आजच्या काळात लोकशाहीचे सर्वच आधारस्तंभ डळमळत असताना न्या. जॉन मायकेल दा कुन्हा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना चार वर्षे तुरुंगवास व १०० कोटी रुपयांचा दंड करून न्यायाचा आदर्श घालून दिला आहे. नि:स्पृहता, कुठल्याही दडपणापुढे न झुकता न्यायदान करणे ही खऱ्या न्यायाधीशाची लक्षणे असतात, ती सर्व कुन्हा यांच्यात आहेत म्हणूनच ते आधुनिक काळातील रामशास्त्री ठरले.
या प्रकरणात किमान तीन न्यायाधीश बदलण्यात आले. सरकारी वकील बदलण्यात आले, त्यात खासच राजकीय दडपणाचा भाग होता, पण जेव्हा हा खटला सुनावणीसाठी न्या. कुन्हा यांच्यापुढे आला तेव्हा त्यांनी जयललितांचे सिंहासन खाली करण्याचे धैर्य दाखवले. यापूर्वीही त्यांनी हुबळी येथे इदगाह मैदानावर राष्ट्रध्वज फडकावण्याची स्टंटबाजी करणाऱ्या भाजप नेत्या उमा भारती यांच्यावरील न्यायालयीन कारवाईत हस्तक्षेप केला जाणार नाही असे सांगून आपला बाणा सोडला नव्हता. ऑक्टोबर २०१३ मध्ये जयललितांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खटला त्यांच्याकडे आला व वर्ष पूर्ण होण्याच्या आत त्यांनी तो हातावेगळा केला. न्यायदानातील तत्परताही त्यांनी दाखवली.
कुन्हा हे मूळचे मंगलोर जिल्ह्य़ातील कैलकांबा गावचे आहेत, त्यांच्या विद्यार्थिदशेत ते व्हॉलीबॉल खेळत असत. तेथील एसडीएम विधी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. १९८४ मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिली सुरू केली. नंतर २००२ मध्ये त्यांची थेट जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाली. धारवाड, बेल्लारी, बेंगळुरू येथे त्यांनी काम केले आहे. त्यांचे सहकारी असलेले वकील एम. पी. नरोना यांनी सांगितले की, ते केवळ एक-दोन खटल्यांमुळे नाव झालेले न्यायाधीश नाहीत. त्यांनी प्रत्येक खटला अशाच आत्मीयतेने चालवला आहे.  कौटुंबिक तंटा न्यायालयातही ते ‘फॅमिली कोर्ट जज’ म्हणून फार प्रसिद्ध होते. न्यायाधीश म्हणून कुन्हा हे कधीच त्यांच्या चेंबरमध्ये लोकांना भेटत नाहीत, जी काही चर्चा करायची असेल ती खुल्या न्यायालयात करावी हा त्यांचा आग्रह न्यायाला बळकटी देणाराच आहे. जयललिता यांच्या खटल्यातील सरकारी वकील भवानी सिंग यांनी जेव्हा कामात टाळाटाळ सुरू केली तेव्हा कुन्हा यांनी त्यांना ६० हजार रुपये दंड केला होता. सकाळी नाश्त्याच्या वेळी अनेक मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री त्यांच्यासमवेत असतात, पण त्यांचे ते संबंध न्यायदानाच्या कधीच आड येत नाहीत. न्यायदेवता सरसकट आंधळीच नसते हे दाखवून दिले म्हणूनच ते ‘नो नॉनसेन्स’ म्हणजे कुणाचीही भीड न बाळगता नि:स्पृहपणे काम करणारे आधुनिक काळातील रामशास्त्री म्हणून सर्वाना परिचित झाले आहेत.

Story img Loader