शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची बातमी पसरली, तेव्हा ती केवळ हूल असावी, असे सर्वानाच वाटले होते. इंग्रजी आणि िहदी या दोनही भाषा तुलनेने अधिक ज्ञात असल्यामुळे राहुल नार्वेकर हेच शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्तेपण करत असत, आणि तमाम वृत्तवाहिन्यांवर शिवसेनेची भूमिकाही तावातावाने मांडत असत. पक्षाचा हा पाईक तरी कठीण परिस्थितीत पक्षत्याग करणार नाही अशी सर्वाची समजूत होती. एकेकाळच्या या वटवृक्षावरच लहानाची मोठी झालेली अनेक पाखरे उडून जाऊ लागल्याने अस्वस्थ झालेल्या उद्धवजींनी एका विश्वासापोटी मागे राहिलेल्या शिवसनिकांना एकनिष्ठेच्या शिवबंधनात जखडून ठेवले होते. याआधीही काही वेळा नार्वेकरांना निवडणुकीची उमेदवारी देऊन माघार घेण्यास पक्षनेतृत्वाने भाग पाडले होते, पण त्यांनी पक्षत्यागाचा विचारही केला नव्हता. अशा या निष्ठावंताने अचानक निवडणुकीतून माघार घेत एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच, पण स्वपक्षालाच घायाळही केले. एक तर भाजपमधील संवादाच्या दरीवर बोट ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नार्वेकरांच्या या कृतीमुळे मान खाली घालावी लागली. विधान परिषदेची निवडणूक लढवायची की विजय स्पष्ट नसल्याने उमेदवारी मागे घ्यायची याचा निर्णय पक्षनेत्यांनी घ्यावयाचा असताना, पराभवाला सामोरे जाण्याचे टाळून राहुल नार्वेकर यांनी स्वत:च उमेदवारी मागे घेतली. उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट नंतर समजली असावी, हा संशय अजूनही पुरता पुसला गेलेला नाही. नार्वेकरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून प्रयत्न होणे तसे साहजिकच होते. कारण नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत, पुरेसे मतांचे बळ पाठीशी नसतानाही उभा असलेला दहावा उमेदवार सर्वाच्याच अडचणीचा ठरणार होताच, पण बिनविरोध निवडणूक होणार नसल्याने घोडेबाजारालाही निमंत्रण देऊन नाहक खर्चालाही भार ठरणार होता. नार्वेकरांनी उमेदवारी मागे घेतली तर निवडणूक बिनविरोध पार पडेल हे स्पष्ट असल्याने, भाजपनेही तसे प्रयत्न केले होते. पण उद्धव ठाकरेंच्या मनाचा नेमका ठाव लागत नसल्याने अखेर त्यांना बाजूला ठेवून थेट नार्वेकरांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले, आणि ते यशस्वीही झाले. सेनेतही संवादाची दरी आहे, आणि ती भाजपहूनही अधिक रुंद आहे, हे दाखवूनच नार्वेकरांनी आपल्या पुढच्या राजकीय हालचाली सुरू केल्याने, शिवबंधनाचा तो धागा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नतिक बळही खालावणारे ठरले आहे. राहुल नार्वेकर काँग्रेसमध्ये जाणार की, सासरेबुवांना जवळचा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करणार हा प्रश्नही फार काळ रेंगाळत राहिला नाही. कारण या घडामोडींच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्काम जवळपास सारे दिवस मुंबईतच होता. त्यामुळे पक्षांतराची पुढची प्रक्रिया फारशी अवघड होणार नाही, अशी अटकळ बांधणे सोपे गेले. नार्वेकर आता राष्ट्रवादीवासी झाले आहेत आणि त्यांना मावळची लोकसभेची उमेदवारीदेखील मिळाली आहे. शेतकऱ्यांवरील गोळीबार प्रकरणापासून मावळ मतदारसंघ ही राष्ट्रवादीची दुखरी नस झालाच होता. त्यातच, या मतदारसंघातून शेकापच्या पािठब्यावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करून राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाची पंचाईत करून ठेवली होती. आता नार्वेकरांच्या रूपाने पक्षाला उच्चशिक्षित उमेदवारही मिळाला आहे. शिवसेनेला खाली मान घालायला लावताना नार्वेकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचा विजय सोपा करून त्यांचीही मान उंचावली आहे.. पॉवर गेम म्हणतात तो यालाच!