पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काश्मीर खोऱ्यातील आजची पहिलीच प्रचारसभा ही केवळ निवडणूक निकालावरच नव्हे, तर जम्मू-काश्मीरच्या भवितव्यावर परिणाम करणारी असेल. या वेळची जम्मू-काश्मीरमधील निवडणूक एका अत्यंत वेगळ्या वातावरणात होत आहे. देशात केंद्रस्थानी भाजपचे सरकार आहे. वाजपेयी यांच्या सरकारपेक्षा ते खूपच वेगळे आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये होत आहे, तेथेच ११ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. आजही तेथील नेते वाजपेयींच्या त्या भाषणाची आठवण काढतात ती वाजपेयी हे ‘वक्ता दशसहस्रेषु’ होते म्हणून नव्हे, तर तो प्रश्न ‘इन्सानियत, जम्हूरियत (लोकशाही) आणि काश्मिरियत’ या तत्त्वांनीच सुटू शकतो, असा दिलासा त्यांनी दिला होता. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अनुच्छेद ३७०चा मुद्दा सध्या तरी बासनात गुंडाळला आहे. निरपराध काश्मिरी तरुणांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या लष्करी जवानांवर काही दिवसांपूर्वी कडक कारवाई करण्यात आली. या गोष्टी मोदी हेही वाजपेयी यांच्याच मार्गाने जात असल्याच्या निदर्शक आहेत, परंतु त्यात एक फरक आहे. मोदी यांनी या निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानशी चर्चा बंद केली. आपल्या शपथविधीनिमित्ताने नवाझ शरीफ यांना खाना खिलवणारे मोदी आता त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. पाकिस्तानलाच नव्हे, तर काश्मीरमधील स्वतंत्रतावाद्यांनाही दिलेली ही मोठी चपराक आहे. तेथील मतदारांनी मतदानास भरभरून प्रतिसाद देत मोदी यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे असे मानण्यात येते. ते कितपत खरे ते आताच समजणे कठीण आहे, पण एक मात्र खरे की, त्याने पाकिस्तानातील भारतविरोधी शक्तींची तोंडे लालकाळी झाली आहेत. मोदी यांच्या प्रचारसभेच्या आधी ऊरीतील लष्करी तळावर झालेला भीषण दहशतवादी हल्ला हा त्याचाच परिणाम आहे. ते सहा हल्लेखोर पाकिस्तानातून आल्याचे पुरावे असून, ते बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तय्यबा या संघटनेचे दहशतवादी असल्याचेही सांगण्यात येते. या संघटनेचा सध्याचा चेहरा म्हणजे जमात-उद-दावा. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार असलेला हफिझ मोहम्मद सईद हा तिचा प्रमुख. ऊरीमध्ये हल्ला झाला त्याच दिवशी तो लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान मदानातून भारताविरोधात गरळ ओकत होता. शरीफ सरकारच्या छत्रछायेखाली भरलेल्या त्या मेळाव्यातून तो काश्मीरच्या आझादीच्या आणि ७१च्या पराभवाचा सूड घेण्याच्या घोषणा ट्विटरवरून देत होता. संयुक्त राष्ट्रांनी ज्याला दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे असा हा नेता लाहोरमध्ये हजारो पोलिसांच्या खास बंदोबस्तात पक्षाचा मेळावा घेतो, त्या मेळाव्यासाठी खास रेल्वेगाडय़ांची व्यवस्था करते आणि त्या मेळाव्यातून तो नेहमीप्रमाणेच भारतविरोधी वक्तव्ये करून आपल्या धार्मिक अतिरेक्यांना भडकावतो, या गोष्टींना शरीफ यांच्याविरोधात चाललेल्या आंदोलनाची पाश्र्वभूमी आहे हे खरेच, पण त्याला काश्मीरमधील निवडणुकीचाही संदर्भ आहे. या हल्ल्यामुळे उर्वरित भारतातील अतिराष्ट्रवाद्यांच्या भावना अनावर झाल्या असून, पाकिस्तानवर ब्रह्मोसच डागावे अशा प्रतिक्रिया येत आहेत; पण सद्य:स्थितीत त्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या नसून मोदी काय म्हणतात याला महत्त्व आहे, कारण मोदी यांच्या भूमिकेवरच उद्याच्या काश्मीरचे भवितव्य ठरणार आहे. पाकशी चच्रेची दारे बंद करून मोदी यांनी सध्या तरी एकच पर्याय समोर ठेवला आहे. मौज अशी की, नेमका तोच पर्याय सईद याच्यासारख्या दहशतवाद्यांनाही हवा आहे. मोदी आज त्याबाबत काय बोलतात यावरही काश्मीरचे भविष्य अवलंबून आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आज कधी नव्हे ते काश्मीर एका वळणावर येऊन उभे राहिलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा