आम्ही १२ दिवसांपूर्वीच चारधाम यात्रा करून आलो.. आणि मंगळवारी विविध वृत्तवाहिन्यांवरून गंगेचे रौद्ररूप पाहून थरकाप उडाला. आजवर १५ वेळा या यात्रेला जाऊन आलो आहोत, पण एवढे भयानक नुकसान १९९६चा अपवाद वगळता पाहिले नव्हते. उत्तरकाशी येथे आमचे गुरुवर्य प.पू.ब्र. वरदानंदभारती ज्या खोलीत राहात त्यासमोर केवळ तीन फुटांवर पाणी आले होते. त्या आश्रमाच्या आवारातील शंकराचे छोटे मंदिर भागीरथीने आपल्यासमवेत नेले. उत्तरकाशी हा भूस्खलन होणारा व ढगफुटी होणारा भूकंपप्रवण भाग आहे. तेथे भरपूर नुकसान झाले. नदीच्या पात्राचा आधार घेत बांधली जाणारी रिव्हरसाइड हॉटेल्स यांचे बहुतांश मालक पंजाब वा हरियाणा अथवा दिल्ली येथील धनदांडगे आहेत. यात्रेकरूसुद्धा निवासी हॉटेल पाहूनच पसंती देतात. साहजिकपणे व्यवसाय करणारा अशी संधी कशी सोडेल? अधिक आरामदायी आणि नदीकाठच्या हॉटेल्सना पसंती मिळते. मग अशी बांधकामे वाढतात. त्यात अधिकतर बेकायदाच असतात. जोवर काही होत नाही तोवर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रचंड दर असलेली अशी हॉटेल्स वेगाने फोफावत चालली आहेत.
हिमालय हा मुळात ठिसूळ पर्वत आहे, तो सह्य़ाद्रीसारखा कठीण नव्हे याचे भान कुणालाही नाही.. हॉटेल बांधताना वा भूस्खलनामुळे जी माती आणि धोंडे वरून येतात ते नदीत तसेच लोटले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी नदय़ा उथळ झालेल्या दिसतात. पाणी आपला मार्ग त्यातून काढताना दोन्ही बाजूंचे काठ चिरून काढते. रस्ते नदीकाठी बांधले असल्याने ते दरडींसह नदीतच कोसळतात.. त्यात जागोजागी बांध आणि धरणे बांधून ठेवली आहेत. टिहरी धरण बंधू नका, असे अनेक वैज्ञानिकांनी घसा फोडून सांगितले, पण ऐकणार कोण? सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलन करणाऱ्या लोकांवर लाठय़ा चालवून ते धरण बांधले गेले. उद्या काही अघटित घडले तर दिल्लीपर्यंत, सुमारे ४५० कि.मी.पर्यंतचे क्षेत्र पाण्याखाली जाऊ शकेल एवढी तेथील अडवलेल्या पाण्याची क्षमता आहे.. केदारनाथ मार्गावरील सीतापूर या गावात तर सात-आठ मजली हॉटेल्स उभारली गेली आहेत, त्यांचे नेमके काय झाले ते अजून कळायचे आहे. केदारनाथचा पायी मार्ग गौरीकुंडापासून चालू होतो. तो मार्ग अति अरुंद आहे. दोन्ही बाजूंना हॉटेल्स व धर्मशालांची दाटी यामुळे सहज चालणे कठीण होते. आज ते सर्व वाहून गेले आहे. तेथून सात कि.मी.वर रामबाडा आहे. तेथे निम्मे अंतर काटून यात्री, खेचरे, डोल्या हे सर्व विश्रांती घेतात. साहजिकच तेथे एक छोटे गावच वसले आहे. छोटी हॉटेल्स चिक्कार आहेत.. तेथेही दाटी होतेच.. वरच्या बाजूला वासुकी ताल. तेथे पर्वतभेगेमुळे पाण्याचा लोट आला व त्यात रामबाडा वाहून गेला.
या चारधाम यात्रामार्गावर ठिकठिकाणी झालेली व वेगाने वाढणारी आणि विकासाच्या नावाखाली निसर्गालाही आव्हान देऊ पाहणारी अर्निबध वाढ आटोक्यात आली तरी खूप झाले.. धरण हे उत्तम उदाहरण आहे. अख्खे टिहरी गाव पाण्याखाली गेले आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात हे धोक्याचे आहे. असो.
जाता जाता- गंगा आणि नर्मदा या नद्यांना बांध घातलेला चालत नाही अशी आपल्याकडची जुनी समजूत आहे.. अवैध बांधकामे जोवर थांबत नाहीत तोवर असेच होणार. हे नुकसान केवळ निसर्गनिर्मित नाही, एवढा तरी बोध घेऊया.
सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा