आम्ही मा. रा. रा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव यांचे शतश: ऋणी आहोत. वाचकांना माहीतच असेल की मा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील तडफदार मंत्री असून कोकणाचे सर्वमान्य नेते होणे हे त्यांचे जीवनध्येय आहे. मोठे ध्येय असावे तर असे. आता या त्यांच्या ध्येयपूर्तीत विद्यमान कोकणसूर्य, तितकेच रा. रा. नारायणराव राणे हे खोडा घालीत आहेत तर रायगडरक्षक सुनील तटकरे आपल्या तटबंदीने अडथळा आणीत आहेत. या सर्वावर रत्नागिरीसूर्य जाधव हे मात करतील याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. कोणाही व्यक्तीस राजकारणात आदरणीय होण्यासाठी काही ना काही व्यवसाय करावा लागतो. बऱ्याचदा राजकारणी मंडळी त्यामुळे बिल्डर हा असा अत्यंत राजमान्य आणि आदरणीय व्यवसाय निवडतात. तसे रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव यांनी केले असते तर ते सर्वसामान्य ठरले असते. परंतु या रत्नागिरीभास्कराचे वैशिष्टय़ हे की ते बिल्डर यांनाही पायाभूत ठरेल अशा व्यवसायात शिरले. घरबांधणीसाठी जागेइतकाच मूलभूत घटक असलेल्या वालुकाव्यवसायात रत्नागिरीसूर्य जाधव यांनी स्वत:स झोकून दिले असून त्यांच्या या वालुकाप्रेमामुळे कोकणातील नद्या आपणहून वाळू पृष्ठभागावर पाठवू लागलेल्या आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे नाव बिल्डरही आदराने घेऊ लागले आहेत. त्यासाठी तर ते अतिआदरणीयच ठरतात. आमच्या मते बिल्डरांनी एखाद्यास आदरणीय ठरवणे याइतका बहुमान दुसरा कोणता असू शकत नाही. या विषयी कोणाचे दुमत असल्यास त्यांनी कोकणसूर्य नारायण राणे वा राजकारण कोहिनूर मनोहर जोशी यांच्याशी संपर्क साधावा. असो. हे विषयांतर झाले. आम्हास रत्नागिरीसूर्य भास्करराव जाधव यांच्याविषयी का भरते आले, तो मुद्दा प्रथम स्पष्ट करावयास हवा. आपला मुद्दा काय हे झाकोन ठेवून अन्य विषयांवर भाष्य करीत राहण्याइतके समीक्षकी चातुर्य आमच्यात अजून आलेले नाही, हे येथे नम्रपणे नमूद करावयास हवे. तर झाले असे की आपल्या राजकारण्यांना साहित्य संस्कृती या विषयी काहीही कळत नाही, असे आमचे मत होते आणि आहे. ते मा. रा. रा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव यांच्यामुळे अधिकच दृढ झाले. परंतु याबद्दल दु:ख करावे की आनंद वाटून घ्यावा हे आम्हास कळेनासे झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुसरे तितकेच रा. रा. कौतिकराव ढाले पाटील यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही आम्हास वाटू लागले आहे. किंवा कदाचित शासकीय समिती पुरुषोत्तम जे की मधु मंगेश कर्णिक यांचा सल्ला घ्यावा असेही आमच्या मनात घोळत आहे. रा. रा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव यांनी गतसप्ताहात मराठी साहित्यिकांस विचार करण्याचे आवाहन केले. आम्हास धक्का बसण्यास सुरुवात झाली ती तेव्हापासून. रा. रा. भास्कर जाधव हे चिपळूण येथे भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाबाबत बोलत होते आणि त्यासंदर्भात सध्या जे काही सुरू आहे ते पाहता साहित्यिकांनी स्वाभिमानाने, सारासार विवेक वापरून बहुढंगी तटकरे यांच्याबद्दल निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा तर हृदयविकारातून वाचल्यावर पक्षाघाताने गाठावे असाच धक्का म्हणावयास हवा.
