केंजी गोटो. वय ४७. जपानमधील एक मुक्त पत्रकार. परवा सीरियामध्ये इसिसच्या क्रूरकम्र्यानी त्याचा शिरच्छेद केला. सीरियातील संघर्षांचे वार्ताकन करण्यासाठी गोटो तेथे गेले होते. युद्धे, संघर्ष पत्रकारांना नेहमीच आकर्षति करतात. गोटो यांचा मात्र युद्धाला विरोध होता. त्यातून होणाऱ्या मानवतेच्या हानीला विरोध होता. म्हणून ते युद्धाने होरपळलेल्या माणसांमध्ये जात असत. त्यांच्या वेदनांना वाचा फोडत असत. पण वेदना, क्रौर्य हेच ज्यांच्या जगण्याचे साधन अशा युद्धखोरांना त्याचे काय? त्यांनी आपल्या राजकारणापायी गोटो यांचा बळी घेतला. अशीच गत हारुना याकावा यांची झाली होती. ते सुरक्षा सल्लागार होते. सीरियातील जपानी कंपन्यांना साहाय्य करण्यासाठी तेथे गेले होते. इसिसने त्यांना पकडले. ते गोटो यांचे मित्र. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे हाही गोटो यांच्या सीरियाभेटीचा एक हेतू होता. पण इसिस बंडखोरांनी गोटो यांचेही अपहरण केले. त्यांना ओलीस धरले आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात जपानकडे २० कोटी डॉलरची खंडणी मागितली. या आकडय़ाला एक वेगळेच मूल्य होते. त्याचा संबंध जपानच्या बदललेल्या परराष्ट्र धोरणाशी होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने स्वीकारलेली शांततावादी राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. चीनच्या विस्तारवादी कारवायांना थेट प्रत्युत्तर द्यावे, असा दबाव जपानी राज्यकर्त्यांवर आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी फेरविजयानंतर मंदीग्रस्त जपानच्या बाहूंना ताकद देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी पश्चिम आशियातील देशांचा दौरा केला. त्यात कैरो येथे भाषण करताना त्यांनी मध्य-पूर्वेतील देशांना २० कोटी डॉलरची मदत जाहीर केली. ती मदत होती इसिसशी लढण्यासाठी. जपान लष्करी हेतूंसाठी मदत देऊ शकत नाही. तेव्हा हा निधी युद्धग्रस्त नागरिकांसाठी खर्च व्हावा हे अध्याहृतच होते. परंतु या घोषणेमुळे इसिसचे नेते संतापले आणि त्यांनी जपानकडे गोटो यांच्या सुटकेसाठी तेवढय़ाच रकमेची मागणी केली. त्याला जपानने स्पष्ट शब्दांत नकार दिला. परिणामी गोटो यांना प्राणांस मुकावे लागले. या घटनेमुळे जपानमध्ये संतापाची लाट उसळली असून, आबे यांनी या हत्येचा बदला घेण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा नेमका आणि अधिकृत अर्थ अजून स्पष्ट झाला नसला, तरी त्यांचा हेतू स्पष्ट आहे. जपान आता शांततावादी भूमिकेतून बाहेर येऊ पाहात आहे. आबे यांच्यासाठी ते अर्थातच तेवढे सोपे नाही. कारण गोटो यांच्या हत्येने त्यांच्या परराष्ट्र धोरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी पश्चिम आशियाई देशांना अर्थसाहाय्याची घोषणा केली त्या वेळी याकावा हे इसिसच्या ताब्यात होते. अशा वेळी इसिसला दुखावून त्यांनी नेमके काय साधले, असा सवालही आता विचारला जात आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दहशतवादविरोधी लढाईत जपानला फारसे कोणी गृहीत धरीत नव्हते. आबे यांच्या धोरणांमुळे हा देश आता त्यात खेचला गेला आहे. जपानपुढचा खरा सवाल हाच आहे. आपण काठावर होतो ते बरे होते की आता प्रवाहात उतरलो ते बरे झाले हे त्यांना ठरवायचे आहे. अर्थात दहशतवाद्यांपासून कोणी अलिप्त राहू शकते का, या सवालातच त्याचे उत्तर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा