इस्रायल आणि पॅलेस्टाइन ही लढाई मुळातच विषम आहे. भावना भडकावणाऱ्याच नेतृत्वाची पॅलेस्टिनींना असलेली सवय आणि इस्रायलमध्येही कट्टर नेतृत्वाची लवकरच होणारी स्थापना यांच्या दरम्यानचा हा महिना युद्धखोरीला वाव देणारा ठरतो आहे, त्याला अमेरिकादी देशांनी वेळीच आवर न घातल्यास या टापूत तिसरी हिंसक लाट उसळेल.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा जगातील सर्वात मोठा निद्रिस्त राजकीय ज्वालामुखी पुन्हा खदखदू लागला असून त्यामुळे जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीस मोठी खीळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ती निराधार नाही. यातील काळजी वाटणारी बाब ही की या ज्वालामुखीत पुन्हा धगधग निर्माण करणारी ठिणगी ही उभय बाजूंच्या सरकारांकडून पडलेली नाही. त्यात नागरिकांचा वाटा आहे. म्हणजे नागरिकांच्या भावना सतत भडकावत ठेवल्या की काय होते, हे या उदाहरणावरून ध्यानात यावे. या प्रकरणात सुरुवात झाली ती गेल्या महिन्याच्या पूर्वार्धात. तीन इस्रायली तरुणांचे पहिल्यांदा अपहरण झाले आणि कालांतराने ते तिघेही मृतावस्थेत आढळले. ही घटना गाझा परिसरात झाली आणि तीमागे पॅलेस्टिनी नेतृत्वाचा हात असावा असा संशय इस्रायलने व्यक्त केला. या संदर्भात प्रथम हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेकडे बोट दाखवले गेले. परंतु या तीन तरुणांच्या अपहरणामागे या संघटनेचा हात नसावा हे स्पष्ट झाले. दरम्यान इस्रायल सरकारने कारवाई करून एका पॅलेस्टिनी तरुणास संशयावरून ठार केले. ही कारवाई इस्रायली तरुणांचे अपहरण आणि हत्येच्या सुडापोटी होती. या टप्प्यावर वास्तविक हे प्रकरण शमले असते. परंतु कडव्या उजव्या यहुदी संघटनांनी कायदा हाती घेऊन स्वत:च या प्रकरणाचा बदला घेण्याचे ठरवले. यात आघाडीवर होता तो ला फॅमिलिया नावाचा गट. या धर्माध यहुदी संघटनेने तीन समधर्मीयांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी एका पॅलेस्टिनी तरुणास वेचून मारले. या घटनेची वाच्यता होताच परस्परविरोधी नागरिकांचा उन्माद वाढू लागला. वास्तविक याच वेळी इस्रायल सरकारने आपल्या अतिउत्साही आणि अतिउन्मादी नागरिकांना आवरणे गरजेचे होते. पंतप्रधान बिन्यामिन नेत्यान्याहू यांनी त्याकडे कानाडोळा केला. याचा परिणाम असा झाला की यहुदी धर्माधांना अधिकच चेव आला आणि त्यातूनच आधी हत्या केलेल्या पॅलेस्टिनी तरुणाच्या चुलत भावास इस्रायली तरुणांनी जीवघेणी मारहाण केली. त्यानंतर पॅलेस्टिनीही खवळले आणि हा संघर्ष वाढतच गेला.
हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने या संदर्भात पुढाकार घेतला असून इस्रायलवर सातत्याने क्षेपणास्त्र मारा सुरू केला आहे. नेत्यान्याहू यांच्यासारखे इस्रायल नेतृत्व अशा संधीची वाटच पाहत असते. हमास हल्ले करीत आहे हे दिसल्यावर त्यांनी या संघटनेच्या विरोधात जणू युद्धच जाहीर केले आणि प्रचंड प्रमाणावर क्षेपणास्त्रांचा मारा करीत गाझा आणि अन्य पॅलेस्टिनी परिसर अक्षरश: क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात होरपळून काढला. गेल्या चार दिवसांत इस्रायलचे हे प्रत्युत्तर अधिकच दाहक झाले असून शेकडो पॅलेस्टिनी त्यात मारले गेले आहेत. दहशतवादी घटनांना इस्रायलचे प्रत्युत्तर हे कितीतरी प्रमाणात अतिसंहारक असते. आताही तेच होत आहे. वृद्धाo्रम, नागरी वस्ती आदी कशाचाही अपवाद इस्रायलकडून केला जात नसून नृशंसपणे पॅलेस्टिनी मारले जात आहेत. यास पॅलेस्टिनीच जबाबदार असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. दर तासाला किमान सहा या गतीने आमच्यावर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, असे पंतप्रधान नेत्यान्याहू सांगतात. परंतु इस्रायलची याबाबतची संहारशक्ती आणि पॅलेस्टिनी क्षमता यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. युद्धनीती, युद्धकौशल्य आणि शस्त्रास्त्र क्षमता यांत अमेरिकी मदतीवर पुष्ट झालेल्या इस्रायलच्या पासंगासही पॅलेस्टिनी पुरणार नाहीत. पॅलेस्टिनींकडून क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे, हे जरी सत्य असले तरी या माऱ्यांतून इस्रायलच्या भूमीवर कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. पॅलेस्टिनी क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात दोन दिवसांत इस्रायली हद्दीत फक्त ८० जखमी झाले तर त्यास इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात १२५ पॅलेस्टिनी ठार झाले. २००८ साली झालेल्या इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षांतही असेच घडले होते. त्या लढय़ात ११६६ पॅलेस्टिनी इस्रायलच्या अस्त्रांचे बळी ठरले होते तर मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली नागरिकांची संख्या होती १३. तेव्हा मुळात ही लढाईच विषम आहे. पॅलेस्टिनींच्या विविध संघटना आदी जरी एकत्र आल्या तरी इस्रायलच्या वाऱ्यासदेखील त्या उभ्या राहू शकत नाहीत. इस्रायली दमनचक्राचा परीघ प्रचंड असून त्यामुळे पॅलेस्टिनींना यहुदींच्या तुलनेत भीषण संहारास तोंड द्यावे लागत आहे.
परंतु हे समजण्याची कुवत हमास या संघटनेत नाही. निर्बुद्ध माथेफिरूंच्या भावना भडकावून आपण इस्रायलला नामोहरम करू शकतो असे या संघटनेला वाटते. या हमासच्या तुलनेत फताह ही संघटना नेमस्त आहे आणि युद्ध टाळता आले तर टाळावे असाच तिचा प्रयत्न आहे. हे अर्थातच हमास या संघटनेस मंजूर नाही. इस्रायलच्या विरोधात समस्त इस्लामी जगताने एल्गार पुकारावा असे या संघटनेचे मत आहे आणि ते सर्वानी शिरसावंद्य मानावे यासाठी तिचा प्रयत्न आहे. त्यामुळे फताह आणि हमास यांच्यातच मुळात संघर्ष आहे. त्याचीही झळ पॅलेस्टिनींना मोठय़ा प्रमाणावर बसत असून सामान्य पॅलेस्टिनीस हकनाक प्राणास मुकावे लागत आहे. हे असे सातत्याने होत आलेले आहे. यासर अराफत हयात असताना पॅलेस्टिनींना बेभरवशाचा का असेना परंतु एक राजकीय चेहरा होता. अर्थात हेही खरे की अराफत यांचे राजकारण कधीच प्रामाणिक नव्हते. आपल्या उच्च राहणीस बाधा येणार नाही याची काळजी घेत त्यांनी अनेकदा पॅलेस्टिनींशी प्रतारणा केली. परंतु तरीही ते टिकून राहिले कारण दुसरा पर्याय नव्हता. त्यांच्या निधनानंतरही तसा पर्याय उभा राहिलेला नाही. एके काळी या अराफत यांना आवरण्यासाठी इस्रायलने हमास वा तत्सम संघटनांना गुप्तपणे रसद पुरवली तर कधी अशा संघटनांना आवरण्यासाठी अराफत यांचा उपयोग केला. याचा अर्थ इतकाच की पॅलेस्टिनी नेतृत्व हे कायमच बिनबुडाचे राहिलेले आहे आणि त्याचाच परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. अशा वातावरणात भडक भाषा करणाऱ्याकडे जनसामान्य आकृष्ट होतात आणि सबुरीची भाषा बोलणारा अशक्त ठरू लागतो. पॅलेस्टाईनमध्ये हेच होत असून सबुरीचा पुरस्कार करणाऱ्या फताहच्या मागे पुरेसे जनमत नाही.
याचा फायदा इस्रायलकडून पुरेपूर वसूल केला जात असून अत्यंत निर्घृणपणे हा प्रश्न त्या देशाकडून हाताळला जात आहे. मुदलात इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू हे युद्धखोर. त्यात त्यांना ती खुमखुमी भागवण्यासाठी संधी देणारे पॅलेस्टिनी नेतृत्व. या परस्परपूरक वातावरणामुळे सदर संघर्ष अधिकच चिघळत असून तो आटोक्यात येण्याची चिन्हे अद्याप तरी नाहीत. तसा तो यावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना, फ्रान्स वा अमेरिका यांच्यातर्फे केले गेलेले शस्त्रसंधीचे आवाहन इस्रायलने फेटाळले असून पॅलेस्टिनी भूमीवर आपले हल्ले असेच अव्याहत सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे. या वातावरणात इस्रायलला आवरण्यासाठी अमेरिकेने अधिक निर्णायक पुढाकार घेण्याची गरज असून तशा हालचाली लवकरात लवकर होण्याची गरज आहे. याचे कारण असे की २४ जुलै रोजी इस्रायलचे विद्यमान अध्यक्ष शिमॉन पेरेस निवृत्त होणार असून रुव्हेन रिवलिन हे अधिक युद्धखोर गृहस्थ अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. पॅलेस्टिनींच्या बळकावलेल्या भूमीवर इस्रायलचाच निर्विवाद हक्क आहे आणि हा परिसर पॅलेस्टिनींच्या वसतिस्थानासाठी सोडण्याची काहीही गरज नाही, इतकी टोकाची भूमिका ते बाळगतात.
तेव्हा युद्धखोरीचा हा डबलबार तयार होण्याआधीच तो शांत करावयास हवा. त्यासाठी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना सक्रिय व्हावेच लागेल. नपेक्षा हा परिसर तिसऱ्या हिंसक लाटेच्या.. म्हणजे इंतिफदाच्या दिशेने वाटचाल करीत असून तसे झाल्यास तेथे पुन्हा एकदा अशांतता नांदू लागेल. ते कोणालाच परवडणारे नाही. अमेरिकेसदेखील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा