‘‘नापाक हल्ल्या’नंतरचे प्रश्न’ हे श्री. वि. आगाशे यांचे पत्र (लोकमानस, ९ ऑगस्ट) काश्मीरमधील नियंत्रण रेषा सपाट प्रदेशात आहे असे गृहीत धरून लिहिले गेले असावे. काश्मिरातील नियंत्रण रेषेचा जवळपास संपूर्णच टापू पर्वतीय आहे. दऱ्या-खोरी, खिंडी असलेला हा प्रदेश अत्यंत खडतर आणि दुर्गम आहे. शिवाय जुलै ते ऑक्टोबर व हिवाळय़ात हवामान चांगले नसते. काही वेळा धुकेही असते. दबा धरून आक्रमक हालचाली करण्यास हा प्रदेश अगदी उत्तम आहे. त्यामुळे संपूर्ण नियंत्रण रेषेवर गस्त घालणे हे अवघड आणि अत्यंत धोकादायक काम असते. शत्रू कुठे दबा धरून आणि घात लावून बसलेला असेल, याचा अंदाज येत नाही.
पूंछ क्षेत्रात ज्या पाच जवानांची हत्या झाली आहे, ते तेथे गस्त घालण्याचे काम करीत होते. ही गस्त घालण्याची पद्धत आपल्या सैन्यदलाने विकसित केलेली आहे. त्यामुळेच गेल्या महिन्याभरात घुसखोरी करणाऱ्या अनेक अतिरेक्यांना सैनिकांनी कंठस्नान घातले आहे. पण तरीही त्यात धोके आहेतच, ते पत्करावे लागतातच, तसाच हा धोका झाला आहे. सीमेवर असा धोका पत्करून हे पाच सैनिक धारातीर्थी पडले आहेत. पाकिस्तानचे सैनिक व अतिरेकीही अशाच प्रकारे गोळीबारात बळी पडत असतात. हे सर्व दुर्दैवी आहे पण सध्या तरी त्याला इलाज नाही. शत्रू दहा पावले पुढे आला हे आधी कळतच नाही आणि कळाले तरी गोळय़ांची बरसात करता येतेच असे नाही. सर्व काही त्या-त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, तरीही भारतीय सैनिकांचे मनोधैर्य अतूट आहे.
शिकून संघटित होण्याला ‘बलुतेदारांच्या व्यवसायशिक्षणा’चा पर्याय कसा काय?
‘दारिद्रय़रेषेचे राजकारण’ या लेखातील (७ ऑगस्ट) लेखकाचे निष्कर्ष वास्तविकाच्या जवळपासदेखील येत नाहीत. लेखकाचा हेतूही विपरीत वाटतो. लेखातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला उल्लेखदेखील अनाठायी आहे .एक शहाणपणाचे की , डॉ. आंबेडकरांच्या सिद्धांतामध्ये त्रुटी राहिल्याचा मुद्दा लेखक ठामपणे मांडत नाहीत. तर ‘अशी शक्यता तपासून पहावी लागेल’ असे ते म्हणतात . म्हणजे त्यांच्या भूमिकेत बदल करण्याची संधी ते स्वत:कडे राखून ठेवतात. पण मोठय़ा कसबीपणे डॉ. आंबेडकरांचा कार्यक्रम आणि आजच्या शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार यांची सांगड ते घालतात.
लेखक अशी सांगड घालण्याचा अट्टहास का करतात हे आकलनाच्या पलीकडे आहे. शिक्षण क्षेत्रातला आजचा भ्रष्टाचार कोणी नाकारत नाही. पण या भ्रष्टाचाराची जबाबदारी डॉ. आंबेडकरांच्या कार्यक्रमावर कशी टाकतात ? आणि त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या कार्यक्रमात त्रुटी असाव्यात असे लेखकाला का वाटते ? आज मोठय़ा प्रमाणावर दलित, वंचित ,बहुजन वर्ग म्हणजे ज्यांना सामाजिक व्यवस्थेने शिक्षणाची दारे बंद केली होती तो बंद दरवाजामागचा वर्ग शिक्षण घेऊ लागला म्हणून आजच्या शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला का? लेखकाचा रोख नेमक्या कुठल्या दुखण्याकडे आहे ? आजच्या शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी तळागाळातले लोक डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेतून शिकू लागले या वास्तवावर ढकलून कोणता सांस्कृतिक संघर्ष लेखकाला अभिप्रेत आहे? ‘राखेखालचे निखारे’ हेच असावेत .
मुळात, डॉ. आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा (लेखकाच्या भाषेत ‘लढा करा’) हा कार्यक्रम फक्त त्यांच्या अनुयायांपुरता दिलेला नव्हता. तो सर्व पिचल्या व पिळल्या गेलेल्या समूहासाठी होता. आज त्याचा रास्त परिणाम दिसून येत आहे. मग डॉ. आंबेडकरांच्या कार्यक्रमात काय त्रुटी लेखकाला वाटतात की त्यामुळे आजच्या शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार झाला असावा? लेखकाच्या निष्कर्षांची पठडी ही सर्वच परिवर्तनाच्या परिणामांना लावायची ठरली तर कुणीही अशा निष्कर्षांवर येईल की आज जो सर्वत्र भ्रष्टाचार आहे तो स्वातंत्र्य, समता ,बंधुत्व या कार्यक्रमात काही त्रुटी राहिल्यामुळे आहे. असे विचार पसरवणे देशासाठी धोकादायक आहे .
डॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर द्यायला पाहिजे होता, असे लेखकाला वाटते. त्यामुळे काय झाले असते ? बलुतेदारी ही जातव्यवस्था घट्ट करणारी आणि पोटासाठी परावलंबी ठेवणारी व्यवस्था होती. ती काही कामाची विभागणी नव्हती. कष्टकऱ्यांची विभागणी होती ती जन्मजात होती. अनुल्लंघनीय होती. बलुतेदारांमध्ये भेदभावही होता. लेखकाच्या मतांनुसार व्यावसायिक शिक्षणाची भूमिका जर घेतली गेली असती तर फार तर अलुतेदार बलुतेदार सरमिसळ झाली असती. पण जातव्यवस्था नसती तुटली. शिवाय उच्चवर्णीयांची आíथक-सामाजिक मक्तेदारी कडेकोट राहिली असती. डॉ. आंबेडकरांनी जातीप्रथेच्या मुळावरच घाव घातला म्हणून समाजव्यवस्था बदलण्यास किमान वेग तरी आला आहे . पण लेखकाच्या मनातले दुखणे वेगळेच दिसते .
अविनाश महातेकर
कुठे लिमये, कुठे आमदार..
माजी आमदारांचे निवृत्तिवेतन २५ हजारांवरून ४० हजार झाले आहे. याबाबत मला मधु लिमये यांची आठवण झाली.
भारताच्या स्वातंत्रलढय़ात, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी या लढय़ांत त्यांनी झोकून दिले होते. १९८२ नंतर ते राजकारणातून बाहेर झाले. त्याना भारत सरकारने सन्मान, निवृत्तिवेतन देऊ केले, मात्र त्यांनी ते नाकारले. एवढेच नव्हे तर त्यांनी खासदार म्हणून मिळणारे मासिक वेतन सुद्धा घेतले नाही. समाजवादी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत आपला परिचय कायम ठेवला. आपल्या पत्नीला मिळणाऱ्या पगारावर व नंतर पत्नीच्या निवृत्तिवेतनावर ते जगले. वयाच्या ७२व्या वर्षी ते या जगातून निघून गेले. आज त्यांचा आदर्श पाळणारा कुणी आमदार, खासदार आहे?
मार्कुस डाबरे, पापडी, वसई
आत्मघाती शांतता!
चीन आणि पाकिस्तान हे दोघे मिळून भारतविरोधी कारवाया वारंवार करत आहेत आणि त्यांना लगाम घालायचे सोडून आपण त्यांच्याविरोधी निष्क्रिय धोरण का स्वीकारतोय ? त्या दोन्ही राष्ट्रांना भारताच्या ‘आत्मघाती शांततेच्या’ धोरणामुळे तर बळ मिळत नाही ना?
आजपर्यंतचा इतिहास आहे की आपण फक्त संरक्षणात्मक धोरण स्वीकारले , आपण कधीच आक्रमक धोरण घेतले नाही त्यामुळेच आपल्याला डिवचायला पाकिस्तानसारखे राष्ट्र धजावते.
आपले जवान मारले जात आहेत, कोण मारते आहे हे आपल्याला माहीत आहे, पण आपण त्यांच्या कृत्याची फक्त ‘कठोर शब्दात’ िनदा करतो? आपल्या जवानांना कोणी वाली आहे की नाही?
संदीप नागरगोजे, गंगाखेड
आम्ही आणि आमची मुलं वेडीच होतो आणि आहोत ?
जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात जी घटना घडली, त्यानं सारा देश हादरला आणि आम्हा सर्व शहीद परिवारांना अपरंपार दु:ख झालं. कधी नव्हे एवढं असहाय वाटलं. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना जेव्हा आम्ही आमची मुले गमावली, त्यावेळी सर्वोच्च भावना होती दु:खाची! हे दु:ख आमच्याबरोबरच संपणारं! आता मात्र आमचे डोळे उघडले आहेत. गेले तीन-चार दिवस चाललेल्या चर्चा, गोंधळ, राजकारणी आणि सामान्य जनता यांच्या प्रतिक्रिया पाहून, ऐकून अचंबित व्हायला झालं. जगाच्या पाठीवर खरोखरच भारतासारखा दुसरा अजब देश नसावा. केवळ हा प्रसंगच नव्हे, तर १९४७ पासून घडलेल्या प्रसंगांतून आम्ही काही शिकणार नसू तर आमचं काही खरं नाही. आम्ही आणि आमची मुलं वेडीच होतो आणि आहोत. तेव्हा शहाण्या माणसांच्या जगातून देवानं आम्हा सर्व पालकांना लवकरात लवकर आमच्या मुलांच्या भेटीला न्यावं. भारतात शांतता नांदणार असेल तर आम्ही आत्मसमर्पणास तयार आहोत.
शहीद कुटुंबीय
कॅप्टन विनायक गोरे (ऑपरेशन रक्षक) – अनुराधा गोरे.
स्क्वॉड्रन लीडर फरहद सिद्दीकी – अस्माँ सिद्दीकी
कॅप्टन आर. सुब्रमण्यम (ऑपरेशन रक्षक) – सुबलक्ष्मी आणि रामचंद्र सुब्रमण्यम
लेफ्टनंट नवांग कापडिया (ऑपरेशन रक्षक)- गीता आणि हरिश कापडिया
फ्लाइट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ – कविता आणि अनिल गाडगीळ
लेफ्टनंट भूषण परब – अशोक परब
मेजर येहोन आचार्य (ऑपरेशन रक्षक) – ग्रेस आचार्य
मेजर शॉर्य चक्रवर्ती – नमिता आणि शंतनू चक्रवर्ती
मेजर रमेश नायर (ऑपरेशन रक्षक) – सविता दोंदे
लेफ्टनंट कर्नल मनीष कदम – शशिकांत कदम.
कॅ. विनयबेटा सचान – सुधा आणि राजाबेटा सचान