या पािठब्यावर पोसले गेलेले इस्लामी दहशतवादी पॅरिसमधील हल्ल्यामागे आहेत, असे बोलले जाते. दरम्यानच्या काळात पश्चिम आशियाच्या वाळवंटात इस्लामिक स्टेट ही अतिजहाल संघटना जन्माला आली. या संघटनेचा झपाटा पाहता तिला अमेरिकाविरोधी देशांची रसद नाही, असे मानणे धाष्टर्य़ाचे ठरेल आणि या अमेरिकाविरोधी देशांत रशियादेखील मोडतो हे विसरून चालणार नाही. रशियाने आपल्या आसपासच्या युक्रेन, क्रीमिआ आणि लगतच्या युरोपात जे काही उद्योग चालवले आहेत, त्यास रोखण्याची गरज अमेरिकेला वाटते. तीमागील आणखी एक कारण म्हणजे अनेक युरोपीय देश हे रशियात तयार होणाऱ्या नसíगक वायू आणि तेलाचे ग्राहक आहेत. म्हणजे युरोपीय ऊर्जाबाजारात रशियाचे वजन आहे. हे अर्थातच अमेरिकाधार्जण्यिा देशांना मंजूर नाही. तेव्हा त्या गटाकडून अमेरिकाविरोधकांची पकड मोडून काढण्यासाठी त्या देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या करण्याचा व्यापक कट सध्या अमलात येत असून तेलाचे घसरते भाव हा त्या कटाचाच भाग असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. या घसरत्या तेल किमतींचा फटका पश्चिम आशियातील अनेक देशांना बसत असून त्या सर्व देशांत इस्लामी राजवटी आहेत, हे विसरून चालणार नाही. तेव्हा पॅरिसमध्ये जे काही घडले ती एका जगड्व्याळ राजकारणाचीच आडपदास आहे, यात शंका नाही.
या राजकीय खेळास आणखी एक पदर आहे. तो म्हणजे जगभरातील अज्ञ इस्लामी जनतेचा. शिक्षणाचा अभाव, आधुनिक विचारांचा स्पर्शही न झालेल्या इस्लामी जगाने स्वत:ला पाश्चात्त्यांच्या हातातील खेळणे होऊ देण्यात आधी धन्यता मानली आणि आता त्यांचा लंबक पूर्णपणे विरोधी दिशेला गेला आहे. परिणामी पाश्चात्त्यांना मिळेल त्या मार्गाने ठेचणे हा एककलमी कार्यक्रम या इस्लामी देशांनी हाती घेतला आहे. आधीच्या खेळानेही त्यांचेच नुकसान झाले आणि प्रचंड नसíगक साधनसंपत्ती असूनही हे जग मागासच राहिले. आता पाश्चात्त्यांना िहसक उत्तरे देण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे, त्यानेही त्यांचेच नुकसान होणार आहे. कारण जगभरात आता इस्लाम धर्मीयांकडे संशयाने पाहिले जाणार असून जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांत तर इस्लाम धर्मीयांविरोधात मोठीच लाट आली आहे. जर्मनीत इस्लामींना विरोध करण्याची मोठी मोहीम सुरू झाली असून त्या देशाच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांना अखेर मुसलमानविरोधकांना शांततेचे आवाहन करावे लागले.
तेव्हा या असल्या दहशतवादी कृत्यांमुळे सर्वात मोठे नुकसान होणार आहे ते इस्लामी जनता आणि इस्लाम यांचे. गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेत विद्यार्थ्यांचे शिरकाण केले आणि आता हा पॅरिसमधील हल्ला. यातून आपला विजय झाला असे त्यांना वाटत असेल तर तो शुद्ध मूर्खपणा असेल. उलट या अशा हल्ल्यांमुळे मारेकरी इस्लाम धर्माला बदनाम करून इतरांपासून विलग करीत आहेत. हे हल्ले व्यक्तींवर नाहीत. हल्लेखोरांच्या स्वधर्मावरही यातून हल्ला होतो आहे. या अशा हल्ल्यांमुळेच  इस्लाम खतरे में आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा