भारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली. त्याने अनेक जणांची श्रीमंती वाढली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली. हे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना मात्र उतरंड लागली..
बाजारपेठ ही बहुतेक जणांना आनंद देणारी जागा असते. अनेक, विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. त्यांचे रंग-आकार आदी गुण, त्यांच्या किमती वस्तूंचे अनुभव आपल्याला त्यांच्याकडे आकर्षून घेत असतात. एकंदरीत मजा असते. बाजारात अनेक प्रकारच्या गोष्टी विकायला अनेक प्रकारचे लोक आलेले असतात. ते खूप वेगवेगळ्या भाषा बोलतात. या वेगवेगळ्या भाषांमुळेही बाजाराला एक मजा येते. एकच भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बाजारापेक्षा अनेक भाषा बोलणाऱ्या बाजाराचा नूर काही वेगळाच असतो. या सगळ्याचा संबंध चित्रकलेशी काय? चित्रकला शिक्षणाशी काय? इतर वस्तूंची बाजारपेठ व चित्रकलेची बाजारपेठ यात साम्य असते काय? या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरं होय, साम्य आहे असं आहे. कलाबाजाराचा चित्रकला शिक्षणाशी नक्कीच संबंध आहे. त्यामुळे आपण बाजाराकडे पहिलं लक्ष देऊ, तो समजून घेता येतो का ते पाहू.
कुठल्याही बाजारात आपल्याला जीवनात उपयोगी अशा वस्तू विकायला असतात. एके काळी म्हणजे युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत रोजच्या जीवनात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या कलाकारांकडूनच बनवल्या जायच्या. त्यात कपडे, भांडी, फर्निचर, हत्यारं, साधनं, दागिने, चपला इत्यादी असंख्य गोष्टी! यात कल्पनाशक्ती, मागणी, बाजारातली स्पर्धा अशा कारणांनी, त्यात विविधता व गुणवत्ता निर्माण व्हायची; पण जगभरात धर्मगुरूंनी, राजांनी, राजकारणी लोकांनी कलेचा वापर विविध कल्पना, संकल्पना, कथा, घटना याचं चित्रण करण्याकरिता सुरू केला. कलेचा संबंध अशा रीतीने इतिहास, धर्म, राजकारण आदींशी आला. कला आता वापरायच्या वस्तूंपुरती मर्यादित राहिली नाही, ती अमूर्त संकल्पनाच दृश्यरूप दर्शविणारी वस्तू झाली, ‘विचार वस्तू’ झाली. इथूनच पुढे कलेमध्ये विचार वस्तू ही काहीशी उच्च दर्जाची व वापराची वस्तू ही काहीशी कमी दर्जाची असा समज रूढ झाला. ‘अलंकरण’ हा वापरायच्या वस्तूंच्या घडणीमधील सहज, नैसर्गिक वृत्तीने आलेला भाग होता. या अलंकरणामुळे दैनंदिन जीवनात वापरायची वस्तू ही ‘कलाकुसर’ (क्राफ्ट) असं म्हणून कमी लेखली जाऊ लागली.
सामान्य लोक, धर्मगुरू, राजे आदी सर्व लोक विशिष्ट प्रकारच्या कलेची, कलाकृतीची मागणी करायचे, त्यानुसार कलाकृती घडविल्या जायच्या म्हणजे कलेची निर्मिती निश्चित हेतूने आणि ठरावीक प्रकारचा परिणाम साधण्यासाठी केली जायची. कलेचा विशिष्ट उपयोग निश्चित असायचा.
औद्योगिक क्रांतीने, कलाकारांनी हातांनी बनविलेल्या वस्तू यंत्रांच्या मदतीने, मोठय़ा संख्येने कमी वेळात बनविण्याची व्यवस्था निर्माण केली. परिणामी हातांनी बनवलेल्या, रोजच्या वापरातल्या कलावस्तू बनवण्याच्या व्यवस्था या शक्तिहीन होऊ लागल्या. हे सर्व घडत असताना धर्मगुरू, राजे यांची सत्ता जाऊन बहुतांशी लोकशाही, लोकनियुक्त सरकार स्थापन होऊ लागल्या व कलेमध्ये धर्मगुरू, राजे यापेक्षा कलाकारांची मतं, इच्छा, भावना, विचार यांचं महत्त्व, अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट होऊ लागली. कला ही या अर्थी ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ झाली. चित्रकला बाजारही आता राजे, धर्मगुरूंपेक्षा औद्योगिक क्रांतीच्या जोरावर श्रीमंत झालेल्या लोकांनी भरला होता. हे नव्या पिढीचे श्रीमंत कलावस्तू खरेदी करीत होते. चित्रकला बाजार हा इतर कुठच्याही बाजाराप्रमाणे नेहमी नवीन, वैशिष्टय़पूर्ण, विक्रीयोग्य गोष्टींच्या शोधात असतो. त्याद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या संधी (नवीन) प्राप्त होत असतात. लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या वातावरणात, व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अशा कलावस्तूंची निर्मिती मोठय़ा पद्धतीने होत असते. कलाकारांची मोठय़ा संख्येने उपलब्धी असते. ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ असलेली कलावस्तू या कलाबाजारातील स्पर्धेमुळे हळूहळू ‘मौल्यवान’ ठरू लागल्या, त्यांच्या किमती वाढू लागल्या. मग पुनर्विक्री, लिलाव आदी गोष्टीही सुरू झाल्या.
मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांची बाजारपेठ ही जास्त मजेची असते. तो मुद्दा इथे कलाबाजार संदर्भात समजून घेऊ. नक्की ही बाजारपेठ मजेची का असते? आपण हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. प्रवासात आपण चहा, कॉफी विकणारे लोक पाहतो. ते ‘चहा’ हा शब्द त्यांच्या बोलीभाषेच्या उच्चार पद्धतीने उच्चारतात. ‘चाये चाये’, चाऽऽऽय, चय, मस्सालाऽऽऽ चाऽऽय, चाऽऽचाऽऽचा अशा कित्येक प्रकारांत! या प्रकारांतून एक लय, नाद निर्माण होतो, आपलं लक्ष वेधून घेतो. या नाद-लयीचा चहाच्या गुणवत्तेशी काही संबंध असतोच असं नाही, पण आपल्या मनात एक प्रतिसाद (चहा पिण्याची इच्छा) निर्माण करतो. येथे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे विविध भाषा, उच्चारांतून चहा या वस्तूचे अनेक अर्थ तयार झाल्यासारखे वाटतात. एकाच वस्तूचे अनेक पैलू असल्याप्रमाणे! असे अनेक अर्थ, पैलू तयार झाल्याने विविध प्रकारचे ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तूकडे आकर्षित होतात. कलाबाजाराचंही असंच आहे! औद्योगिक क्रांतीपूर्वी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू किंवा धर्म, राजकारण आदींविषयक संकल्पनांआधारे कला बनवण्याची मागणी केली जात होती. या कलाकृतींकडे पाहण्याचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित होते. त्यामुळे आधुनिक कलेमध्ये कलाकार या एका व्यक्तीच्या दृष्टिकोन, विचार, अनुभव, अभिव्यक्तीवर आधारित कलावस्तू या ‘नवीन प्रकारच्या’ कलावस्तू कलाबाजाराला उत्तेजित करतात, प्रेरित करतात.
पोट्र्रेट, निसर्गचित्रं, वस्तुचित्रं, इतिहास-पुराण कथाचित्रं आदी पारंपरिक चित्रप्रकारांकडे कलेची बाजारपेठ म्हणूनच एका वेगळ्या दृष्टीने पाहते. या प्रकारच्या कलाकृतींचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित असतात. त्यांचे अनेक अर्थ, विविध प्रकारच्या व्यक्ती, विचारप्रवाह लावू शकत नाही. त्यामुळे बाजारपेठ अशा कलाकृतींकडे विषय, चित्रप्रकार, शैली, कालखंड आदी गोष्टींच्या दृष्टीने एक विक्रीसाठी आवश्यक ओळख करून पाहते, व्यवहार करते.
या सगळ्याची चर्चा करण्याचं कारण काय? कारण महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात अनेक घटना गेल्या तीस वर्षांत घडल्या, त्यांच्याकडे आज नीट पाहता येईल, समजून घेता येईल. या तीस वर्षांत महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत कलाबाजारपेठ नव्या आयामाने सुरू झाली. १९९० च्या सुमारास भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मुक्त झाली. भारतीय शहरांमध्ये भौतिक चकचकाट, चंगळ वाढली. अनेक जणांची श्रीमंती वाढली. ती लाखांऐवजी कोटींमध्ये मोजली जाऊ लागली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली.
हे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना उतरंड लागली. ती १९९० च्या आधीपासून चालू झाली. कलाशिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शिक्षण पद्धती आदींचा दर्जा खाली गेला. पारंपरिक चित्रकला- दृश्यकला- ललित कलांचं शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेची वाताहत होणे व त्याच वेळेला कलाबाजारपेठ तेजीत येणं हे फार विचित्र होतं. वास्तविक बाजार तेजीत होता, असतो तेव्हा त्याचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवर होतो. शिक्षणव्यवस्थेचीही भरभराट होते. याचं कारण काय? आपल्याकडे बाजारपेठ असं म्हणते की, पारंपरिक दृश्यकला शिक्षणव्यवस्था अजूनही दृश्यकलेचं भाषा म्हणून शिक्षण देत नाही. फार जुन्या संकल्पना, तंत्र आदींच्या आधारित शैली आधारित चित्रकलाच्या निर्मितीचं शिक्षण देतात. म्हणजे थोडक्यात औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या कालखंडातील कल्पनांवर आधारित कलाशिक्षण दिलं जातंय!
बाजारपेठेचं शिक्षणव्यवस्थेनं किती ऐकावं त्यानुसार किती बदलावं? माहीत नाही, पण बाजारपेठेच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातूनही कला शिक्षणव्यवस्थेला कदाचित काही शिकता येईल.. पुढे पाहू या काय सापडतं का?
लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल
mahendradamle@gmail.com