मुदलात साहित्यिक स्वाभिमानाने विचार करतात किंवा साहित्यिकांस स्वाभिमान असतो हे रत्नागिरीसूर्य जाधव यांना सांगितले कोणी? असे विधान केल्याने त्यांचे अज्ञान तर यातून प्रकट झालेच पण त्याचबरोबर रत्नागिरीसूर्याचा सत्ताकारणातील अननुभवही उघड झाला. वास्तविक रा. रा. जाधव हे मूळचे शिवसेना या पक्षातील. त्या पक्षाचे कैलासवासी प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी अत्यंत शेलक्या शब्दांत साहित्यिकांची संभावना केली होती, याचाही त्यांना विसर पडावा, हे बरे नव्हे. त्यानंतर रत्नागिरीसूर्यानी जाणते राजे जे की शरद पवार यांच्या कळपात आo्रय घेतला. शिवसेनेने गत निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने रत्नागिरीसूर्य संतापले आणि त्याच तिरीमिरीत उठोन रा. रा. पवार यांच्या कळपात ते घुसले. तुमच्या लिखाणात आता नवे काही नाही, तुम्ही किती दिवस जुनेच पातेले खरवडणार असे एखाद्या प्रकाशकाने सुनावल्यावर मान्यवर वगैरे होऊन स्थिरावलेल्या एखाद्या लेखकुने दुसरा प्रकाशक गाठावा, तसेच रत्नागिरीसूर्याचे कृत्य. परंतु तेथेही जाऊन ते काही शिकले नाहीत, असेच खेदाने म्हणावेसे वाटते. साहित्यिकांची फौजच्या फौज पदरी बाळगण्याच्या कौशल्यात त्या पक्षाचे प्रमुख राष्ट्रवादीकार शरदराव यांचा हात धरणारा उभ्या भारतवर्षांत अन्य कोणी नसावा. अशा लेखकुंची भरती पेशवाईची आठवण करून देणारे रमणे भरवून कशी करावी, हे त्यांनीच तर या महाराष्ट्रास दाखवून दिलेले. त्याचेही विस्मरण रत्नागिरीसूर्य यांना व्हावे या दुर्दैवास काय म्हणावे? रत्नागिरीसूर्य जाधव आणि साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष रायगडरक्षक सुनील तटकरे यांच्यातील मतभेदांत त्यांनी अकारण साहित्यिकांच्या सदसद्विवेकास आवाहन केले, हेही आम्हाला पटलेले नाही. एखादी गोष्ट कमी असेल तर काटकसरीने वापरावी हे अर्थशास्त्रीय तत्त्व आम्ही मानतो. तेव्हा ऊठसूट प्रत्येकाने साहित्यिकांच्या सदसद्विवेकबुद्धीस असे चव्हाटय़ावर आणावे हे मुदलात कमी असलेल्या संपत्तीचा अपव्यय आहे असे आमचे ठाम मत आहे. बिचारे मराठी साहित्यिक. मुळात कुथतमातत एखाद दुसरी आवृत्ती त्यांच्या पुस्तकाची खपणार. पहिली प्रत बाजारात यायच्या आतच पाच हजार प्रतींच्या विक्रीची गोडबोली कला सगळय़ांनाच अवगत नसते, हे रत्नागिरीसूर्य जाधव यांनी लक्षात घ्यायला हवे. इतका मनोविकास सगळय़ांचाच झालेला असतो असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. लोकशाहीत जसे सर्व समान असले तरी काही अधिक समान असतात तसेच साहित्य आणि साहित्यिक यांच्याबाबतही असते हे पुरस्कारांचा झिम्मा करणाऱ्या दमाणींकडून रत्नागिरीसूर्य जाधव यांनी शिकावे. तसे ते शिकले असते तर रायगडरक्षक तटकरे यांच्यासाठी साहित्यिकांच्या उत्सवी मनोवृत्तीवर टीका करण्याचे औद्धत्य ते दाखवते ना. तेव्हा तटकरे यांना स्वागताध्यक्षपदाचा मान मिळाला म्हणून संतापून रत्नागिरीसूर्य जाधव यांनी इतकी काही आदळआपट करण्याची गरज नव्हती. इतक्या मोठय़ा प्रमाणावर जेवणावळी घालण्याची ताकद आपल्याकडेही आहे हे योग्य मंडळींमार्फत योग्य वेळी योग्य त्या मंडळींना कळवायची तसदी रत्नागिरीसूर्य जाधव यांनी घेतली असती तर स्वागताध्यक्षाची माला त्यांच्या गळीही पडली असती. आता झाले असतील पैसे केल्याचे आरोप रायगडरक्षक तटकरे यांच्यावर! त्याला साहित्यिक काय करणार? प्रचंड प्रमाणावर झालेल्या सिंचन घोटाळय़ाचे शिंतोडे रायगडरक्षक तटकरे यांच्या सफारीवर उडाले आहेत म्हणून काय त्यांनी साहित्यिकांचे स्वागत करू नये की काय? हा निकष लावला तर साहित्यसंमेलन उपोषणावर किंवा फारफार तर चहापाण्यावरच काढावे लागेल. खेरीज, यजमानाच्या उद्योगांची पर्वा आश्रितांनी का करावी, हा मुद्दा उरतोच! तेव्हा रायगडरक्षक तटकरे यांच्याविरोधात साहित्यिकांनी उभे राहावे हे आवाहन अस्थानी आहे. राहता राहिला मुद्दा रंगढंगाचा. त्यावर साहित्यिकांनी विचार करावा, अशीही अपेक्षा रत्नागिरीसूर्य व्यक्त करतात. हे फारच झाले म्हणायचे.
असो. या निमित्ताने का होईना रत्नागिरीसूर्य जाधव यांनी साहित्यास स्पर्श केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. इतके साहित्य प्रेम त्यांनी दाखवलेच आहे तर सरकारचे जागतिक मराठी संमेलनाचे २५ लाख रुपये परत करण्यासाठी साहित्य महामंडळाने रत्नागिरीसूर्य जाधव यांची जरूर मदत घ्यावी आणि त्यांच्या या साहित्यसेवेतून उतराई होण्यासाठी भविष्यातील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचा विचार करावा, अशी आमची नम्र सूचना आहे. महामंडळाचा व्यवहार पाहता ते ही सूचना अव्हेरणार नाहीत, अशी आम्हास खात्री आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा