भारतातील कोणत्याही क्षेत्रातील राजकारणाचे आद्यपुरुष शरद पवार यांचे आशीर्वाद घेत दालमिया यांनी क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. मंडळाचे पदाधिकारीही बदलल्याने हा सत्ताबदल सुफळ संपूर्ण झाला. आता भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा अच्छे दिन येतील याबद्दल समस्त क्रिकेटप्रेमींनी निश्चिंत राहावे.
काही वर्षांपूर्वी आपल्याकडे दारासिंग, रंधवा विरुद्ध किंगकाँग वा तत्सम मंडळींचे कुस्ती सामने होत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अलीकडे होत असलेल्या या निवडणुकांमुळे त्या सामन्यांची आठवण व्हावी. दारासिंग आणि किंगकाँग सामन्यांना गंभीरपणे घ्यावे असे काहीच नसे. क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुका म्हणजे तरी दुसरे काय? या मंडळाच्या काल झालेल्या निवडणुकीत जगमोहन दालमिया हे थोर गृहस्थ पुन्हा अध्यक्षपदी निवडले गेले. गेली दहा वष्रे ते अज्ञातवासात होते, कारण श्रीनिवासन या दुसऱ्या थोर गृहस्थांकडे या मंडळाची सूत्रे होती. परंतु सर्वोच्च न्यायालयास या श्रीनिवासन यांची थोरवी बघवली गेली नाही. याचे कारण या थोर श्रीनिवासन यांचे थोर थोर जावई सामनानिश्चितीच्या भानगडीत सापडले. अलीकडे या भारतवर्षांत आयपीएलनामक नुरा कुस्त्यांचा चेंडुफळी आविष्कार मोठय़ा जोमात असून त्यांत देशातील धनाढय़ वा त्यांच्या पत्नी यांनी ठेवलेल्या संघांत सामने होतात आणि जाहिरातदार, मनोरंजनकार यांचा मोठा हलकल्लोळ होतो. आता वास्तविक जो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे त्याने असा संघ पदरी बाळगणे चुकीचे. परंतु खेळ आणि त्याचे व्यवस्थापन या क्षेत्रात जे जे चुकीचे ते ते बरोबर असे मानण्याचा प्रघात असल्यामुळे या श्रीनिवासन यांनी दामटून आपला संघ बाळगला. या संघाचे व्यवस्थापन हे श्रीनिवासन यांचे जामात मयप्पन सांभाळत. ते सांभाळताना या जामातास अधिक काही करण्याचा मोह झाला. तेही साहजिकच. कारण धो धो पशाचा रतीब घालणारी क्रिकेट नावाची दुभती गाय घरात अंगणी बांधलेली असताना त्या संपत्तीधारेत आपणही चिंब व्हावे असे वाटण्यात गर ते काय? तेव्हा त्यांनी सामनानिश्चितीचा उद्योग केला. त्यात ते पकडले गेल्यामुळे पंचाईत झाली. अन्यथा भस्मविलेपित सासरेबुवांकडे क्रिकेटची तिजोरी असताना तिची चावी या मयप्पनाकडे आणखी काही काळ राहिली असती. पण ते झाले नाही. भगवान अयप्पाची अवकृपा झाल्याने मयप्पन यांचे क्रिकेटी कुटिल उद्योग उघडे झाले. परंतु त्याची शिक्षा घ्यावी लागली ती श्रीनिवासन यांना. तरीही या क्रिकेट संघाची मालकी वगरे हस्तांतरित करून आपण शिक्षा भोगल्याचा आभास निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले नाही. न्यायाधीशांनी श्रीनिवासन यांना क्रिकेट मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यास मनाई केली. गेल्या आठवडय़ात हा आदेश आला आणि इतके दिवस अडगळीत पडलेल्या, खिन्नावस्थेत असलेल्या जगमोहन दालमिया यांच्या मनातील कोरडय़ा खेळपट्टीस जणू पालवीच फुटली. सहस्रदर्शन सोहळ्यापासून अवघ्या काही वष्रे अंतरावर असलेल्या दालमिया यांनी ही संधी साधायचे ठरवले आणि भारतातील कोणत्याही क्षेत्रातील राजकारणाचे आद्यपुरुष शरद पवार यांचे आशीर्वाद घेत क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. त्यांच्या या विजयाचे कवतिक एवढय़ाचसाठी की २००४ साली याच पवार यांनी दालमिया यांना क्रिकेट मंडळाच्या प्रमुखपदावरून दूर ठेवण्यासाठी श्रीनिवासन यांना हाताशी घेतले होते. म्हणजे त्या वेळी पवार आणि श्रीनिवासन एकत्र होते ते दालमिया यांच्याविरोधात. त्या आधी एक वर्ष या दालमिया यांनी पवार यांच्या समर्थकाविरोधात अंतर्गत निवडणुकीत आपले मत नोंदवले होते. पुढे २०१० साली आयपीएल या नुरा कुस्त्यांचे नामांकित आयोजक ललित मोदी यांची क्रिकेट नियामक मंडळातून हकालपट्टी झाल्यावर तत्कालीन अध्यक्ष श्रीनिवासन यांना दालमिया यांची आठवण झाली होती आणि काही काळ त्यांनी दालमिया यांना पुन्हा नियामक मंडळात प्रवेश दिला होता. आज बरोबर परिस्थिती या सगळ्याच्या उलट आहे. पवार आणि दालमिया हे एकत्र आहेत ते श्रीनिवासन यांना दूर ठेवण्याच्या हेतूने. दालमिया यांना श्रीनिवासन नको होते आणि श्रीनिवासन यांना दालमिया आणि पवार दोघेही नको होते. तेव्हा यातून या धूर्त मंडळींनी दारासिंग, रंधवा, किंगकाँग आदींनी घालून दिलेल्या मार्गाचे स्मरण करीत निवडणुकीतील महत्त्वाची पदे आपापसात वाटून घेतली आणि भारतीय क्रिकेटच्या उद्धारासाठी नव्याने कंबर कसली.
सोमवारच्या निवडणूक निकालावर क्रिकेटच्या विकासेच्छेने भारलेले हे सज्जन आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा मोठेपणा कसा दाखवतात हे कळेल. या निवडणुकीत अध्यक्षाच्या खालोखाल महत्त्वाच्या असलेल्या चिटणीस पदासाठी अनुराग ठाकूर यांची निवड झाली. त्यांना पाठिंबा दिला पवार यांनी. हे अनुराग हिमाचलचे. भाजपचे आमदार. त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे हे चिरंजीव. या भाजप नेत्यास राष्ट्रवादी प्रमुखाने आशीर्वाद दिला. त्याच वेळी ज्या काँग्रेस पक्षाशी राष्ट्रवादीची अधिकृत आघाडी आहे त्या काँग्रेसचे ज्यु. अमर सिंग ऊर्फ राजीव शुक्ला यांना पवार यांनी पाठिंबा दिला नाही. परिणामी राजीव शुक्ला हरले. कदाचित बुडती नौका असलेल्या काँग्रेस उमेदवारास पािठबा देण्याऐवजी उगवत्या भाजपतील उगवत्या उमेदवारास मदतीचा हात देणे पवार यांनी अधिक उपयोगाचे मानले असावे. काँग्रेसचे आणखी एक नेते, कदाचित पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांनाही या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी पराभव पत्करावा लागला. दिल्लीच्या सीके खन्ना यांनी त्यांना पराभूत केले. तसेच दुसऱ्या उपाध्यक्षपदासाठी मुंबईचे रवी सावंत यांनाही तंबूत परतावे लागले. त्यांचा बळी केरळच्या टीसी मॅथ्यूज यांनी घेतला. तेव्हा अशा तऱ्हेने क्रिकेट नियामक मंडळातील हा सत्ताबदल सुफळ संपूर्ण झाला असून त्यामुळे भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा अच्छे दिन येतील याबद्दल समस्त क्रिकेटप्रेमींनी निश्चिंत राहावे. हे अच्छे दिन कसे आणता येतील यासाठीच नव्हे का मूळ अच्छे दिनकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने बारामतीत जाऊन श्री. रा. रा. पवारसाहेबांची भेट घेतली होती. जेव्हा देशातील या दोन बलाढय़ व्यक्ती एकत्र येतात त्या वेळी अच्छे दिन दूर नाहीत असा विश्वास जनसामान्यांनी आपल्या चित्तात बाळगून स्वस्थ राहावे हे बरे. उगाच याचा क्रिकेटला काय फायदा, खेळ पुढे जाणार आहे का अशाने वगरे निर्थक प्रश्न उपस्थित करून स्वत:ला शिणवू नये.
उलट, मुदलात असा काही फायदा नसता तर हे इतके मान्यवर एकत्र आले असते का, असा विचार करावयास आपण शिकणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारमूल्याने भारित होऊन देशउद्धार कार्यात स्वत:ला झोकून देणारे मा. अमितभाई शाह हेदेखील अलीकडे क्रिकेटच्या सेवेत कसे लागले आहेत, याचे स्मरण करावे. त्याचप्रमाणे विजयकुमार मल्होत्रा, अरुण जेटली, प्रफुल्लभाई पटेल, त्यांचे पूर्वसुरी प्रियरंजन दासमुन्शी आदी मान्यवर या क्षेत्रात होते वा आहेत ते त्या त्या खेळांच्या भल्यासाठीच हेदेखील आपण लक्षात घ्यावे. ही सर्व मंडळी खेळाच्या विकासाच्या विचाराने इतकी भारलेली आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे रामायण ज्याच्या याचिकेमुळे घडले ते आदित्य वर्मा हे सद्गृहस्थदेखील चेन्नईत मुक्काम ठोकून या निवडणूक प्रक्रियेत आपला वाटा उचलत होते. तेव्हा या सर्वाची नि:स्पृहता भारतीय क्रीडारसिकांनी ध्यानात घ्यावी.
ते जमत नसेल तर मन:चक्षूसमोर भारतरत्न सचिन तेंडुलकर याचे समोर सर्व काही दिसत असूनही ते न पाहण्याचे अव्वल आध्यात्मिक गुण आठवावेत आणि वर उल्लेखिलेल्या या सर्व मान्यवरांचे प्रयत्न हे अशाच नव्या भारतरत्नाच्या निमिर्तीसाठी आहेत, याबद्दल खात्री बाळगावी. कारण तेवढेच आपल्या हाती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा