माझ्या जीवनात जे विहित, अटळ कर्म आलं आहे ते पार पाडल्याशिवाय वा त्यातून पार पडल्याशिवाय ते कर्मप्रारब्ध टळणार नाही. माझ्या जीवनात जी माणसं आली आहेत, त्या प्रत्येकाशी माझं काही ना काही देणं-घेणं बाकी आहे. ते कर्ज चुकतं झाल्याशिवाय कर्मकर्जाचा बोजा संपणार नाही. हे विहित कर्म म्हणजे मला आचरणात आणावं लागणारं कर्म आहे. हा जो आचरणधर्म आहे त्यालाच विनोबांनी स्वधर्म म्हटलं आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्या जन्माबरोबरच हा स्वधर्मही जन्मतो किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल, कारण तो आपल्या जन्माचा हेतू आहे. तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहोत..आपणाला या स्वधर्माशिवाय दुसरा कोणताही आश्रय नाही. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे ‘स्व’लाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे. स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये.’’ (गीता प्रवचने). आता आपल्या जन्माआधीपासूनच जन्मलेल्या स्वधर्माची उकल करताना विनोबा सांगतात की आपण काही आकाशातून पडलो नाही. आपण आई-बापाच्या पोटी जन्मलो त्या आई-बापाची सेवा करण्याचा स्वधर्मही आपल्याबरोबरच जन्मला असतो. आपण समाजात जन्मतो तेव्हा त्या समाजाची सेवा करण्याचा स्वधर्मही आपल्याबरोबरच जन्मला असतो. थोडक्यात, या आप्तेष्टांशी, या समाजाशी माझं काही देणं-घेणं आहे. ते पूर्ण करावंच लागतं. ते कर्म टाळून मी कर्माचा ठसा पुसू शकत नाही. ते कर्म टाळून मी कर्मप्रारब्ध संपवू शकत नाही आणि म्हणूनच माझ्याच वाटय़ाला असं जीवन का, माझ्याच वाटय़ाला असा दु:खाचा प्रसंग का, माझ्याच वाटय़ाला अशी कृतघ्न माणसं का, माझ्याच वाटय़ाला अशी जवळच्या माणसांकडून फसवणूक का, ही दु:खं कितीही छळणारी भासली तरी त्या दु:खांना स्वीकारून परिस्थिती पालटण्यासाठी झगडत जगावंच लागतं! इथे एकच मोठा धोका असतो, तो हा की अनंत जन्मांचं कर्मप्रारब्ध केवळ कर्तव्यकर्मे पार पाडून संपत असलं तरी आपण केवळ कर्तव्यकर्म करत नाही! आपण या जन्मीच्या मोहानुसारही कर्तव्यापलीकडे जाऊन नव-नवी कर्मे करीत असतो. त्यात काही सत्कर्मे जशी असतात तशीच अनेक दुष्कर्मेही असतात. ही सत्कर्मे आणि दुष्कर्मे नवे प्रारब्ध तयार करतात. नवे हिशेब तयार करतात. नवी देणी-घेणी निर्माण करतात. पुढच्या अनेक जन्मांची तरतूद त्यातून होते. पुढच्या अनंत जन्मांचं बीज त्यातच असतं. हे टाळायचं असेल तर नेमकं कर्तव्य कोणतं हे कळलं पाहिजे, कर्म करतानाही ते ‘मी’पणानं न करण्याची कला साधली पाहिजे, त्या कर्मात न अडकता बाहेर पडण्याचा मार्ग सापडला पाहिजे. तोच मार्ग, तीच कला स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’त पुढील ओव्यांपासून सांगितली जात आहे. त्यातली पहिली ओवी अशी : तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची।।

Story img Loader