स्त्री-जन्म हा शाप वाटावा अशी भावना बळावणारी परिस्थिती आसपास असली, तरी स्त्रीविषयीच्या आदराचीच शिकवण सर्वत्र दिली जात असते. स्त्री-पुरुषांमधील नाते प्रेमाच्या एका नाजूक भासणाऱ्या, परंतु भक्कम अशा गुलाबी धाग्याच्या सुखावणाऱ्या गाठीने बांधले गेलेले असते. या गुलाबी छटांमुळे संसाराचे सारे रंगही खुलतात.. असंख्य संसार याच धाग्यांनी बांधलेले, जोडलेले असतात, पण काळाच्या प्रवाहाबरोबर संसाराला ‘व्यवहारा’च्या गाठींचेही विळखे बसू लागले आणि प्रेमबंधांच्या या गाठी शिथिल होऊ लागल्या. नव्या दिवसाच्या नव्या वेगाशी स्पर्धा करताना हे प्रेमाचे बंध अडथळे ठरू लागले. हे रेशमाचे बंध सतत कुरवाळत बसण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, याचे संकेत व्यवहारांतून उमटू लागले आणि भूतकाळातील अनेक ‘प्रेमाच्या गोष्टी’ वर्तमानातील ‘प्रमेया’च्या गोष्टी होऊ लागल्या. कोणतीही परिस्थिती उग्र झाली, की तिचे गांभीर्य जाणवू लागते आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नव्या मार्गाचा शोध सुरू होतो. पूर्वी, संसारतापाने शिणलेली आणि मुक्तिमार्गाचा ध्यास घेतलेली माणसे जगाच्या व्यवहारचक्रात गुरफटून पडत नसत. आजच्या जमान्यातही अशी माणसे आहेत. त्यांचे आपापले विश्व असते. त्यात गुरफटून गेलेली ती माणसे समाजाच्या व्यवहारचक्रात अडकत नाहीत. संगणकयुगाच्या प्रभावामुळे या गर्तेत गुरफटलेल्यांच्या जगात ही प्रमेये अधिक क्लिष्ट होऊ लागली आहेत, अशी चिंता अलीकडे व्यक्त होताना दिसते. ‘संसार म्हणजे सहवास’ एवढीच व्यावहारिक भावना वाढीस लागेल अशी भीती आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे या भावनांचेच परिणाम असल्याचे विश्लेषणही केले जाते, पण आता या परिस्थितीचे गांभीर्य जाणवू लागले आहे. प्रेमाचे गुलाबी रंग टवटवीत राहणे मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक सुखाकरिता गरजेचे आहे, याचे भानही येऊ लागले आहे. ‘संसार’ हा केवळ ‘सहवास’ राहिला, तर परिस्थितीची प्रमेये आणखीनच क्लिष्ट होत जातील, त्यामुळे यावर उपाय शोधण्याच्या जाणिवा आता तीव्र होऊ लागल्या आहेत. म्हणूनच, हाताशी असणारा तोकडा वेळ आता केवळ प्रेमासाठी राखून ठेवावा, परस्परांच्या प्रेमभावनांना प्रतिसाद द्यावा, अशी उत्कट भावना जिवंत होऊ लागली आहे. ‘वेळेसोबत धावण्याच्या’ जागतिक स्पर्धेत जपान कायमच अव्वल स्थानावर असतो. हे स्थान टिकविण्याच्या ईष्र्येमुळे, प्रेमाच्या बंधनात गुरफटण्याची नाजूक भावना बोथट होत गेल्याची, त्यामुळे जगण्याची प्रमेये क्लिष्ट होत चालल्याची अस्वस्थ जाणीव अलीकडे तेथेही जागी होऊ लागली आहे. याच अस्वस्थतेतून जपानी समाजातील पती-पत्नी आता एक दिवस प्रेमासाठी बाजूला काढू लागले आहेत. इतकेच नव्हे, तर ‘माझ्या यशाच्या भराऱ्यांना तुझ्या प्रेमाचे पंख आहेत’, ही भावना पत्नीसमोर जाहीरपणे व्यक्त करण्याचा ‘उत्सव’च जपानमध्ये साजरा होऊ लागला आहे. आपल्या पतीने आपल्यावरील प्रेमाची अशी ‘गुलाबी पावती’ जाहीरपणे द्यावी, या सुखाची अनोखी अनुभूती अन्यांना समजणे शक्य नाही. पत्नीवरील प्रेमाचा वर्षांव अखंड राहील अशी ग्वाही देणाऱ्या पूर्वेकडील ‘जपानी प्रेमा’च्या या गोष्टीतून जगभरातील संसाराचे ‘गुलाबी बगिचे’ नव्याने मोहरतील.. आशेचे नवे धुमारे आता फुटू लागले आहेत!!
जपानी ‘प्रेमाची गोष्ट’!
स्त्री-जन्म हा शाप वाटावा अशी भावना बळावणारी परिस्थिती आसपास असली, तरी स्त्रीविषयीच्या आदराचीच शिकवण सर्वत्र दिली जात असते. स्त्री-पुरुषांमधील नाते प्रेमाच्या एका नाजूक भासणाऱ्या, परंतु भक्कम अशा गुलाबी धाग्याच्या सुखावणाऱ्या गाठीने बांधले गेलेले असते. या गुलाबी छटांमुळे संसाराचे सारे रंगही खुलतात.. असंख्य संसार याच धाग्यांनी बांधलेले,
आणखी वाचा
First published on: 01-02-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japani love story