संगीत ही श्रवणाची कला. हा श्रवणानुभव उत्कट असावा, म्हणून मैफली. कलावंतांचे ब्रँड झाले आणि मैफलही बदलत गेली.. महोत्सवात मैफल हरवू नये म्हणून काही करता येईल?
गाणं सगळ्यात चांगलं कुठं रंगतं, असा प्रश्न तुम्ही कुठल्याही कलाकाराला विचारलात, तर तो खासगी मैफल असं उत्तर देईल. भल्यामोठय़ा संगीत सभांपेक्षा कलाकारांना छोटय़ाश्या हॉलमध्ये निवडक श्रोत्यांसमोर आपली कला सादर करायला नेहमीच अधिक आवडतं. अगदी चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत अशा खासगी मैफलीच अधिक होत असत. सार्वजनिक ठिकाणी हजारभर श्रोत्यांसमोर कला सादर करण्यासाठी मुळात ध्वनिक्षेपणाची यंत्रणा अस्तिवात यावी लागली. बालगंधर्व जेव्हा रंगमंचावर संगीत नाटक सादर करत असत, तेव्हा त्यांचा आवाज ध्वनिक्षेपकाविना शेवटच्या रांगेत बसलेल्या श्रोत्यालाही ऐकू जाईल, असा असे. तरीही ते गाणं अतिशय अद्वितीय आणि स्वर्गीय होतं, असा त्यांचा अनुभव होता. संगीत ही श्रवणाची कला. त्यासाठी कानांना व्यवस्थित ऐकू येणं, एवढीच काय ती गरज. गायक किंवा वादक आपल्या आयुष्यभराची तालीम त्या श्रोत्यांसमोर सादर करण्यासाठी जसे आतुर असतात, तसेच श्रोतेही गळ्यातून वा वाद्यातून बाहेर पडणारा प्रत्येक स्वरकण जिवाचा कान करून ऐकण्यासाठी उत्सुक असतात. मोठमोठय़ाने गात राहिल्याने गळ्यातून अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असे अलंकार व्यक्त होण्यास त्रास होतो. गळा साफ ठेवून त्याचा केवळ सौंदर्यपूर्ण वापर करणे, हे केवळ छोटय़ा सभागृहातल्या मैफलीतच शक्य होते. ध्वनिक्षेपकाच्या आगमनानंतर संगीत ही सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचू शकणारी कला झाली. चित्रकाराला त्याचे चित्र सर्वाना दाखवण्यासाठी आर्ट गॅलरीसारखे माध्यम लागते आणि शिल्पकाराला मोठं अवकाश. गायक आणि वादकांना समोर असलेल्या श्रोत्यांचा अंदाज घेऊन त्यांना आवडेल, रुचेल अशी कला सादर करावी लागते. छोटय़ा मैफलीत निवडक पण गाणं कळणारे श्रोते असतात. त्यांच्यापुढे गाताना कलाकारालाही एक आव्हान असतं. अगदी ठेवणीतल्या अनेक गोष्टी अशा वेळी उत्स्फूर्तपणे बाहेर येतात आणि श्रोते साक्षात्कार पावतात. अतिशय तरल आणि सूक्ष्म स्वरलडी उलगडताना श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कलावंताला अधिक चेव आणतात आणि त्यातून त्याला नवोन्मेषी सर्जनाची प्रेरणा मिळते.
ध्वनिक्षेपणाने त्यात अधिक सुलभता आणली. गळ्याला ताण न देता कलाकाराला सहजपणे संगीत व्यक्त करणं सुकर झालं. एकाचवेळी अधिक संख्येनं श्रोते सहभागी होऊ लागले. अभिाजात संगीताच्या प्रसारासाठी सारे आयुष्य वेचलेल्या स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी संगीतावर चर्चा घडवून आणण्यासाठीही पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी संगीत परिषदांचं आयोजन केलं. त्यात चर्चाबरोबरच प्रत्यक्ष मैफलीही होत असत. शेकडो रसिकांसमोर गाणं सादर करणं आणि छोटय़ाशा मैफलीत गाणं यात गुणात्मक फरक असतोच. समोरच्या रसिकांच्या रसिकतेचा लघुतम साधारण विभाजक काढून त्यांना आवडेल असं गाणं सादर करत असतानाच, त्याच मैफलीत उपस्थित असलेल्या चोखंदळ रसिकांचीही मान डोलावेल, याची काळजी कलाकाराला घ्यावी लागते. मोठय़ा संगीत सभा किंवा महोत्सवांमध्ये गाणं गाताना अभिजात संगीतातील कलावंतांसमोर असं दुहेरी आव्हान उभं असतं. संगीताचा जसजसा प्रसार होऊ लागला, तसे संगीत ऐकणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. संगीत कळण्यापेक्षा ते आवडणे अधिक महत्त्वाचे आणि आवश्यक असल्याने या गर्दीत हौशे, नवशे आणि गवशे असे सगळेच जण असत. रंजनाचे अन्य साधन नसल्याने रसिकांसमोर अभिजात संगीताशिवाय पर्याय नव्हता, तरीही संगीतातील ललित संगीतासारखे म्हणजे ठुमरी, गजल यासारखे पर्याय होते. तेव्हाच्या कलावंतांमध्ये रसिकांना खेचण्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे अभिजात संगीताच्या क्षेत्रात एकाचवेळी अनेक दिग्गज आपापली कला दिमाखदारपणे सादर करत होते. हेवेदावे, मत्सर हे मानवी शत्रू तेव्हाही होते. पण त्यापलीकडे जाऊन कलेची ताकद एवढी होती, की एरवी एकमेकांचं तोंड न पाहणारे कलाकार दुसऱ्याचं गाणं ऐकून मनातल्या मनात का होईना स्तिमित व्हायचे. किराणा घराण्याचे संस्थापक आणि तत्त्वज्ञ, विचारवंत संगीतकार अब्दुल करीम खाँ आणि जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँ या दोघांना एकमेकांबद्दल कमालीचा आदर होता. दोघांच्या शैली भिन्न असल्या तरी त्यातील सौंदर्यस्थळं एकमेकांना साद घालत असत आणि त्यातून हे स्वरमैत्र निर्माण झालं. मैफलीत दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची ईष्र्या बाळगतानाही कलावंत सौंदर्यपूर्ण विचार करत असतो. त्यामुळे कलावंत जेव्हा रसिकाच्या भूमिकेत असतो, तेव्हा त्याच्यापुढे श्रवणाबरोबरच नव्या संशोधनाच्या साक्षात्काराचेही आव्हान उभे ठाकते. खासगी मैफलीत एकाच कलावंताचं गायन वा वादन ऐकताना रसिकाच्या मनात स्पर्धेचं गणितच नसतं. तो एकाग्र होऊन फक्त श्रवणाच्या भूमिकेत असतो. संगीत जेव्हा सार्वजनिक स्वरूपात प्रकट होऊ लागलं, तेव्हा कलावंताबरोबरच रसिकांसमोरही नवे प्रश्न निर्माण झाले.
संगीत महोत्सवांमुळे एकाचवेळी अनेक कलावंतांचं गायन ऐकण्याची सोय झाली. एकाच दिवशी वेगवेगळ्या शैलीतील अनेक रंग उलगडून पाहण्याची ही संधी रसिकांबरोबरच कलावंतांसाठीही नामी होती. सलग तीन दिवस चालणाऱ्या पंजाबातील जालंधर येथे भरणाऱ्या हरवल्लभ मेळ्यामध्ये एकापाठोपाठ कलावंत आपली कला सादर करत असत. त्यामुळे रसिकांबरोबरच कलावंतांचीही हजेरी मोठी असे. कलावंताला जी दाद हवी असते, ती बुजुर्गाची. आपलं गाणं खरंखुरं कळलेल्या रसिकाची दाद त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची. त्याच्यासाठी मग तो ठेवणीतले अलंकार बाहेर काढतो आणि त्याची वाहवा मिळवण्यासाठी आसुसतो. दाद मिळाली, की त्याच्या सर्जनाचा उत्साह दुणावतो आणि त्यातून आणखी नवं, त्यापूर्वी न सुचलेलं, वीज चमकावी असं काही नवं गळ्यातून बाहेर येतं. समोरची दाद तर येतच असते; पण त्याहूनही अधिक उचंबळून येते ती आपल्याच आतली दाद. हे सारं येतं कुठून, असा प्रश्न निर्माण करणारी. समोर गच्च भरलेला हॉल आणि तंबोरे जुळलेल्या मग्न अवस्थेत पहिल्या स्वरात साऱ्या मैफलीला आपल्या काबूत घेण्याचं सामथ्र्य असलेल्या भीमसेनी शैलीमुळे संगीताला एकाचवेळी अवकाशाला गवसणी घालण्याचं सामथ्र्य प्राप्त झालं. संगीत महोत्सवांमुळे संगीताचा प्रसार आणि प्रचार मोठय़ा प्रमाणात झाला. सर्वसामान्यांनाही अभिजात संगीताची गोडी लागल्याने संगीताची बाजारपेठही फुलली. तंत्रज्ञानानं ध्वनिमुद्रणाचं संशोधन सिद्ध केलं, तरी ते सामान्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. रेकॉर्ड प्लेअर ही एक सांस्कृतिक प्रतिष्ठेची वस्तू होती. नभोवाणीमुळे हेच संगीत घरोघर सहजपणे पोहोचलं. नंतरच्या काळातील कॅसेटस्, सीडी, आयपॉड यासारख्या गोष्टींनी जगातल्या संगीताच्या बाजाराला प्रचंड वेग प्राप्त झाला. चित्रपटातील गाणी अतिशय स्वस्तात रस्त्यावरही मिळू लागल्यानं रसिकांसमोर अनेकविध पर्याय उभे राहिले. अभिजात संगीताला निर्माण झालेला हा धोका स्वतंत्र मैफलींची संख्या रोडावण्यामुळे लक्षात आला. कलावंताची बिदागी, साथीदारांचे मानधन आणि कार्यक्रमाचा खर्च हे सारे केवळ तिकीटविक्रीतून करणे केवळ अशक्य झाले आणि त्यामुळेच गर्दी खेचणाऱ्या कलावंतांनाच मागणी येत राहिली. नव्याने संगीतात येणाऱ्यांचं हे व्यासपीठ हळूहळू मंदावत गेलं.
अशा स्थितीत अभिजात संगीतासमोर महोत्सव हा एकमेव पर्याय राहिला. प्रायोजकत्व मिळवून कमी शुल्काच्या तिकिटात एकाचवेळी अनेक कलावंत ऐकण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली. वादन, नर्तन आणि गायन असं वैविध्य असणाऱ्या अशा महोत्सवांमुळे मोठय़ा कलावंतांनाही मागणी वाढू लागली. गेल्या पन्नास वर्षांमध्ये अशा महोत्सवांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. साऱ्या देशभर विविध भागात वर्षभर अशा संगीत महोत्सवांचं आयोजन होत असतं. मोठय़ा प्रमाणावर रसिक एकत्र येत असल्यानं उद्योगांकडून अर्थसाह्य़ मिळणं शक्य होऊ लागलं आणि कलावंतांमध्येही गुणात्मक स्पर्धा सुरू झाली. ध्वनिक्षेपणामुळे घसा न खरवडता स्वरकणही सहजपणे ऐकण्याची सोय झाली. पण समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना पकडून ठेवण्याच्या नादात अभिजाततेची पातळीही खालावली जाऊ लागली. श्रोत्यांना काय आवडतं, हे पाहून तसं आणि तेवढंच गाणं गाणारे कलावंत निर्माण होऊ लागले. उच्च दर्जाच्या अभिव्यक्तीपेक्षा लोकप्रियतेच्या आहारी जाण्याचं प्रमाणही वाढू लागलं. इंग्रजीत ज्याला ‘प्लेईंग टू द गॅलरी’ असं म्हणतात, तसं लोकानुनय करणारं संगीत फोफावलं. चित्रपट संगीताच्या आक्रमणानं अभिजातता पातळ होत असताना रसिकांना नवं, सुंदर आणि विचारपूर्ण गाणं ऐकवण्याचं आव्हान पेलण्यापेक्षा ‘चलती का नाम गाडी’ असं सूत्र अवलंबणं सुरू झालं. एखाद्या मनस्वी कलावंताला अगदी अतिशय तरल आणि उत्कट असं व्यक्त करण्याची इच्छा असली, तरी ते जनप्रवाहात रुजेल, आवडेल, याची खात्री नसल्याने त्या वाटेला जाणंच हळूहळू कमी झालं.
 गाण्याचा प्रसार झाला पण त्याचा दर्जाही वाढण्यासाठी महोत्सवांच्या बरोबरीनं ‘चेंबर म्यूझिक’ या संकल्पनेचा प्रसार व्हायला हवा. त्यासाठी नफा मिळवणाऱ्या उद्योगांनी आपणहून पुढे येऊन साह्य़ करावं. असं झालं, तर संगीत महोत्सवांमध्ये सादर होणारं संगीतही अधिक वरच्या स्तरावर जाऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा