कांशीराम यांची राजकीय भूमिका ही केवळ दलितांपुरती मर्यादित नव्हती हे लेखकाने अधोरेखित केले आहे. त्यांच्या या भूमिकेत आदिवासी, इतर मागासवर्गीय तसेच धार्मिक अल्पसंख्याक यांचा समावेश होत असे. असे असताना चरित्राचे उपशीर्षक ‘लीडर ऑफ द दलित्स’ हे मात्र काहीसे बुचकळ्यात टाकणारे आहे. यातून काय सूचित करायचे आहे? या समाजघटकांनी त्यांच्या राजकारणाला प्रतिसाद दिला नाही, का त्यांची भूमिकाच मुळी वरवरची होती?
कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना आणि सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थिती असताना ठोस राजकीय भूमिकेच्या आधारावर स्वत: स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचे कांशीराम यांचे कर्तृत्व स्वातंत्र्योत्तर भारतात अपवादात्मकच असे म्हणावे लागेल. ढोबळमानाने त्यांचा राजकीय प्रवास तसा अनेकांना परिचित आहे. पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आगमन, तिथे महात्मा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी झालेला परिचय, रिपब्लिकन चळवळ-राजकारण यांच्याबद्दलचा भ्रमनिरास आणि त्यातूनच कालांतराने बामसेफ आणि मग बहुजन समाज पक्षाची स्थापना हे त्यातील प्रमुख टप्पे. परंतु त्याहीपलीकडे जाऊन कांशीराम यांच्या राजकीय कारकिर्दीचा समग्र पट उत्तर भारत आणि विशेषत: उत्तर प्रदेशातील दलित राजकारणाचे अभ्यासक प्रा. बद्री नारायण यांनी ‘कांशीराम – लीडर ऑफ द दलित्स’ या चरित्रात मांडला आहे.
कांशीराम मूळचे पंजाबमधील एका छोटय़ा खेडय़ातील. त्यांचे आजोबा लष्करात सनिक होते तर वडिलांचा चामडय़ाचा छोटासा व्यवसाय होता. त्यावरून उत्तर भारतातील एकंदर दलित समाजातील कुटुंबाच्या आíथक परिस्थितीपेक्षा कांशीराम यांच्या कुटुंबाची स्थिती अधिक चांगली असावी असे दिसते. परंतु याचा कांशीराम यांच्या राजकीय आयुष्यावर काही प्रभाव पडला का, याबद्दल चरित्रात फारसे भाष्य नाही.
पुस्तकात एकंदरच २०व्या शतकातील उत्तर भारतातल्या दलित चळवळ आणि राजकारणाची माहिती दिली आहे. पंजाबात मंगु राम यांची अद-धर्म चळवळ, स्वामी अच्छुतानंद यांनी उत्तर प्रदेशातील दलित मुक्तीचे प्रयत्न तसेच डॉ. आंबेडकर यांचा विचारांचा उत्तर भारतात प्रचार-प्रसार यांची चर्चा प्रा. नारायण यांनी केली आहे. पण या प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील बाबी होत. यांच्याबरोबरच स्वातंत्र्योत्तर काळातील उत्तर प्रदेशातील चर्मकार समाजाने आपले पारंपरिक व्यवसाय सोडून द्यावेत यासाठी केलेली नारा-मवेशी चळवळ आणि डॉ. लोहिया यांचे सहकारी राम स्वरूप वर्मा यांनी स्थापन केलेला अर्जक संघ यांची देखील माहिती मिळते. या चळवळी-संघटना एक प्रकारे कांशीराम यांच्या राजकीय प्रयोगाच्या पूर्वसुरी होत. त्यामुळे कांशीराम यांच्या प्रयत्नांसाठी एक पोषक पाश्र्वभूमी उपलब्ध होती असे म्हणता येईल. अर्थात त्यामुळे त्यांनी उपसलेल्या कष्टांचे आणि दाखवलेल्या राजकीय कल्पकतेचे महत्त्व कमी होत नाही.
पुस्तकात नोकरी सोडल्यानंतर कांशीराम यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या संघटनेची आणि नंतर पक्षाची कशी बांधणी केली याचे तपशील दिले आहेत. त्यावरून बहुजन समाज पक्षाला कोणत्या प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागले हे लक्षात येते. कांशीराम यांची समाजाबद्दलची बांधीलकी यातून लेखकाने अधोरेखित केली आहे. स्थानिक बोलींचा खुबीने वापर करून कांशीराम लोकांशी कसा संवाद साधत याचा काही त्रोटक तपशील दिला आहे. रूढ अर्थाने कांशीराम हे काही फर्डे राजकीय वक्ते होते असे म्हणता येणार नाही. परंतु या तपशिलाच्या आधारे ते एक प्रभावी संवादक होते असे दिसते. याची अधिक चर्चा झाली असती तर कांशीराम यांच्या राजकारणाबद्दलची आपली समज अधिक व्यापक झाली असती.
