अमेरिकेसारख्या महासत्तेने खोडा घालण्याचा प्रयत्न करूनही भारताच्या प्रक्षेपक कार्यक्रमास गेल्या दोन दशकांत गती देण्याचे काम भारतीयांनी केले. अडथळ्यांच्या आणि अपयशाच्याही गुरुत्वाकर्षणावर प्रयत्नपूर्वक मात केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन करावयास हवे..
आपल्याइतका विरोधाभासी देश शोधूनही सापडणार नाही. एका बाजूला डासजन्य ज्वरसाथीत माणसांचे प्राण जात असताना दुसरीकडे जगातील मोजक्याच पाच देशांकडेच असलेले अवकाश प्रक्षेपक तंत्रज्ञान विकसित करण्यात आपल्याला यश येते. अनेक समांतर रेषांवर हा देश चालतो आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेची, म्हणजे इस्रोची, रविवारची उपग्रह प्रक्षेपणाची कामगिरी ही यांतील अपवादात्मक यशोरेषांत गणली जाईल. हे यश अपवादात्मक ठरण्यासाठी आणखी एक विशेष कारण म्हणजे या उपग्रह प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी वापरण्यात आलेले इंजिन आणि त्याचे इंधन हे पूर्णपणे देशांतर्गत बनावटीचे होते. अवकाशात उपग्रहास सोडण्यासाठी त्यासाठीच्या प्रक्षेपकांत प्रचंड ऊर्जा निर्माण होणे आवश्यक असते. या ऊर्जा उत्सर्जनाचे टप्पे असतात आणि त्या प्रत्येक टप्प्यातून अवकाशयानाने उसळी घेत पुढे जाणे अपेक्षित असते. यासाठी जे अग्निबाण वापरले जातात ते एकटे नसतात. त्यांच्या पोटात उपग्रह असतो आणि त्याला वाहून नेण्याची आणि योग्य ठिकाणी सोडण्याची कामगिरी या अग्निबाणांना, म्हणजे प्रक्षेपकांना, करावी लागते. हा प्रवास अर्थातच अत्यंत जिकिरीचा. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची व्यवस्था करणे हे यातील सर्वात मोठे आव्हान. अग्निबाणास आपल्या प्रवासासाठी आवश्यक ते इंधनही बरोबर न्यावे लागते. साहजिकच त्याचे वजन कमीत कमी असण्याची गरज असते. अन्यथा इंधन आणि भला थोरला उपग्रह याच्या ओझ्याखाली हा अग्निबाण दबला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे यासाठी वापरले जाणारे इंधन आणि त्या इंधनावर चालणारे इंजिन या दोन्ही गोष्टी विशेष कौशल्याच्या असतात. हे इंधन शून्याखाली दीडशे ते अडीचशे अंश सेल्सियस तपमानात ठेवले जाते आणि त्याच्या वापराने प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. यात द्रवीभूत प्राणवायू वा हायड्रोजन, नायट्रोजन या वायूंचा वापर इंधन म्हणून केला जातो हे कौशल्य भारतीय तंत्रज्ञांनी हस्तगत केल्याचे रविवारी झालेल्या प्रक्षेपणाने सिद्ध केले. याबद्दल आपले अभियंते आणि तंत्रज्ञ नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. फ्रान्स, अमेरिका, जपान, चीन आणि रशिया अशा मोजक्या देशांनाच साध्य झालेले कौशल्य भारतीय अभियंत्यांनी मिळवले ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे, यात शंका नाही. जवळपास दोन दशकांच्या कष्टसातत्यानंतर मिळालेल्या या यशाच्या तंत्राबरोबरच त्यामागील राजकारणही समजून घ्यावयास हवे.
संदेशवहनासाठी उपग्रह मालिकांच्या प्रक्षेपणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतास त्याबाबतच्या अत्याधुनिक इंजिनांची आस कायमच लागून होती. हे इंजिन तंत्रज्ञान देशांतर्गतच विकसित करता यावे यासाठी १९९२ मध्ये आपल्याकडे तंत्रज्ञांच्या एका विशेष तुकडीची स्थापना करण्यात आली. या तुकडीने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार असे इंजिन देशांतर्गत पातळीवर विकसित करण्यापेक्षा ते तंत्रज्ञान आयात करणे अधिक सोपे आणि सुलभ असल्याचे लक्षात आले. उपग्रह इंजिनाच्या देशांतर्गत निर्मितीत जो वेळ गेला असता तो घालवणे शहाणपणाचे नव्हते. याचे कारण आर्थिक उदारीकरणानंतर दूरसंचार क्षेत्राच्या विकास आणि विस्ताराची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली होती आणि इंटरनेट आदींच्या प्रसारासाठीही जलद दूरसंचाराची गरज होती. त्यामुळे उपग्रह इंजिने आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९७४ साली आपण केलेल्या अणुस्फोटानंतर अमेरिका आणि त्या देशाच्या कच्छपि लागलेल्या देशांनी भारतास कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान देण्यास कायमच विरोध केला असल्याने हे उपग्रह इंजिन तंत्रज्ञान अमेरिका, फ्रान्स आदी देशांकडून आपणास मिळण्याची काहीच शक्यता नव्हती. परिणामी अणुभट्टय़ांप्रमाणे उपग्रह प्रक्षेपण इंजिनासाठीही आपल्यावर सोविएत रशियाच्या दारात जाण्याची वेळ आली. या संदर्भात झालेल्या १२ कोटी डॉलर्सच्या करारानुसार ग्लॉवकॉसमॉस या कंपनीकडून आपणास अशी सहा इंजिने मिळणे अपेक्षित होते. त्याच करारानुसार इंजिने पुरवता पुरवता रशियन कंपनी आपणास त्या इंजिनांच्या निर्मितीचे तंत्रज्ञानही पुरवेल असे निश्चित झाले होते. परंतु असे काही अद्ययावत तंत्रज्ञान मिळाल्यास त्याचा वापर लष्करी कारणांसाठी होण्याची शक्यता असल्याने भारतास हे तंत्रज्ञान सोविएत रशियाने पुरवू नये यासाठी अमेरिकेने दडपण आणावयास सुरुवात केली. प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराचा भंग सोविएत रशियाने भारतास हे तंत्रज्ञान पुरवल्यास होईल असा बागुलबुवा अमेरिकेने उभा केला आणि १९९३ साली ग्लॉवकॉसमॉस आणि आपली इस्रो यांच्यावरच र्निबध घातले. यामुळे आपल्या प्रक्षेपण तंत्रज्ञान विकास कार्यक्रमास तात्पुरता फटका बसला. परंतु दीर्घकालीन विचार करता या बंदीमुळे आपला फायदाच झाला असे म्हणावयास हवे. अणुभट्टय़ा वा त्यासाठी लागणारे युरेनियम अमेरिकी र्निबधांमुळे अडवले गेल्यावर भारतीय शास्त्रज्ञांनी ज्याप्रमाणे थोरियम आधारित अणुभट्टय़ांचे तंत्रज्ञान विकसित केले त्याचप्रमाणे प्रक्षेपण इंजिनांचे तंत्रज्ञान भारतास नाकारले गेल्यामुळे आपण हे तंत्रज्ञान देशांतर्गत पातळीवर कसे विकसित करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. हे तंत्रज्ञान स्वबळावर मिळवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कंबर कसली. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथे उपग्रहासाठी लागणाऱ्या इंधनावर मोठय़ा जोमाने संशोधन सुरू झाले. त्याच वेळी रशियाने अमेरिकी र्निबधांना झुगारून भारतास क्षेपणास्त्र इंजिनांचा पुरवठा केल्याने या प्रयत्नांना यशाची पालवी अपेक्षेपेक्षा लवकर फुटण्याची शक्यता निर्माण झाली. हे प्रयत्न, रशियाकडून मिळालेले इंजिन आणि फ्रान्सचे प्रक्षेपणातील साह्य़ या जोरावर भूस्थिर कक्षेत राहून दळणवळणाच्या कार्यात मदत करू शकतील असे उपग्रह पाठवण्यास आपण २००१ पासून सुरुवात केली आणि आतापर्यंत वेगवेगळ्या क्षमतेचे आपले सात या प्रकारचे उपग्रह अवकाशाकडे झेपावले. परंतु त्यातील चार मोहिमांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपयश सहन करावे लागले आणि त्यामुळे इस्रोच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम झाला. यातील सर्वात जिव्हारी लागलेले अपयश होते १५ एप्रिल २०१० या दिवशी झालेल्या जीएसएलव्ही ४ च्या प्रक्षेपणाचे. उड्डाणानंतर काही क्षणांतच या उपग्रहास वाहून नेणाऱ्या प्रक्षेपकाने मान टाकली आणि गती हरवून बसलेला हा प्रक्षेपक उपग्रहासह बंगालच्या उपसागरातच कोसळला. इस्रोस हा मोठा धक्का होता आणि त्यामुळे या संघटनेचा कार्यक्रम काही वर्षांनी मागे गेला.
परंतु रविवारच्या यशामुळे काही प्रमाणात तरी हे नुकसान भरून येण्यास निश्चितच मदत होईल. या यशात केवळ विजयाचा आनंद नाही. तर त्यामुळे मोठय़ा अर्थकारणासही चालना मिळू शकते. याचे कारण असे की जगातील अनेक देशांना दूरसंचार क्षेत्रासाठी उपग्रहांची गरज लागणार असून अशा देशांना व्यापारी तत्त्वावर हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची संधी रविवारच्या यशामुळे आपणास मिळणार आहे. ती घ्यावयास हवी. अमेरिकेने जी वेळ आपणावर आणली ती वेळ इतरांवर येऊ न देता संदेशवहन आदी कारणांसाठी आपण आपले तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावयास हवे.
या यशामुळे भारत आता कसा महासत्ता होऊ घातला आहे याची पुन्हा एकदा आवई उठवली जाण्याची शक्यता आहे. तीकडे दुर्लक्ष केलेले बरे. या महासत्तापदी पोहोचण्यासाठी आकाशातल्या यशाप्रमाणे जमिनीवरची पायाखालची परिस्थितीही आमूलाग्र सुधारणे गरजेचे असते. ती सुधारेल तेव्हा सुधारो. परंतु तूर्त तरी इस्रोच्या यशाचा आनंद साजरा करावयास हवा आणि गुरुत्वाकर्षणास पुन्हा एकदा भेदण्याच्या या निर्विवाद यशाबद्दल त्या संघटनेतील संबंधितांचे मुक्त मनाने अभिनंदन करावयास हवे.
भेदिले गुरुत्वाकर्षणा..
अमेरिकेसारख्या महासत्तेने खोडा घालण्याचा प्रयत्न करूनही भारताच्या प्रक्षेपक कार्यक्रमास गेल्या दोन दशकांत गती देण्याचे काम भारतीयांनी केले.

First published on: 07-01-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro must praise for successfully launches gslv d5