महाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत. पहिला विचारप्रवाह शिकवणे, विद्यार्थी घडवणे या प्रक्रियेवर भर देतो. दुसरा विचारप्रवाह घडणे, होऊ देणे या प्रक्रियेवर भर देतो. हे दोन्ही प्रवाह गेली कित्येक वर्षे आपल्या कला व कला शिक्षण क्षेत्रात रुजले आहेत.

मानवी मेंदू, त्याचे कार्य आणि चित्रकला यांच्यातील संबंधांबाबत आपण आत्तापर्यंत बरीच चर्चा केली आहे. त्यामुळे चित्रकला शिक्षण व मानवी मेंदूचं कार्य यात काय संबंध आहे ते आपण पाहायला पाहिजे. कदाचित या अभ्यासातून आपल्याला काही नवीन सापडेल.
मेंदूच्या रचनेबाबत व कार्याबाबत असे म्हटले जाते की, मेंदूचे दोन भाग आहेत. उजवा मेंदू व डावा मेंदू! डावा मेंदू गणित, भाषा, विज्ञान अशा विषयांशी संबंधित असतो तर उजवा मेंदू कला शिकण्याशी संबंधित असतो. पण त्याबद्दल जरा नंतर पाहू!
कलेसंबंधात, अगदी चित्रकलेसंबंधातसुद्धा आपण ‘कलाकृती’ हा शब्द वापरतो. या शब्दात दोन गोष्टी एकत्र आहेत. एक ‘कला’ व दुसरी ‘कृती’. कला म्हणजे काय हे सांगणे, त्याची व्याख्या करणे कठीण आहे असे बऱ्याच वेळा म्हटले जाते. त्यामुळे जर का कला म्हणजे काय हे सांगणे कठीण असेल, व्याख्या करणे कठीण असेल तर ते समजणे, शिकणेही कठीण नसेल काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. त्यामुळे आपण ‘कला’ शिकतो म्हणजे काय? हाही प्रश्न समोर उभा ठाकतो. या प्रश्नांमुळे आपल्याला कळते की आपण कला, चित्रकला शिकत असताना त्या संबंधातील ‘कृती’ करणे शिकत असतो. म्हणजे कागदावर किंवा कुठच्याही पृष्ठभागावर रेखाटने करणे (ऊ१ं६्रल्लॠ) व रंग वापरून प्रतिमा तयार करायला शिकतो. या प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक कृती- पेन्सिल, पेने, ब्रश आदी साधनांच्या साहाय्याने रेखाटने करणे व रंग पृष्ठभागावर लावणे, त्यातून आकार घडवणे हे करायला शिकतो.
एकदा रेखाटने करणे, रंग लावून आकार निर्माण करणे जमले की आपण अनेक ‘विषयांवर’ विविध प्रतिमा तयार करू शकतो; करू लागतो. हे जर का आपण आपल्या शालेय जीवनात, लहानपणीच करू शकलो तर आपले पालक, शिक्षक आदी मोठी मंडळी म्हणतात, की याला/हिला ‘कलेत’ रस आहे. हा/ही सारखा/ सारखी चित्रे रंगवत असतो/ते. (म्हणजे चित्रे रेखाटणे व रंगवणे ही ‘कृती’ करत असतो/ते) आहे की नाही गंमत! आपण ‘कृती’ शिकतो आणि म्हणतो ‘कला’ आली.
आपण बऱ्याच गोष्टी किंवा जीवनावश्यक बहुतेक आवश्यक तंत्र लहान वयातच शिकतो. लहान वयात आपला मेंदू वाढत असताना, आपल्यामध्ये अनेक कृती शिकण्याची क्षमता तयार होत असते. त्यामुळे आपण आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत अनेक ‘कृती’, (शरीराची हालचाल, तोंडाने आवाज निर्माण करणे- बोलणे, लिहिणे, चित्रे काढणे, आकार घडवणे अशा असंख्य) ज्या मोठय़ा माणसांनी केल्या आहेत, करून दाखवतात, त्यांना पाहून, तशाच कृती करायला शिकतो. अशा ‘कृतीं’च्या ‘प्रतिकृती’ करायला शिकून आपण अनेक गोष्टी शिकतो. चित्रे रेखाटणे, रंगवणेही त्यातच आले.
या शिकण्याच्या प्रक्रियेत दोन गोष्टी आहेत, एक हजारो वर्षे उत्क्रांत होत, शिकत गेलेला मेंदू व त्यातून विकसित झालेला मानवी समूह, समाज, संस्कृती. प्रत्येक लहान मुलात हजारो वर्षे उत्क्रांत झालेला मेंदू व त्याच्या क्षमता असतात व त्या मेंदूला, मुलाला विविध समाज, त्या समाजात रुजलेल्या पद्धतीने ‘कृती’ करायला शिकवतो. उदा. प्रत्येक लहान मुलात ‘बोलण्याची’ क्षमता असते व त्यामुळे विविध समाज, त्या समाजातील बोलीभाषा, म्हणजे त्या बोलीभाषेतील ‘आवाज’ तोंडाने निर्माण करायला (बोलायला) व त्यांचा वापर ‘अर्थासह’ करायला शिकवतात. प्रत्येक बालकाला, ते बालक ज्या समाजात जन्मते, त्या समाजानुसार कृती करायला शिकते, शिकवले जाते, पण हे करण्यासाठी त्या बालकात हजारो वर्षे उत्क्रांत झालेल्या मेंदूची क्षमता नसेल तर ते बालक शिकणार नाही. त्यामुळे शिक्षणाचा, चित्रकला शिक्षणाचा विचार करताना मेंदूच्या क्षमता, कार्य व ‘कलाकृती’ घडवण्याच्या सामाजिक कल्पना, सवयी, पद्धती अशा गोष्टींचा विचार करायला हवा.
आपल्याकडे (महाराष्ट्रात) चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत. एक कृती आधारित आहे. त्यामध्ये कृतीसारखीच कृती करण्यावर भर आहे. तर दुसरा विचारप्रवाह, हा महाराष्ट्रामधील कलाविश्वात सिग्मंड फ्रॉइडच्या सुप्त मनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. दुसरा विचार प्रवाह म्हणतो की, कृतीसारखीच कृती करायला शिकवण्यापेक्षा, सुप्त मनातील घडामोडींवर आधारित कृती करायचे स्वातंत्र्य दिले पाहिजे! पहिला विचारप्रवाह शिकवणे, विद्यार्थी घडवणे या प्रक्रियेवर भर देतो. दुसरा विचारप्रवाह घडणे, होऊ देणे या प्रक्रियेवर भर देतो. हे दोन्ही प्रवाह गेली कित्येक वर्षे आपल्या कला व कला शिक्षण क्षेत्रात रुजले आहेत. पहिला प्रवाह आपल्याकडे ज्याला वास्तववादी चित्रशैली म्हणतात त्या अंगाने चित्र काढण्याच्या विचारप्रवाहातून जन्मला आहे, तर दुसरा विचारप्रवाह हा अभिव्यक्तिवादी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकलाशैलीच्या अंगाने चित्र काढण्याचा विचार करण्यातून उपजला आहे. हे दोनही विचारप्रवाह कला शिक्षणाचा हेतू कलेतून भावना, विचार यांचे कथन किंवा अभिव्यक्ती एवढाच मानतात; परंतु व्यक्त होणे हा या प्रक्रियेचा एक भाग झाला, त्या आधी भावनांना समजणे, विचार करणे, करता येणे हेही येते. या गोष्टी सध्याचे कला शिक्षण करत नाही. अशाने कला शिक्षण म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? त्याचे स्वरूप काय असावे अशा गोष्टींचा विचार करता येणे शक्य नाही. कारण या विचारप्रणाली आपल्याच समाजाने गेली कित्येक वर्षे मुरवत तयार केल्या आहेत. या सवयी, वाईट सवयी अशा पटकन सुटणार नाहीत. त्यामुळे कला शिक्षण प्रक्रियेतील दुसरा घटक, हजारो वर्षे उत्क्रांत झालेला मेंदू या घटकाकडे पाहून काही सापडते का, हे पाहायला पाहिजे.
आपण मानवी इतिहासाकडे पाहिले तर मानवाच्या इतिहासाचे संस्कृतीपूर्व व सुसंस्कृत समाज असे दोन भाग पडतील. त्याकडे लिखित भाषापूर्व व लिखित इतिहासासह असेही वर्णन करता येईल. मानवाच्या इतिहासाकडे पाहिले व त्यातील त्याच्या शिकण्याच्या इतिहासाकडे पाहिले तर असे लक्षात येते की, जशी त्याच्या शरीराची उत्क्रांती झाली तशी त्याच्या सर्व ज्ञान विषयांचीही झाली. परिणामी कला, विज्ञान, तंत्रज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, शेती अशा कित्येक ज्ञानशाखांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या धारा अनेक वेळा समांतर तर कधी एकमेकांना स्पर्श करत, मिसळत, समकालीन कालापर्यंत पोहोचतात.
प्रत्येक लहान मूल, मानवाच्या उत्क्रांतीच्या, सर्व टप्प्यांतून जात वाढत असते. अर्थातच हजारो वर्षांत शिकलेल्या गोष्टी आता आपण काही वर्षांत शिकू शकतो हीच मेंदूच्या उत्क्रांतीची गंमत आहे.
माणसाने, सर्वात प्राचीन संस्कृती अस्तित्वात येण्याआधीपासून चित्रे रंगवली आहेत. लिखित भाषा-लिपी तयार होण्याआधीही चित्रे रंगवली आहेत. त्यानंतर विविध संस्कृतींत चित्रे रंगवली. त्याचे स्वरूप वेगवेगळे होते, त्यांची गुणवत्ता, ती गुणवत्तापूर्वक चित्रे निर्माण करण्यासाठी आवश्यक तंत्र, कसब वेगवेगळे होते. जगात विविध काळांतील संस्कृतीमध्ये जी चित्रे रंगवली गेली त्यांचा धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित अशा कित्येक ज्ञानशाखांशी संबंध आला. या ज्ञानशाखांशी संबंध आल्याने कलेचे स्वरूप खूप बदलत गेले. या सर्वातून चित्रकला शिक्षणाबद्दल नक्कीच काही शिकता येईल. त्याची तपशीलवार चर्चा पुढच्या वेळी करू.
लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल mahendradamle@gmail.com

portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Marathi Movie Review M Po Bombilwadi Director Paresh Mokashi
रंगतदार प्रहसननाट्य
Story img Loader