१९९० च्या दशकापासून कांशीराम आणि बहुजन समाज पक्ष देश पातळीवरील राजकारणात झळकू लागले. राजकीय सत्ता प्राप्ती हे आपले ध्येय आहे असे स्वत: कांशीराम यांनी अनेक वेळा जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी परस्परविरोधी राजकीय भूमिका असणाऱ्या राजकीय पक्षांशी हातमिळवणी केली होती. यामुळेच त्यांच्यावर दोन प्रमुख आरोप झाले. पहिला होता संधिसाधूपणाचा. याला अर्थातच राजकीय अभिनिवेशाची झालर होती. दुसरा अधिक महत्त्वाचा होता. कांशीराम यांना राजकीय सत्ता हस्तगत केल्यामुळे दलित समाजाचे सर्व प्रश्न सुटतील असे वाटत असल्यामुळे आíथक तसेच सांस्कृतिक बाबींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
पहिल्या मुद्दय़ाबाबत लेखकाने कांशीराम यांचे समर्थन केले आहे. सत्तेत योग्य तो वाटा मिळण्यासाठी असे करणे गरजेचे होते आणि ते केवळ डावपेचांचा भाग होता. २००७ साली बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता प्राप्त झाली आणि त्याआधीदेखील तो सत्तेत वाटेकरी झाला होताच. त्यामुळे कांशीराम यांची भूमिकाच योग्य होती असे आपल्याला म्हणावे लागेल. दुसरा मुद्दा कसा चुकीचा आहे याची चर्चा पुस्तकात केली आहे. कांशीराम यांच्या आíथक भूमिकांचा फारसा ऊहापोह केला नसला तरी त्यांच्या सांस्कृतिक राजकारणाची सविस्तर चर्चा केली आहे. दलित समाजातील विविध जाती-उपजातींमधील मिथके आणि इतिहासातील व्यक्तींचा खुबीने वापर करून त्या त्या समूहांमध्ये आत्मभान निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा ऐतिहासिक व्यक्तींना-मग त्या झलकारीबाई असोत किंवा उदादेवी असोत- प्रतीके म्हणून पुढे आणण्यात आले. त्यांचे इतिहासातील स्थान आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी पुतळे उभारले गेले. हा सर्व तपशील लेखकाने दिला आहे. परंतु यातूनच पुढे आलेल्या मायावती यांच्या जिवंतपणीच स्वत:चे भव्य पुतळे उभारण्याच्या चमत्कारिक व्यवहारांचा साधा उल्लेखदेखील केलेला नाही, हे जरा अनाकलनीय वाटते.
लेखकाने कांशीराम यांची राजकीय भूमिका ही केवळ दलितांपुरती मर्यादित कशी नव्हती हे अधोरेखित केले आहे. त्यांच्या या भूमिकेत आदिवासी, इतर मागासवर्गीय तसेच धार्मिक अल्पसंख्याक यांचा समावेश होत असे. असे असताना चरित्राचे उपशीर्षक ‘लीडर ऑफ द दलित्स’ हे मात्र काहीसे बुचकळ्यात टाकणारे आहे. लेखकाला यातून काय सूचित करायचे असेल? त्यांची भूमिका व्यापक असूनदेखील या समाजघटकांनी त्यांच्या राजकारणाला प्रतिसाद दिला नाही, का त्यांची भूमिकाच मुळी वरवरची होती?
कांशीराम यांचे राजकारण दलितकेंद्री जरी मानले तरी त्याला देखील कशा मर्यादा होत्या हे लेखकाने स्पष्ट केले आहे. बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्व दलित जातींना प्रतिनिधित्व देऊ शकला नाही आणि परिणामी तो एका जातीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. यामागच्या कारणांची अधिक चर्चा व्हायला हवी होती.
या चरित्रात अनेक बाबींबद्दलची कांशीराम यांची भूमिका दिली आहे. पण लेखक त्यावर आपले काहीच मत व्यक्त करीत नाही. यामुळे त्यांच्या राजकारणाची माहिती आपल्याला मिळते पण मूल्यमापन-मग ते पटो अगर न पटो- हाती लागत नाही. याचे ठळक उदाहरण म्हणजे मायावतींना उत्तराधिकारी नेमण्याचा निर्णय. दलित समाजाचा लोकसंख्येतील वाटा हा देशातील सर्व घटक राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये अधिक असला तरी हे राज्य राजकीयदृष्टय़ा बहुजन समाज पक्षाला अनुकूल नव्हते. म्हणूनच कांशीराम यांनी उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि त्यासाठी याच राज्यातला त्यांना एक नेता हवा होता. यातून मायावतींचा राजकीय उदय झाला.
कांशीराम यांच्या दृष्टीने मायावती या फडर्य़ा वक्त्या होत्या, उत्तर प्रदेशातील होत्या आणि या राज्यातील दलितांमधील संख्येने सर्वात मोठय़ा असलेल्या चर्मकार समाजातील होत्या, या त्यांच्या जमेच्या बाजू. परंतु याच अटी पूर्ण करणारे पक्षात इतर पर्याय होते का नव्हते, असल्यास ते कोण आणि ते का मागे पडले याचा काहीच उल्लेख नाही. या अशा काही मुद्दय़ांबाबतची चर्चा केली गेली असती तर हे चरित्र अधिक परिपूर्ण झाले असते.
कांशीराम – लीडर ऑफ द दलित्स : बद्री नारायण,
पेंग्विन व्हायकिंग, नवी दिल्ली,
पाने : २८८, किंमत : ४९९ रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा