राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि संयुक्त जनता दलाचे (जदयू) नेते नितीशकुमार या दोघाही बिहारी नेत्यांचा राजकीय उदय लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून झालेला आहे. बिहारी राजकारणाची अपरिहार्यता म्हणून वेळप्रसंगी जसे हे दोघे परस्परांच्या विरोधात कट्टरपणे उभे राहिले, तशाच अपरिहार्यतेने आता त्यांना एकत्र येणेही भाग पडले आहे. वीस वर्षांपूर्वी एकमेकांच्या हातात हात घालून या दोघांनी राजकारण केले. पण लालूप्रसाद बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे संबंध दुरावले. नितीशकुमारांची समता पार्टी, भाजपला पाठिंबा आणि संयुक्त जनता दलाची स्थापना या साऱ्या टप्प्यांमध्ये लालू आणि नितीशकुमार यांच्यातील दरीही रुंदावलेली होती, पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी असे काही फासे टाकले की, आपापले अस्तित्व टिकविण्यासाठी या दोघांना एकत्र येणे भाग पडले आहे. त्या निवडणुकीनंतर नितीशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या जीतन मांझी सरकारला स्थैर्य देण्यासाठी लालूप्रसाद यादव सरसावले. बिहारमधील राजकारणाला प्रदीर्घ काळानंतर ही कलाटणी मिळाली तेव्हाच आगामी राजकारणात नितीश व लालू हे एकत्र असणार याचे संकेतही स्पष्टपणे मिळाले होते. अवघड राजकीय परिस्थितीत सारेच समाजवादी नेते समविचारींना ऐक्याची आवाहने करीतच असतात. लालू आणि नितीश यांनीही तेच केले, पण या ऐक्यामागील राजकीय अपरिहार्यतेचे अर्थ न ओळखण्याएवढे राजकारण अपरिपक्व राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींच्या लाटेने भाजपने बिहारमधील या दोघाही नेत्यांच्या अस्तित्वालाच आव्हान दिल्याने परस्परांच्या आधाराने आपापले राजकीय भवितव्य सांभाळून ठेवण्यापुरतेच दोघांचे ऐक्य आहे, हे स्पष्ट आहे. मुळात, लालूविरोध हाच बिहारमधील नितीशकुमारांच्या राजकारणाचा पाया होता. असे असतानाही, केवळ विधानसभेच्या दहा जागांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांमुळे दोघाही नेत्यांना एकत्र येणे भाग पडले आहे. लोकसभा निवडणुकीत राजद आणि संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीचा थेट फायदा भाजपला मिळाला होता. लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मिसा भारती आणि जदयूचे नेते शरद यादव यांनाही याच मतविभागणीचा फटका बसला होता. एकीकडे मतविभागणीमुळे लालू-नितीश यांच्या पक्षांची वाताहत होत असताना, राजकारणाचे वारे ओळखून पावले टाकण्यात पटाईत असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने मात्र भाजपचा हात धरून आपले बस्तान बसविले होते. अशा या राजकीय हेलकाव्यांमध्ये आता अस्तित्व टिकविण्याची वेळ नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांच्या पक्षावर येऊ घातली आहे. समाजवादाचा गजर होत असला तरी मतविभागणी टाळली तरच अस्तित्व टिकविणे शक्य होईल हा राजकीय विचारच त्यांच्या ऐक्यामागे आहे. मतविभागणी टळली तर ४५ टक्के मते राजद व जदयूला मिळतील व असे झाले तरच भाजपची दौड रोखणे शक्य होईल, असे लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात जाहीरपणे सांगितले, तेव्हाच त्यांच्या ऐक्याचे इंगितही उघड झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसलाही फटका बसल्याने सर्वाच्या वेदना सारख्याच आहेत. या वेदना वाटून घेण्यासाठीच, राजद, जदयू आणि काँग्रेस विधानसभेच्या दहा जागांसाठी होणारी पोटनिवडणूक एकत्र लढविणार आहेत. राजकीय पक्षांच्या युती, महायुती, आघाडय़ांना वैचारिक बैठक असल्याचे सांगितले जात असले, तरी तो केवळ मुलामा असतो. सत्ताकारण हेच त्यामागचे खरे कारण असते. हे सत्य सगळीकडे सारखेच असते असा याचा अर्थ आहे.
ऐक्याचा ‘वैचारिक’ मुलामा..
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि संयुक्त जनता दलाचे (जदयू) नेते नितीशकुमार या दोघाही बिहारी नेत्यांचा राजकीय उदय लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून झालेला आहे.
First published on: 31-07-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu rjd comes together for bihar by poll